Wednesday, June 12, 2019

आजी


"काहीतरी बोलूया " ही माझ्या लेकीची नेहमीची मागणी .  मी इतकी बडबडी आहे, पण तो रेकॉर्ड आता माझ्या मुलीने तोडला आहे. एकतर फक्त तिने बोलले पाहिजे किंवा फक्त तिच्याशी लोकांनी बोलले पाहिजे हा अट्टाहास. रात्री झोपताना माझ्याकडून कुठली गोष्ट ऐकायची आणि बाबाकडून कुठली हे तिच्या मनात पक्क ठरलेलं . अशा माझ्या अनेक गोष्टींपैकी तिची आवडती गोष्ट म्हणजे सरस्वती आजीची गोष्ट . सरस्वती आजी म्हणजे माझी आजी, मी तिला आजीच म्हणायचे, लोक तिला ताई आजी म्हणायचे. स्वराने तुझ्या आजीचे नाव काय असे मला विचारले आणि तिचे नाव सरस्वती असे सांगितल्यावर ती स्वरासाठी सरस्वती आजी झाली.  आजी मुळात मालवणी बोलायची आणि आमच्याशी मालवणी मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित मालवणी. मालवणी भाषा ही  कोकणी आणि मराठी या  दोन भाषांच्या मधली भाषा म्हणायला हरकत नाही. मधली म्हटलं कारण ती थोडीफार मराठी आणि थोडीफार कोकणी सारखी वाटते. मालवणी बद्दल लिहिण्याचं कारण हे - माझी आजी काही मालवणी म्हणी सांगायची ज्याचा या काळातसुद्धा उपयोग पडतो, अर्थ लागू होतो.               रोजच्या व्यवहारात त्याची आठवण नेहमी येते.

 स्वराला जेव्हा सरस्वती आजीच्या गोष्टी ऐकायच्या असतात तेव्हा मी तिला आमचे रोजचे किस्से तर सांगतेच, त्याचबरोबर या म्हणीसुद्धा सांगते. एका दिवशी एक  म्हण आणि त्याचं उदाहरण अशी साधारण आमची गोष्ट असते.  तिला गोष्ट सांगताना  नेहमी असं वाटतं कुठेतरी हे लिहून काढावं . पण आजीच्या इतक्या आठवणी भरून येतात की लिहिणं काही होत नाही. एक  लिहायला घेतलं कि दहा गोष्टी आठवतात , आठवणीत, जुन्या काळात जाऊन, आजी नाही याचं  दुःख होतं  आणि मग लिहायला जमत नाही.  पण आज ठरवलंच या लिखाणाला सुरुवात करायची. या विषयावर किती सातत्याने लिखाण होईल हे माहित नाही पण आज सुरुवात करतेय.

आजीला कुठलीही गोष्ट फुकट गेलेली आवडायची नाही. याचा अर्थ ती कंजूस होती असा नसून ती व्यवहारी होती असा आहे. उदाहरणार्थ - लहान असताना माझ्याकडे भरपूर खेळणी आणि कंपासबॉक्स होते. मला या दोन्ही गोष्टींची आवड. एवढ्या वस्तू असूनसुद्धा मी अजून त्यात काय नवीन दिसलं तर मला हवं  असायचं .. एकदा तर मी business हा खेळ घरी असताना अजून एक वेगळ्या पॅकिंग मध्ये business दिसला म्हणून घेण्याचा हट्ट धरला. शाळेच्या result  नंतर मला आजोळहून गिफ्ट असायचं. त्याप्रमाणे  मी माझ्या आजोबांना  business घ्या  असं सांगितलं . घरी आल्यावर आजीने " घरी एक खेळ असताना दुसरा कशाला?" असं थोड्याफार रागातच विचारलं. एकसारखेच दोन खेळ, फक्त थोडेफार वेगळे दिसतात म्हणून घ्यायचे हे तिला पटतच नव्हतं. मी मात्र नवीन आणलेल्या खेळाबद्दल आजी बोलल्याने हिरमुसून बसले होते. मग थोड्यावेळाने आजीने माझ्या जवळ येऊन माझी समजूत काढली .ती म्हणाली" अगो धनु, अशे पैशे फुकट घालयणात नाय. आपल्याकडे पैसे नसले तर आपणाक कोणी विचारुचो नाय. बरा असताना सगळे येतीत पण गरज असताना कोण्णेक धावून येवचो नाय"  तेव्हा हे ऐकताना फारच old-fashioned वाटत होतं . एक खेळ  घेतल्याने काय येवढं बिघडणार आहे असं वाटायचं . त्यावर आजीचं म्हणणं एक खेळ घेण्याबद्दल नसून या वृत्तीबद्दल होतं‌‌ असं ती म्हणाली. तिचं अजून एक म्हणणं होतं ते म्हणजे असे फुकट पैसे घालवण्यापेक्षा गोरगरिबांना मदत करावी.

माझी आजी २००६ साली गेली. आता तिला जाऊन बरीच वर्ष  झालीत.  आता मात्र एवढ्या वर्षात आजीचं बोलणं १००% पटलं. पैशाची चणचण कधीच भासली नाही पण  आपली  आर्थिक आणि सामाजिक स्थिती कळल्यावर लोकांच्या वागण्यात बदल होतो हे लक्षात आलं. "खर्च करायला काय झालं, पैसे तर येतच राहणार" असं म्हणून स्वत:चे पैसे राखून दुसऱ्याला चढवणारे आणि खर्चात पाडणारे भेटले, की आजीच्या शिकवणीची आठवण येते.
आपल्याकडे सगळं असताना लोक कसे वागतात आणि आपल्याला गरज असताना लोक कशी पाठ फिरवतात याचा अनुभव घेतला.  आपल्याला गरज नसताना, सगळं छान चालू असताना  सगळेच येतात. त्यातले जे कठीण प्रसंगात येतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात , तेच खरे आपले. याचा मला प्रत्यय अगदी सारखा येतो आणि आजीची आणि तिच्या असंख्य म्हणींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

आज पुलंचा स्मृतिदिन. पु ल सुद्धा म्हणाले होते " मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची  वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते."

-धनश्री

No comments:

Post a Comment

Remembering Mehendale Kaka

 Mehendale kaka It was last Friday – I was travelling from work and I get a call from Baba – “Pradnya che baba - Mehendale kaka” passed away...