Showing posts with label आजचाअनुभव. Show all posts
Showing posts with label आजचाअनुभव. Show all posts

Sunday, March 11, 2018

मेरी मर्ज़ी!

माझ्या मुलीला नटायला वगैरे खूप आवडतं. काल रात्री ती झोपताना बांगड्या घालायला मागत होती. मी तिला विचारलं- " अगं रात्री बांगड्या का घालतेस गं?" तेव्हा ती मला म्हणाली " मला आवडतात गं घालायला "
अजून एका प्रसंगी ती खूप टिकल्या लावत होती . मी जेव्हा तिला विचारलं " अगं अशा इतक्या टिकल्या कोण एका वेळेला लावतं का गं ?"तेव्हा ती मला म्हणाली " मला आवडतात गं लावायला म्हणून लावते"
असे जेव्हा मी तिला प्रश्न विचारते " हे का करतेस असं " तेव्हा तिचं "मला हे आवडतं " असंच बहुतांश वेळेला उत्तर असतं. कोणी मस्करीने प्रश्न विचारला किंवा अगदी सहज सरळ विचारला तरी तिचं उत्तर एकच.प्रत्येकच वेळेला असं मला आवडतं हे उत्तर कितपत बरोबर आहे हे मला माहित नाही. पण आपल्याला कोणी खवचटपणे मुद्दामून प्रश्न विचारला तर असं ठामपणे उत्तर द्यायला आलं पाहिजे. अगदी बिनधास्त आणि बेधडकपणे !!
शेवटी गोविंदाने म्हटल्याप्रमाणे " मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू मेरी मर्ज़ी" 

Tuesday, October 10, 2017

मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ

हृतिक रोशनच्या लक्ष्य चित्रपटातील हे गाणं " मै ऐसा क्यूँ हूँ " या गाण्याचा समारोप " मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ " याने होतो. आपण जसे आहोत तसे आहोत, ते जाहीरपणे कबुल करण्यात काहीच कमीपणा नाही. 
एकदा आमच्या सोसायटीत एका मुलीचा दुसऱ्या मुलीच्या पायावर चुकून पाय पडला. जिच्यावर पाय पडला तिने विचारलं " आंधळी आहेस का ? ". ती पहिली मुलगी " हो, मी आंधळी आहे" असं म्हणाली. हे खरंतर थोडंसं खूप straightforward वाटू शकेल. प्रत्येक वेळी असं उत्तर देणं बरोबर असेल असंही नाही. पण हे उत्तर आपला ठामपणा दर्शवण्यात खूप मदत करतं.
सोशल मीडियाच्या आणि फेसबुकच्या युगात आपल्याला " conforming to crowd mentality" याचं खूप दडपण येऊ शकतं. उदा. तुमचे मित्र लग्नाच्या वाढदिवसाला फिरायला गेले आणि तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला अगदी आपण हे काय करतोय असं वाटू शकतं.तुम्हाला जाण्याची गरजही वाटत नसेल पण केवळ लोक काय म्हणतील/ विचारतील याने तुम्ही त्रस्त होत असाल. त्यावरून कोणी तुम्हाला विचारलं " हे असं का करता, तुम्ही असे आहात का? " तर बऱ्याचदा आपण स्पष्टीकरण द्यायला जातो. म्हणजे जर कोणी विचारलं " काय हे, ट्रेन ने काय जातोस , एवढे पैसे कमावतोस ना. " तर अशा वेळी ट्रेन ने जाण्याचं स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी " मी गरीब आहे " असं म्हटलं तर प्रश्नच मिटला.कोणी आपल्याला गरीब म्हटल्याने आपण थोडीच गरीब होतो?
माझी लेक मला असे बरेच अनुभव देते आजकाल. मी तिला जेव्हा सांगते "अगं असं करू नकोस, लोक हसतील " , तेव्हा ती मला " लोक हसू दे " असं उत्तर देते.
मी तिला जेव्हा सांगते "तू वेडी आहेस का, वेडी मुलं असं करतात " , तेव्हा ती मला "मी वेडी आहे " असं उत्तर देते. मला जे अजून जमत नाही ते ती करून दाखवते.
त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारलं की "तू अमुक तमुक आहेस का " , तर हो " मी अमुक तमुक आहे" असं म्हणूंन बघा. चर्चा तिकडेच संपेल. कोडगेपणा असणारे तर हे नेहेमीच करतात. तुमच्यात कोडगेपणा नसेल तर योग्य वेळी हे उत्तर देता आलं पाहिजे. " मै ऐसा क्यूँ हूँ" ला "मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ" हे उत्तर देऊन बघा!
- धनश्री

Saturday, October 7, 2017

वक्तशीरपणा-आजचाअनुभव

आज uberPool बुक केली. माझा पहिला pickup होता. मी ऑफिसच्या खालीच थांबले होते त्यामुळे कॅब आल्यावर मी लगेच बसले. मग दुसरा pickup आला. तो समोरच्या ऑफिसमधला होता. त्या ऑफिसच्या गेटच्या आतमध्ये जाण्याची परवानगी गार्ड देत नव्हता. याचं कारण माझ्याकडे त्या ऑफिसचा पास नव्हता.तरीही तो दुसऱ्या pickup चा मनुष्य ड्रायव्हरशी वाद घालत होता गेटच्या आतमध्ये येण्याच्या मुद्द्यावरून. आणि हे सगळं होऊन सुद्धा तो मनुष्य वेळेवर खाली उतरला नव्हता. मग मी ड्रायव्हरला विचारलं " कितना टाइम लगा रहा हैं , समझ नाही आता क्या उसको शेअर कॅब किया हैं? " त्यावर मला ड्रायव्हर म्हणाला "पागल का कोई जवाब होता हैं क्या?" किती खरं होतं ते, मुर्खांच्या तोंडाशी लागून काय उपयोग?. मग तो ड्रायव्हर म्हणाला " ड्रायव्हर मतलब घर का नौकर समझ राखा हैं. कुछ भी बोलते हैं" हे सगळं होता- होता २० मिनिटं उलटली. अजून तो मनुष्य आला नाही. मग शेवटी मी ड्रायव्हर ला विचारलं की बुकिंग कॅन्सल नाही होणार का? तर त्याने प्रयत्न केला आणि शेवटी कॅन्सल केलं बुकिंग. हे सगळं करता- करता त्या माणसामुळे आमची २५ मिनिटं फुकट गेली.
वक्तशीरपणा खरं तर आपल्याला शाळेपासून शिकवला जातो. आम्हाला शाळेत असताना value education या विषयात Punctuality ( वक्तशीरपणा) ही एक value म्हणून शिकवली जायची. त्यात त्याचं महत्त्व समजावलं जायचं आणि आम्हाला त्याविषयावर माहिती आणायला सांगितली जायची.
जर कोणाला भेटायचं असेल, तर आजी म्हणायची लवकर पोच , उगीचच तुझ्यामुळे त्याला उशीर नको. त्यामुळे आपल्या वेळेइतकंच दुसऱ्याच्या वेळेला महत्त्व असतं हे आम्ही शिकलो.
आता एका सुशिक्षित नोकरदार माणसाला जर वेळेचं महत्त्व नसेल, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग समजायचा?

-धनश्री

Friday, October 6, 2017

बोलण्यातली आणि वागण्यातली यू-टूर्न - आजचाअनुभव

माझा बऱ्यापैकी बोलका स्वभाव आहे. म्हणजे मी जरा ओळख झाली की भरपूर गप्पा मारू शकते. त्यामुळे ट्रेन मध्ये वगैरे माझ्या मस्त मैत्रिणी होतात. आता इथे जोपर्यंत शिक्षण, नोकरी सांगण्याचा प्रश्न येत नाही तोपर्यंत मी त्याबद्दल सांगण्याच्या फंदात पडत नाही. 
एकदा मी असच ट्रेन मध्ये गप्पा मारत होते. मग माझी ती ट्रेन मधली मैत्रीण खूप मोठेपणा मारून बोलत होती , "मी MBA केलं आहे , मी अमुक एक branded गोष्टीच वापरते , अमुक एक हॉटेलमध्येच जाते , नेहेमीच flight ने जाते . "
आता तिला काय सांगू की मी IIM मधून MBA केलंय, आणि आई एअर इंडियात नोकरी करत असल्यामुळे लहानपणापासून सातत्याने विमान प्रवास करत आलेय. तर असो. तिच्या मोठ्या गप्पा ऐकून खूप कंटाळा आला, तेव्हा मी तिला माझ्याबद्दल सांगितलं.तिचा सुरच बदलला आणि चेहरा तर बघण्यासारखा होता.
असे अनुभव मला बऱ्याचदा येतात. परिस्थिती बघून लोकांचं बोलणं आणि वागणं अगदी ३६० डिग्री यू- टूर्न घेतं. माणसाचं खरं रूप बघायचं असेल तर आपण अगदी low-profile असावं. आपल्याकडे काहीही नसताना आपल्याला मदत करणारे हेच आपले खरे हितचिंतक. बाकीचे सगळे आपल्या चांगल्या परिस्थितीचे मित्र, आपले नव्हे. आणि हा फरक आपल्याला जितका लवकर समजेल तितकं बरं.
-धनश्री

Wednesday, October 4, 2017

"बॅग भरशील का?" - आजचाअनुभव

" अगं माझी बॅग भरशील का?" रमेश त्याच्या बायकोला म्हणाला. 
रमेश हा आमचा शेजारी. स्वतःची प्रवासाची बॅग दुसरा कसा भरू शकतो हा मला प्रश्न पडला. 
"अगं मला बॅग भरता येत नाही गं" रमेश म्हणाला. या वाक्यावर मला हसू का रडू हेच कळत नव्हते.
बॅग भरणं म्हणजे नक्की काय? आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी- कपडे, ब्रश , इतर toiletries,औषध असतील तर काही त्या बॅगेत भरणं. एखाद्या शाळकरी मुलाला हे नाही जमणार कदाचित , पण नोकरी करणाऱ्या माणसाला ते न जमणं म्हणजे अगदी कीव करण्यासारखी गोष्ट.
आजूबाजूला बघितल्यावर लक्षात आलं कि वर्षानुवर्ष प्रवास करत असलेली लोकंसुद्धा स्वतःची बॅग स्वतः भरतातच असं नाही. प्रवासातून खूप काही शिकायला मिळतं, exposure मिळतं असं ही लोकं म्हणतात .पण तरीही बॅग भरायला येत का नाही , का ते शिकण्यासाठी क्लास लावावा लागतो तोसुद्धा प्रवास करून?
-धनश्री

Sunday, October 1, 2017

प्रेमाचा उत्साह- आजचाअनुभव

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक लोक काहिनाकाहीतरी शिकवून जातात. म्हणजे अगदी एखादा सफाईकामगार किती चोखपणे आपलं सफाई काम करतो हे बघण्यासारखं असतं. लोकांचं चांगलं बघून काहीतरी शिकणं ही एक वृत्ती आहे. रोजच्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप काही शिकवून जातात, अनुभव देऊन जातात. अनुभवासारखा शिक्षक नाही. त्यामुळे मी आजपासून जसं जमेल तसं मला काहीतरी बोध देणारे अनुभव शेयर करणार आहे. 
आजचा अनुभव:
परवा मावशीकडे गेले होते. माझी मावशी नुकतीच कॅन्सरमधून बरी होते आहे. गेल्या रविवारी तिचं अगदी असहाय्य अंग दुखत होतं. म्हणजे रात्र-रात्र झोप न लागून तिला प्रचंड अंगदुखीमुळे 2-3 दिवस उठता पण येत नव्हतं . आम्ही खूप घाबरलो होतो. पण नंतर तिचं औषध बदललं आणि २-३ दिवसांनी ती जरा बरी झाली. जेव्हा मी तिच्याकडे परवा गेले तेव्हा सुद्धा तिला थोडा अंगदुखीचा त्रास होताच. तरीही तिने मला चक्क चहा करून दिला , घरी जे सुकं खाणं होतं ते सुद्धा दिलं. केवळ प्रेमापोटी तिने मला चहा करून दिला. तोसुद्धा अगदी लगेच.मी तिला म्हणाले मी करते तर ती म्हणाली नको आत्ताच ऑफिसमधून आली आहेस, मी करते. आपण आजारी असताना सुद्धा उठून माझी विचारपूस आणि चहापान करणं हे मोठंच . या प्रेमाच्या उत्साहाला माझा सलाम!

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...