Showing posts with label आठवणी. Show all posts
Showing posts with label आठवणी. Show all posts

Sunday, June 24, 2018

My write up in Loksatta





Loksatta , the marathi daily of the Indian Express Group had invited writeups on the occasion of Father's day. I.had submitted one and it got published( the shorter version of it I mean). Sharing the same. It talks of how my father helped me right from the start and even after my marriage when I moved cities, houses and even in looking after my daughter.
It is published in page 4 of chaturang, the Saturday supplement of Loksatta.
They published a section of my write up. Some more part of my write up as follows

"स्त्री पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो- ऐकतो, बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं याबद्दल चर्चा होत असतातच.माझ्या बाबांचा माझ्या पायावर उभा राहण्यात सिंहाचा वाटा आहे, लहानपणी अभ्यास घेण्यापासून , IIM ला MBA करताना मार्गदर्शन ,ते स्वराला संभाळण्यापर्यंत, आणि तो तसाच राहणार आहे. खरंतर आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, हा विश्वासच खूप स्फूर्ती देऊन जातो. त्या खात्रीनेच मानसिक बळ येतं , खूप काही नवीन करण्याची ऊर्जा येते. त्यामुळेच आज मी नोकरीबरोबरच नियमितपणे ब्लॉगवर लिहिते, निबंध - वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेते. मी बाबांबरोबर भौतिक प्रवास किती केला हे आठवत नाही, पण आयुष्याच्या प्रवासात ते सतत माझ्या सोबत होते, अगदी कितीही चढ ऊतार आले तरी.

माधुरी दीक्षित च्या हल्लीच्या बकेटलिस्ट या चित्रपटात " होऊन जाऊ द्या " या गाण्यातले हे शब्द आहेत " वाटेवरी जरी काटे किती तरी ,तुला फिकीर ना कशाची भीती" . मला माझ्या आयुष्यातल्या स्वप्नांची बकेटलिस्ट कितीही काटे असले तरी कशाची भीती न बाळगता पूर्ण करण्यासाठी पाठीशी उभ्या असणाऱ्या बाबांना "हैप्पी फादर्स डे ". त्यांच्यामुळेच मी कुठल्याही कठीण प्रसंगाला "होऊन जाऊ द्या" असं म्हणत कणखरपणे सामोरी जाऊ शकते
"

-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com

Sunday, May 13, 2018

बाम काका- आठवणी

क्रीडा मानसतज्ञ कै भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  काही आठवणी . ते माझ्या आजीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे.
“आपल्या वरती पोलीस राहतात ना  ते आता येणार आहेत आपल्याकडे " माझी मावशी  मला म्हणाली. मी तेव्हा दुसरीत होते. त्यावेळी मनात पोलिसांची प्रतिमा म्हणजे काय - तर शेवाळी युनिफॉर्म,  धिप्पाड बांधा , मोठी मिशी,मोठे डोळे  अशी होती. थोडक्यात काय तर थोडीशी भितीदायक प्रतिमाच होती . त्यामुळे त्यांना भेटणे टाळायचे म्हणून  मी आतल्या बेडरूम मध्ये जाऊन बसले. "अगं बाम साहेब आले आहेत ग, बाहेर ये सोन्या" असं माझी मावशी म्हणाली. मला बाहेर जायचं नव्हतं. म्हणून मी  आतच बसून होते. बघते तर काय, मी बाहेर येत नाही म्हणून बाम काका आत आले. अशा प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे पोलीस असतात हे मला तेव्हा पहिल्यांदाच कळलं . खरं सांगायचं तर दिसण्यावर तसं काहीच नसतं , पण लहान वयात प्रथमदर्शनी जर कोणाची थोडी भितीदायक प्रतिमा झाली की त्या माणसाकडे जायला भिती वाटते एवढंच . बाम काका आणि काकी त्यादिवशी माझ्याशी अगदी आपुलकीने बोलले. तेव्हापासून आपल्या आजीच्या बिल्डिंगमध्ये पोलीस राहतात याची भिती वाटण्यापेक्षा, अभिमान वाटला . बाम काका IPS Officer होते. निवृत्त होताना ते IGP - Inspector General of Police म्हणून निवृत्त झाले. ते एवढ्या मोठ्या पदावर होते याची त्यांनी कधीही जाणीव करून दिली नाही. आम्हाला ते माहित होतं , पण त्यांनी त्यांच्या  वागण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. नुसतं त्यांच्या नाही , तर बाम काकींच्या किंवा त्यांच्या मुलांच्या वागण्यातून, बोलण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. अगदी down to earth वागणूक होती त्या सगळ्यांची .
एकदा माझी मावशी त्यांच्याकडे गेली होती, तेव्हा तिने बघितलं  की सचिन तेंडुलकर आला होता त्यांच्याकडे . त्यानंतर आम्हाला कळलं की ते एक प्रख्यात sports psychologist आहेत. त्यांच्याकडे  मोठमोठे  खेळाडू Counselling साठी यायचे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अंजली वेदपाठक आणि असे अनेक. नुसते खेळाडू  नाही तर मोठमोठे surgeon मोठं ऑपेरेशन करण्याच्याआधी त्यांच्याकडे counselling साठी यायचे. मी स्वतः सुद्धा त्यांच्याकडे MBA प्रवेश परीक्षेच्याआधी मार्गदर्शनासाठी गेले होते. ते yoga , प्राणायाम करण्यावर खूप भर द्यायचे. tennis /badminton असा एखादा प्रत्येक shot ला decision making लागणारा खेळ खेळावा असं ते म्हणायचे. शिकत असताना त्यांना बऱ्याच वेळा भेटण्याचा योग्य आला. तेव्हा ते निवृत्त झाले होते आणि  निवृत्तीनंतर ते नाशिकला राहायला गेले. तरी त्यांचं मुंबईला बऱ्यापैकी येणं- जाणं होतं . आम्हाला त्यांनी नाशिकला येण्याचं बऱ्याचदा आग्रहाने निमंत्रण दिलं होतं . तिथे त्यांचा व्याप बराच मोठा होता . IAS साठी तयारी करण्याचं मार्गदर्शन करायचं , लेक्चर , counselling हे सगळं चालूच होतं . तरीही जेव्हा ते मुंबईला यायचे तेव्हा माझ्या मावशीला " राणी कशी आहेस" असं विचारल्याशिवाय जायचेच नाहीत. माझ्या मावशीला त्यांचा खूप आधार वाटायचा .
गेल्यावर्षी बाम काकांचं लेक्चर   मध्ये असताना निधन झालं . आपली आवडती गोष्ट  करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली . गेल्यावर्षी ही  बातमी ऐकल्यावर खूप वाईट वाटलं. आधी विश्वासच बसत नव्हता. आज त्या गोष्टीला एक वर्ष झालयं. त्यानिमित्ताने हे लिहावंसं वाटलं . बाम काका एवढ्या मोठ्या पदावर होते ह्याच्यापेक्षा त्यांच्या  वागणुकीमुळे ते आम्हाला सदैव लक्षात राहतील. माणसाची किंमत त्याच्या श्रीमंतीमुळे, मोठ्या घरामुळे किंवा अजून कशामुळे नसून त्याच्या माणुसकीमुळेच ठरते. निदान माझ्यासाठी तरी!

Tuesday, March 13, 2018

तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?



I won prize in the Marathi Elocution Competition conducted by Dadar Bhagini Samaj. [ speech for that competition here- http://dsaidso.blogspot.in/2018/02/blog-post_18.html] I also won a consolation prize in the extempore competition. Sharing the pictures of the prizes I received at the hands of Advocate Ujwal Nikam. Dedicating this prize to my parents and aunt who developed and nurtured our interest in reading and writing. A lot of people ask me how come I write in Marathi when my medium of instruction was English . A brief story about that below.
तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?" असं मला काही लोकं विचारतात. खरं सांगायचं तर माझे विचार मी साध्या सोप्या मराठीत व्यक्त करते एवढंच . तरीही जेव्हा माझ्या मराठीबद्दल लोक मला प्रश्न विचारतात , तेव्हा मी मराठी कसं शिकले हे सांगावंसं वाटतं . माझ्या बाबांना चार मोठ्या बहिणी , त्यातल्या तीन शिक्षिका. माझी सर्वात मोठी आत्या आमच्या वरच्या माळ्यावर राहायची, आणि एक आत्या आमच्या बरोबर. माझी शाळा इंग्लिश माध्यमाची होती आणि आम्हाला शाळेत तिसरीपासून मराठी होतं . माझी मोठी आत्या दररोज माझ्याकडून मराठी अक्षरं , बाराखडी लिहून घ्यायची. कविता म्हणून घ्यायची, पाठांतर करून घ्यायची. त्यावेळेला तिचं वय ६० वर्ष होतं . आयुष्यात पहिल्यापासून तिने खूप कष्ट काढले होते- खेड्यात नोकरी, मग त्यानंतर मुंबईत येऊन नोकरी, मुलगी २ वर्षाची असताना नवरा गेल्यामुळे तिची जबाबदारी अशा अनेक जबाबदाऱ्या सतत पार पडल्या होत्या. मग निवृत्तीनंतर ती पूर्णपणे आराम करूया असं म्हणू शकली असती. असं न म्हणता तिने आम्हाला शिकवलं , आम्हाला रोज शाळेत अगदी वेळेवर पोचवलं . माझी मीना आत्याने मला मराठी स्पर्धेत भाषण लिहायला खूप मदत केली. कुठल्याही निबंध , वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर माझ्यापेक्षा तिला उत्साह असायचा. स्पर्धेचा विषय आला कि ती मला त्या विषयावरची लायब्ररीमधून पुस्तकं आणून द्यायची . त्यातले संबंधित पृष्ठक्रमांक सांगायची . मग त्यानुसार मी भाषण लिहायचे . ते ती अधिक सुधारायची. पण भाषण/ निबंध लिहिण्यात पहिल्यापासून माझा सहभाग असायचा. त्यामुळे मी आता स्वतःहून लिहू शकते. हा आमविश्वास लहानपणापासूनच माझ्या आत्यांमुळे माझ्यात घडत गेला. कुठलीही नवी गोष्ट शिकायची, पडेल ते काम करायचं आणि विधायक काम करत राहायचं असे आमच्यावर संस्कार होते. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आत्या मला मराठी शिकवतात म्हणून आपली मुलं आपल्या नणंदांच्या जवळ जातील अशी असुरक्षितता माझ्या आईला कधीच वाटली नाही. आई आम्हाला इंग्लिश शिकवायची, त्याचे निबंध लिहून द्यायची,अनेक गोष्टी आणि विषय शिकवायची. बाबा गणित शिकवायचे, आमच्या शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये मदत करायचे. आपल्या भाचीला आपण एवढं का शिकवावं , नाहीतरी ती आई बाबांचंच नाव लावणार न असं माझ्या आत्यांना सुद्धा कधी वाटलं नाही. माझी कालिंदी आत्या तर मला प्रत्येक वेळेला आठवण करून सांगते, तुला लिहायला आवडतं ना तर लिही, डोक्याला चालना मिळते.
महिलादिनानिम्मित काही लिहिलं नव्हतं , पण आज हे लिहून समारोप करते- माझ्या आत्या आणि आईने आम्हाला घडवताना आमचं हीत बघितलं. आम्ही मोठे झालो तर त्याचं श्रेय कोणाला मिळेल असा ego issue मध्ये कधीच आणला नाही. त्यांच्यात तो समजूतदारपणा आणि आपुलकी होती. घरातल्याघरात राजकारण नव्हतं. कित्येक घरात जेव्हा त्यांच्या घरातच कोण काय करतं आणि कोणाला त्याचं श्रेय मिळतं यावरून स्पर्धा असते. मी स्वतःला भाग्यवान समजते असं आंतरिक राजकारण आमच्या घरात नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या स्पर्धेला सामर्थ्याने तोंड देऊ शकतो.
माझ्या मावशीने मला भगिनी समाज मध्ये वक्तृत्व स्पर्धा असल्याबद्दलचं सांगितलं. आणि त्या स्पर्धेत मला दोन बक्षीसं मिळाली. त्याचे फोटो share करतेय.
- Dhanashree

Sunday, February 25, 2018

आठवणीतले उखाणे

एक जुनी वही सापडली. आणि त्या वहीत काही सुंदर आठवणी सापडल्या. आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे २०१३ साली लिहिलेले उखाणे त्या वहीत होते. ते आता share करतेय.
iPad वर उडतो angry birds चा थवा
सिद्धेशचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
Apple च्या macbook वर फुलं वाहते वेचून
सिद्धेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून
गणेशाला आवडतात दुर्वा शंकराला बेल
सिद्धेशसंगे फुलावी सुखी संसाराची वेल
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण
शिरोडकरांची कन्या झाली जोगळेकरांची सून
चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून
सिद्धेशचं नाव घेते आग्रह केला म्हणून
-धनश्री

Wednesday, January 3, 2018

आजी गं आजी- A tribute to my grandmother


This poem to dedicated to my Aaji(grandmother)Saraswati Shirodkar. Born and brought up in Konkan , she came to Mumbai at the age to 60 to raise her grandkids. At that age, Mumbai was a total culture change for her. Yet from what I know, she adapted swiftly without creating any noise. She paid a pivotal role in our upbringing along with my parents and aunt . What they have done cannot be summarized by one poem . But this is my one small way of paying a tribute to my aaji.

आजी गं आजी , कुठे आहेस गं तू ?
आठवण येते तुझी , परत येशील का गं तू ?
बांद्याचा जन्म तुझा, वेंगुल्यात सासर
नातवंडांच्या सांभाळासाठी मुंबईला केलस आपलं घर
हुशारी तुझी जगावेगळी , शिस्त तुझी चोख आणि शब्द रोखठोक
त्यामुळेच कदाचित गोड बोलणार्यांना घाबरते आम्ही लोक
मनात एक आणि करताना दुसरं असं कधी केलं नाहीस तू
शब्द राखण्यातच माणसाची wealth दिसते असं कळवून दिलसं तू
“Marketing” पेक्षा Executing वर भर दिलास तू
दर दिवशी त्याचा फायदा होतो आहे बघू
आपल्या माणसांसाठी करण्याला कधी Sacrifice नाही म्हटलेस
“Teamwork” चे धडे घरीच आखलेस
अगं माणसाने समाधानी रहावं असं तू शिकवलसं
“Work-life balance” इथूनचं आम्ही घेतला
इतकं सगळं करून Blow your trumpet नाही केलसं
“Humility” अनुकरण आम्ही इथूनच केलं
कोकण आणि मुंबई येवढचं Exposure असून एवढं कसं केलसं?
वाचन, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर घर उभं राहिलं
आठवण तुझी येते, तुला भेटावेसे वाटते
सांग आजी तू देवाकडून परत कधी येतेस?

Sunday, October 29, 2017

खाऊ, कापी आणि आठवणी



"सारस्वत लोकं खाण्यासाठी जगतात" खूप वर्षांपूर्वी एका समारंभात ऐकलं होतं. मी माहेरची सारस्वत आहे आणि माझ्याबाबतीत तरी हे वाक्य १००% खरं आहे. मला खाण्याची प्रचंड आवड आहे, त्यात सर्वात आवडता स्वयंपाक म्हणजे अस्सल सारस्वती पद्धतीचा स्वयंपाक. अर्थात मला ब्राह्मणी पदार्थ सुद्धा आवडतात, करायला आणि खायला सुद्धा. खाण्याची आवड, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं असा नव्हे. याचा अर्थ म्हणजे माझ्यासाठीतरी चविष्ट खाणं असा आहे. मीटिंग होती म्हणून खायचं विसरले असं माझ्याकडून होणारच नाही. उलट मीटिंग लांबेल या भीतीनेच मी आधीच खाऊन घेते.
अगदी लहानपणापासून आई, आत्या, आजीकडून खाण्याचे मस्त लाड पुरवले गेले.चपाती भाजी भात आमटी कडी तर असायचीच त्याशिवाय कधीतरी जे तोंडी लावण्यासाठी अन्य प्रकार केले जायचे त्यातला एक प्रकार म्हणजे कापी. माझी आत्या अगदी उत्कृष्ट कापी बनवते, दर आठवड्याला ती आमच्यासाठी बनवायची. आमच्याकडे जास्तीकरून बटाट्याचे कापी व्हायचे , पण वांग्याचे , केळ्याचे , सुरणाचे सुद्धा काप केले जातात.
कापी हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. बटाटे उभे चिरून, धुऊन मीठ लावून ठेवायचे. थोड्या वेळाने लाल तिखट लावून घ्यायचं. आणि मग ते काप तांदळाच्या पिठात भिजवून पॅनवर shallow fry करायचे. बटाटे शिजले की मस्त कापी तय्यार.माझ्या लेकीलासुद्धा कापी खूप आवडतात. आज तिच्यासाठी वरण भात आणि कापी केल्या. तिने " मस्त झालंय" असं सांगितलं. लेकींकडून प्रेमाने कौतुकाची थाप मिळाली. अगदी मस्त वाटतंय.
- धनश्री 

Monday, September 4, 2017

माधुरी दीक्षित मिली दादर में

माधुरी दीक्षित ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री. म्हणजे all- time favourite म्हणाच ना. मी दोन तीन वर्षांची असताना माधुरी दीक्षितच्या तेजाब मधल्या एक दोन तीन ह्या गाण्यावर अगदी मस्त नाचायचे. आमच्या बाजूचे आबा खास माझ्यासाठी तेजाबची विडिओ कॅसेट आणायचे. त्यावेळी छायागीत, सुपरहिट मुकाबला या गाण्यांच्या कार्यक्रमात चित्रपट गीते बघायला मिळायची. त्यात माधुरीचे नाच लागले की मी अगदी टक लावून बघायचे.
माझी आई एअर इंडियात मॅनेजर होती. त्यावेळी आईने दिल तो पागल हैं या चित्रपटाच्या विमानतळाच्या शूटिंगच्या निमित्ताने माधुरी दीक्षितला बघितलं होतं. त्यावेळी तर मला इतकं वाटत होतं की मी का नव्हते विमानतळावर त्यावेळी. नाहीतर मला माधुरीला भेटता आलं असतं.
माझी आत्या तेव्हा दादरच्या शारदाश्रम सोसायटीत राहायची. तिथे माधुरी दीक्षित चे डॉक्टर राहायचे. मी तेव्हा आत्याला सांगायचे "डॉक्टरांना विचार माधुरी कधी येणार ते. मग मी तुझ्याकडे राहायला येते आणि माधुरीला भेटते. "अर्थात हे काही आत्या कसं विचारणार डॉक्टरांना. नंतर मात्र तिने डॉक्टरांना सांगून माझ्यासाठी एक माधुरी दीक्षित चाautographed फोटो आणला. तो मी वर्षानुवर्ष जपून ठेवला होता. या माझ्या माधुरीच्या वेडाला माझी आजी खूप हसायची.ती म्हणायची " माधुरी म्हणजे काय देव असा गो ? काय करतालय तिका भेटून? "
२००६ सालची गोष्ट. कॉलेज झाल्यावर मी माटुंगा स्टेशन ला चालत चालत जात होते. माटुंगा स्टेशन च्या गणपती मंदिरात मी नमस्कार करत होते. माझा मोबाईल फोन vibrate होताना जाणवला.माझ्या मावशीचा फोन होता " अगं, माधुरी आली आहे हिंदू कॉलनीत , पटकन भेटायला ये".मला माझ्यावर विश्वासच बसेना . अगदी मस्त वाटत होतं. मी लगेच टॅक्सी केली आणि हिंदू कॉलोनीत जायला निघाले. माधुरी दीक्षितची आजे सासू, म्हणजे श्रीराम नेनेंची आजी हिंदू कॉलनीत राहायची. ती माझ्या मावशीला ओळखायची त्यामुळे माधुरी आल्यावर तिने माझ्या मावशीला कळवलं. मी हिंदू कॉलनीत ५ मिनिटात पोचले.तिथे माधुरी दीक्षित, तिचा नवरा आणि दोन मुलं होती. माधुरीला बघून मी अगदी speechless झाले. काय बोलावं हेच कळेना. २ मिनिटं मी नुसती शांत होते. मग नंतर मी फक्त एक वाक्य बोलले "मला तुम्ही खूप आवडता". माधुरी दीक्षित नेहेमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिची मुलं पण फार गोड होती. अजून जास्त काही बोलण्याची हिम्मतच नव्हती. माझी मावशी आजींशी बोलली आणि आम्ही निघालो. मला अगदी आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी फोनवर सर्रास कॅमेरा नव्हते. त्यामुळे माझ्याकडे माधुरीबरोबरचा फोटो नाही आहे. तो फोटो मी माझ्या आठवणीत टिपून ठेवला आहे.
माधुरी दीक्षित च्या भेटी निमित्त गॅम्बलर या चित्रपटातील हे गाणं माझ्या शब्दात -
माधुरी दीक्षित मिली दादर में
टॅक्सी किये हम माटुंगा से
उसने कहा मुझसे hi hello
मै बस सोची क्या बोलू
माधुरी को कहा आप favourite हो
उसने कहा हमसे thank you
-धनश्री
P.S. या माधुरी दीक्षित च्या विषयावर पोस्ट लिहिण्याचं सुचवल्याबद्दल माझ्या बहिणीचे म्हणजेच वैशाली ताईचे आभार.

Saturday, August 26, 2017

गणपती बाप्पा मोरया

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. गणपतीचा तो माझा पहिला अनुभव आणि त्यामुळे बरंच काही आठवतं गणपती म्हटलं की. त्याबद्दल काही!

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. तो शिरोडकरांचा गणपती. अंधेरी माझे सर्वात मोठे चुलत काका राहतात. त्यांचा वय वर्ष ९४, माझ्या बाबांपेक्षा ते जवळजवळ ३० वर्षांनी मोठे. त्यांना दोन मुली, एकीच्या घरीच गणपती असतो. त्यामुळे त्या गणपतीची बरीचशी तयारी माझी आई ,बाबा ,काकी आणि आत्या करतात. मलाही जितकं जमणार नाही इतकी चोख तयारी असते. सगळा स्वयंपाक, अगदी मोदकासकट घरी बनवला जातो. जेवायला दुसऱ्या दिवशी, म्हणजे कंदमुळाच्या दिवशी तर कंदमूळ खाण्यासाठी अजून लोक जेवायला असतात.माझ्या आईचा वय ६०च्या पुढे आहे आणि आत्यांची वयं तर ७२-८८ या गटातली. तरीही जेव्हा मी त्यांचा एवढा पूजेची तय्यारी, स्वयंपाक करण्याबद्दलचा वर्षानुवर्षांचा उत्साह बघते तेव्हा नुसतं थक्क व्हायला होतं.एक छोटीशी कविता त्याबद्दल :

गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
आठवणी दाटून आलेल्या
सांगते थोड्या तुम्हाला

गावचो दीड दिवसाचो गणपती
पहिल्यांदा मुंबैक आणलो
गोरेगावक अण्णा आजोबांकडे तो बसयलो

किती तो स्वयंपाक किती ती तय्यारी
सारस्वत जेवणासाठीच जगतात ही खात्री होते पुरी
पहिल्या दिवशी असतात पाच भाज्या आणि मोदक
सगळे मिळून स्वयंपाकाला लागतात पटपट
दुसऱ्या दिवशी मोठा टोप भरून कंदमूळ
वड्यासकट खाताना येते मजा भरपूर

आरतीला शेजारीपाजारी येतात
संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी करतात
आत्याला भारी उत्साह असतो
वय ७५च्या पुढे असून लाडू चिवडा घरीच बनतो

भावंडांच्या गप्पा रंगतात,एकमेकांबरोबरची नाती अजून घट्ट होतात
गणपती च्या निमित्ताने सगळे एकत्र येतात

तूच कर्ता तूच करविता,
गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
गणपती बाप्पा मोरया

-धनश्री
#ganapatibappamoraya #marathikavita #marathipost

Monday, August 7, 2017

संगीत संस्कार

माझा १९८०च्या दशकातील जन्म. मी इंटरनेटच्या आधीचं आयुष्य अनुभवलंय, आमच्याकडे तर फोन सुद्धा मी ७ वर्षांची असताना आला होता.त्याआधी अगदी दादरला आजीला फोन करायचा असेल तर आम्ही PCO मध्ये जाऊन फोन करत होतो. मला वाटतं की २०००च्या नंतरच्या पिढीला तर PCO म्हणजे काय हेच सांगावं लागेल.असो. मी लहान असताना गाणी ऐकायची असतील तर प्रामुख्यानं दोन साधनं होती- रेडिओ आणि टेप रेकॉर्डर. टी. व्ही. वर पण गाणी लागायची पण ती ठराविक वेळी. चित्रहार, छायागीत नंतर डी.डी. मेट्रो आल्यावर सुपरहिट मुकाबला हे गाण्याचे प्रसिद्ध आणि प्रेक्षकांचे लाडके कार्यक्रम. रेडिओवर प्रामुख्याने विविध भारती ऐकलं जायचं. टेप रेकॉर्डरवर आपल्याला हवी ती कॅसेट लावून गाणी ऐकता येत असायची. माझ्या आईला गाण्यांची खूप आवड, आणि त्यातही जुन्या गाण्यांची, भावगीतांची जास्त आवड. माझी आई गाण्यांची यादी बनवून दादरच्या एका दुकानात देत असे. मग ते लोक ती गाणी एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून देत असत. याचा फायदा असा होता, की तुम्हाला एका चित्रपटातलं एकच गाणं हवं असेल तर पूर्ण कॅसेट विकत न घेता, वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी एका कॅसेटमध्ये मिळायची.शनिवार- रविवार आमच्याकडे टेप रेकॉर्डरवर गाणी चालू असायची. आपल्याला हवं ते गाणं एका "click " ने मिळण्याइतकं सोपं नव्हतं. त्यामुळे एकदा कॅसेट सुरु झाली की ती संपेपर्यंत ऐकायची. 
असं असल्यामुळे नकळतच मला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकण्याची सवय लागली. हे गाणं असं का, संगीतकार कोण, त्या गाण्याची पार्श्वभूमी काय हे घरी चालू असलेल्या चर्चेमुळे कळायचं. रिमझिम पाऊस पडे सारखा, तुझ्या गळा माझ्या गळा, मधुबन में राधिका, राधा ना बोले ना बोले ना बोले रे अशी अनेक गाणी आमच्याकडे कॅसेट मध्ये होती. आताची मुलं जसा chu-chu TV वरची गाणी लावण्याचा आग्रह धरतात तसं त्याकाळी शक्यच नव्हतं. जे गाणं चालू आहे ते ऐकायचं. लहानपणी ऐकलेलं जास्त लक्षात राहतं आणि अजूनही आठवतं.
आता मात्र काळ खूप बदललाय. आपल्याला हवं ते गाणं आपल्याला एका mouse click ने मिळतं.आपण तसं करत असल्यामुळे मुलांनाही ते कळतं, हवं ते गाणं लावणं किती सोपं आहे ते. त्यामुळे मुलंही त्यांना आवडीचं गाणं लावण्याचा आग्रह धरतात. असं असताना वेगवेगळा संगीताचा अनुभव ते कसा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्यापरीने मी माझ्या लेकीला हल्ली रोज रात्री झोपताना एक जुनं मराठी गाणं ऐकवते. ती तेव्हा म्हणते "हे नकोय" , पण तरीही मी ते गाणं चालू ठेवते. जुनी गाणी ऐकून त्याची आवड निर्माण व्हावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपला सांगीतिक इतिहास माहित असावा असं मला जरूर वाटतं. कुठल्याही पुस्तकातून तो समजू शकतोच पण त्या शिक्षणाची सुरुवात जर लहानपणीच्या अनुभवातून, संस्कारातून झाली तर बरं नाही का?
--धनश्री

Friday, August 4, 2017

पवाईमार्गे जाताना...

सध्या माहेरी आहे . माझी आई मालाडला राहते आणि माझी नोकरी ऐरोलीला आहे. आमची ऑफिसची बस पवईमार्गे ऐरोलीला जाते. माझी सर्वात पहिली नोकरी पवईला होती. तेव्हासुद्धा आमची बस याचमार्गाने जायची. पवई म्हटलं की त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात.पहिल्या नोकरीचं महत्त्व काही वेगळंच असतं. मी तिकडे तीन वर्ष काम केलं. MBA साठी प्रवेश मिळाल्यावर नोकरी सोडली. नोमुराने मला अनेक गोष्टी दिल्या. माझा तो पहिला "corporate " अनुभव होता. एका प्रख्यात investment bank मध्ये काम कसं चालतं ते कळलं. वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले. सहकाऱ्यांशी छान मैत्री झाली. काही मित्र-मैत्रिणींशी तर अजून संपर्कात आहे. नोकरीमुळे जो आर्थिक धनलाभ झाला त्याने माझं MBA शिक्षण होण्यात खूप मदत झाली. मला कर्ज घ्यावा लागला नाही.नोमुराचं कॅन्टीन तर अगदी सुरेखचं होतं. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आणि वैविध्यपूर्ण खाणं. त्याचा मेनू आदल्या आठवड्यातच ठरलेला असायचा आणि तो आम्हाला आमच्या इंट्रानेट वर मिळायचा. नोमुरा मध्ये प्रत्येक गोष्टीला एक शिस्त होती. तीन वर्षात एकदाही आमची ऑफिसची बस कधी ५ मिनिटंसुद्धा उशिरा आली नाही .कुठल्याही वेळेत काही बदल होणार असेल तर तो आधीच कळवला जायचा.
पवईला जाऊन मस्त खाऊया, ते दिवस परत जगूया असं खूपदा वाटत होतं. पण कामाच्या व्यापात ते काही जमलं नाही. त्यामुळे आज जेव्हा पवाईमार्गे ऑफिसला जात होते तेव्हा त्या पूर्ण प्रवासात जणू काही मी ते दिवस जगत होते.पवईलेक अजूनच सुंदर वाटत होता. नुसतं त्या दृश्याकडे बघून डोळ्यात कायमचं टिपून ठेवावं असं वाटत होतं. काही फोटोही काढले मग.एखाद्या जागेशी आपल्या किती आठवणी जडलेल्या असतात नाही? मग ती नोकरीची जागा असली तरीसुद्धा.
--धनश्री


Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...