Thursday, April 19, 2018

चहा चपाती


आज सकाळचा नाश्ता झाला का? हा प्रश्न मी हल्लीच ऐकला असेल. लहानपणापासून माझ्या आईकडे “ आज सकाळची चपाती खाऊन झाली का?” हाच प्रश्न असायचा. चहा आणि चपाती हे जणू काही माझं सकाळचं खाणं. अगदी कितीही लवकर बाहेर पडायचं असेल तरी चहा आणि चपाती खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. माझे जेव्हा सकाळचे क्लास असायचे तेव्हा मी अगदी सकाळी ५:३० ला गरम चपाती आणि चहा असं खाऊन जायचे. चहा आणि चपाती खाण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. काहींना चहाच्या कपात थोडीशी चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती अगदी पूर्णपणे बुडवून खायला आवडते. आणि हो मग तो चहा त्या बशीतून प्यायला आवडतो, त्यात म्हणे चपातीची चव उतरते आणि तो चहा अजून चवदार लागतो. बऱ्याच लोकांना सकाळी पोळी भाजी / चपाती भाजी खाण्याची सवय असते.त्यांना जेव्हा मी चहा चपाती खाते असं सांगते तेव्हा त्यांना असं चहा चपाती काय खातात ह्याचं नवल वाटतं . आणि माझ्यामते हल्ली जसे cornflakes, wheatflakes खातात, ते पण दुधात बुडवून खातात ना, तर हे तर चहात ताजी ताजी चपाती बुडवून खाणं झालं. Fresh is best नाही का? ही चहा चपाती खाण्याची पद्धत कुठली हे मला ठामपणे माहित नाही. पण कोकणात बालपण गेलेल्या लोकांची  ही सवय असावी असं माझं निरीक्षण सांगतं. माझा संपर्क असं खाणाऱ्या कोकणातल्या सारस्वत लोकांशी जास्त आहे ( ह्यात कसलाही जातीयवाद नाही).
माझ्या घरी आता सकाळचा नाश्ता असतो- जसं कि इडली, डोसा , उपमा. मला हे सगळे पदार्थ आवडतातच. पण माझं सकाळचं comfort food चहा चपाती आहे. माझ्या घरी चपातीला  पोळी म्हणतात . मी पण पोळी म्हणते. पण  चहा पोळी  म्हणण्यापेक्षा चहा  चपाती म्हणण्यात  मज्जा  आहे. आणि हो बोलण्यापेक्षा मी करण्याला महत्व देते
-धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...