Showing posts with label पालकत्व. Show all posts
Showing posts with label पालकत्व. Show all posts

Tuesday, October 9, 2018

स्वरा_करे_तो_क्या_करे

एखादा विषय कठीण  असतो . त्या   विषयाचा पेपर  कठीण येणार असा आपला अनुभव सांगतो. म्हणजे अशा पेपर मध्ये आपल्याला पास होण्यापुरते मार्क मिळाले तरी खूप असं आपल्याला वाटतं .मग अखेर तो दिवस येतोच-  परीक्षा सुरु होतात आणि हा हा म्हणता त्या पेपरचा दिवस उजाडतो. आपल्याला एका मागो माग एक ,पेपरातले  सगळे प्रश्न सोडवता येतात. आपण स्वप्नात आहोत  की काय असा आपल्याला सारखा प्रश्न पडतो . परत तोच  प्रश्न वाचून त्यात काही अजून "trick question" नसेल ना ह्याचा विचार करतो .तोवर पपेरची वेळ संपलेली असते आणि आपल्याला " पेपर सोपा होता ह्याचा  आनंद कि पेपर एवढा सोपा कसा असू शकतो" ह्याचा विचार करावा हेच कळत नाही .

आज अगदी असंच काहीतरी घडलं . तसं म्हणाल तर माझी लेक तिच्या बोलण्यामुळे, इकडे तिकडे पळण्याच्या कलेमुळे मला सार्वजनिक ठिकाणी, रेस्टॉरंट्स मधे बरीच प्रसिद्धी मिळवून देते. कधीकधी तर " हे मूल कुणाचं " इथपर्यंत मला प्रसिध्दी मिळाली आहे .

आज रेस्टॉरंट मध्ये पहिली १५ मिनिटं झाली तरी लेक फक्त एक ठिकाणी बसून होती . चमच्याशी खेळणं नाही, ईकडे तिकडे धावणं नाही , शांत म्हणजे शांत. मग मलाच राहवेना.म्हटलं," स्वरा बरी आहेस ना ?" तेव्हा तिचं फक्त स्मितहास्य आणि "हो " हे उत्तर. मग ३० मिनिटं उलटली , तरी ती शांत. मांडीवर घे असे  छोटे हट्ट सुरु झाले होतें , पण फारसं काही नाही .
आता मात्र पपेर ची 'बेल' झाली म्हणजे ,'बिल ' घेऊन वेटर आला .

 निघता निघता " स्वरा शांत होती ह्याचा  आनंद कि स्वरा शांत का होती " ह्याचा विचार करावा हेच कळत नव्हतं. 

#स्वरा_किती_मस्ती_करतेस
#स्वरा_किती_शांत_आहेस
#स्वरा_करे_तो_क्या_करे

-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com

Sunday, June 24, 2018

My write up in Loksatta





Loksatta , the marathi daily of the Indian Express Group had invited writeups on the occasion of Father's day. I.had submitted one and it got published( the shorter version of it I mean). Sharing the same. It talks of how my father helped me right from the start and even after my marriage when I moved cities, houses and even in looking after my daughter.
It is published in page 4 of chaturang, the Saturday supplement of Loksatta.
They published a section of my write up. Some more part of my write up as follows

"स्त्री पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो- ऐकतो, बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं याबद्दल चर्चा होत असतातच.माझ्या बाबांचा माझ्या पायावर उभा राहण्यात सिंहाचा वाटा आहे, लहानपणी अभ्यास घेण्यापासून , IIM ला MBA करताना मार्गदर्शन ,ते स्वराला संभाळण्यापर्यंत, आणि तो तसाच राहणार आहे. खरंतर आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, हा विश्वासच खूप स्फूर्ती देऊन जातो. त्या खात्रीनेच मानसिक बळ येतं , खूप काही नवीन करण्याची ऊर्जा येते. त्यामुळेच आज मी नोकरीबरोबरच नियमितपणे ब्लॉगवर लिहिते, निबंध - वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेते. मी बाबांबरोबर भौतिक प्रवास किती केला हे आठवत नाही, पण आयुष्याच्या प्रवासात ते सतत माझ्या सोबत होते, अगदी कितीही चढ ऊतार आले तरी.

माधुरी दीक्षित च्या हल्लीच्या बकेटलिस्ट या चित्रपटात " होऊन जाऊ द्या " या गाण्यातले हे शब्द आहेत " वाटेवरी जरी काटे किती तरी ,तुला फिकीर ना कशाची भीती" . मला माझ्या आयुष्यातल्या स्वप्नांची बकेटलिस्ट कितीही काटे असले तरी कशाची भीती न बाळगता पूर्ण करण्यासाठी पाठीशी उभ्या असणाऱ्या बाबांना "हैप्पी फादर्स डे ". त्यांच्यामुळेच मी कुठल्याही कठीण प्रसंगाला "होऊन जाऊ द्या" असं म्हणत कणखरपणे सामोरी जाऊ शकते
"

-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com

Tuesday, June 19, 2018

मी एक पास / नापास आई ?

स्वरा - " आई मला टिकली लाव न गं "

मी बॅगेतुन एक टिकलीचं पाकीट काढून त्यातली एक टिकली तिला लावली.

स्वरा - " आई , ही नको , ती शुभांगी सारखी टिकली लाव न गं "

मी - " अगं कोण ही शुभांगी , आता ही टिकली  लाव न "

स्वरा - " अगं ती शुभांगी , ती टी . व्ही वर असते ती , ती मोठी टिकली लावते ती "

अरेच्चा , माझ्या आत्ता लक्षात आलं, ती शुभांगी गोखलेंबद्दल म्हणत  होती .मागे श्रीयुत गंगाधर टिपरे यांचे जुने एपिसोड्स बघताना ती शामल म्हणजे  शुभांगी असं मी  म्हणाले होते .

तर असो . गेले दोन दिवस मी "शुभांगी " टिकली आणायला विसरतेय . आज घरी जाताना मी  नेली म्हणजे पुरे. नाहीतर मला प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं  जावं  लागेल..
" आई तू टिकली का नाही आणलीस ?
आई  तू का विसरलीस?
आई आता जाऊया का आणायला?
आता का  नकॊ जाऊया आणायला? "

या  आणि  अशा अनेक प्रश्नांना घरी पाय ठेवताक्षणी उत्तर देताना हे‌ प्रश्न मला कुठल्याही बोर्डच्या परीक्षेपेक्षा नकोसे वाटतात. यात आपण नापास होण्याचीच शक्यता जास्त.

हाच विचार करता करता आपलं बालपण आठवतं. आपणही आपल्या आईला अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यायला  लावली होती. आता स्वतः आई झाल्यावर ते किती कठीण होतं ते कळलं.

पु ल एकदा एका कथेत म्हणाले होते - "मी एक नापास आजोबा"

आता मला वाटतं मी एक आईपणात नापास होण्याची भीती बाळगणारी आणि पास होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी आई आहे .
 आणि हो आईपणात पास झालेल्या  आयांना माझा सलाम!

#dsaidso #marathi

-धनश्री

Sunday, March 11, 2018

मेरी मर्ज़ी!

माझ्या मुलीला नटायला वगैरे खूप आवडतं. काल रात्री ती झोपताना बांगड्या घालायला मागत होती. मी तिला विचारलं- " अगं रात्री बांगड्या का घालतेस गं?" तेव्हा ती मला म्हणाली " मला आवडतात गं घालायला "
अजून एका प्रसंगी ती खूप टिकल्या लावत होती . मी जेव्हा तिला विचारलं " अगं अशा इतक्या टिकल्या कोण एका वेळेला लावतं का गं ?"तेव्हा ती मला म्हणाली " मला आवडतात गं लावायला म्हणून लावते"
असे जेव्हा मी तिला प्रश्न विचारते " हे का करतेस असं " तेव्हा तिचं "मला हे आवडतं " असंच बहुतांश वेळेला उत्तर असतं. कोणी मस्करीने प्रश्न विचारला किंवा अगदी सहज सरळ विचारला तरी तिचं उत्तर एकच.प्रत्येकच वेळेला असं मला आवडतं हे उत्तर कितपत बरोबर आहे हे मला माहित नाही. पण आपल्याला कोणी खवचटपणे मुद्दामून प्रश्न विचारला तर असं ठामपणे उत्तर द्यायला आलं पाहिजे. अगदी बिनधास्त आणि बेधडकपणे !!
शेवटी गोविंदाने म्हटल्याप्रमाणे " मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू मेरी मर्ज़ी" 

Tuesday, December 5, 2017

आज पु .ल असते तर..

पु. ल . देशपांडे हे प्रत्येक मराठी माणसाचे लाडके. आज पु. ल  असते तर काय बोलले असते हा प्रश्न सतत पडतो. मी माझ्या मुलीसाठी नर्सरी शाळा शोधताना अनेक मजेशीर अनुभव आले. ते अनुभव मी पुलंच्या शब्दात मांडले आहेत.
संदर्भ : पुलंचा "नवीन घर मालकांचा उत्साह". त्याची  ही लिंक आहे:  https://www.youtube.com/watch?v=dAEe3WtwgPE

आज पुलं असते तर मुलांच्या नर्सरी प्रवेशाबद्दलचे अनुभव  ते कसे बोलले असते? वाचा पुढे

सोयी हा तर शाळेतल्या  लोकांचा माहिती देतानाचा उच्छाद असतो. सोयी, काय सोयी केल्या आहेत?. Visiting faculty, extracurricular activities, field trips, creative development , learning cum creativity, creativity cum fun,माती कम दगड , एक ना  दोन. शाळेला A.C.  किती आहेत आणि वीज गेल्यावर generator कसा चालू होतो आणि मुलांना घाम कसा येत नाही याचंच कौतुक. एका उत्साही शाळेच्या  मुख्याध्यापकाने तर आपण मुलांना सगळी कामं कशी करायला शिकवतो  म्हणून  झाडू मारायला शिकवतो असंही सांगितलं होतं . झाडू कोणाला मारायला शिकवतो हेच फक्त सांगितलं नव्हतं . मी जरा भांबावलोच.

 All- round development , Visiting faculty, extracurricular activities, field trips, creative development यापैकी काहीही न बोलता शाळा दाखवणारा जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा. मी टिळक किव्वा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे. आणि मालकीण असली तर... तर काही नाही हिच्याकडून ओटी भरून घेईन..

मुलीच्या शाळेचं बघताना मी अशा लोकांच्यात नेमका अडकतो. नुसतं एखाद्याने सगळ्या सोयींसकट शाळा दाखवली तरी  चालेल. पण दाखवताना आणि सांगताना नुसती परीक्षा घेत असतात. मला एका शिक्षकाने विचारले " तुमच्याकडे  तुमच्या मुलीच्या  प्रोजेक्ट साठी  वेळ द्यायला असेल ना?" मी हा प्रश्न टाळण्यासाठी "वेळ असेल का ते वेळ आल्यावर बघू  " असं सांगितलं . पण नाही इथवर ते थांबत नाही, लाखभर फी घेऊन लाखभर प्रश्न विचारायचा पगार मिळत असावा त्यांना. "अहो तुमच्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे".... मी म्हणालो " मुलीचं भवितव्य माहित नाही, पण हे सगळं बघून मला माझ्या भवितव्याबद्दलचे प्रश्न पडले आहेत. आपण नक्की काय करतोय, ऑफिस मध्ये प्रोजेक्टचे काम करून पैसे कमावतोय, तीच भरपूर रक्कम शाळेसाठी मोजतोय आणि मग त्यांचे प्रोजेक्टही आपणच करतोय.. ?"

-धनश्री 

Sunday, December 3, 2017

झटपट स्वयंपाक - गुळाचे पोळे

मी माहेरची सारस्वत आहे. सारस्वतांचे जेवण म्हणजे खोबऱ्याचे वाटण आणि जेवणाचे चोचले.वन-बोल मील हा प्रकार तर नसतोच. चपाती भाजी भात आमटी आणि सोलकडी/ताकाची कडी. अगदी संध्याकाळी भरपूर खाल्लेलं असेल तरी भात जेवल्याशिवाय झोपायचं नाही. आता काळानुसार काही पद्धती बदलायला लागल्या आहेत. आणि घरा-घरानुसार तर पद्धती बदलतात. 
ही सगळी प्रस्तावना देण्यामागचं कारण असं कि सारस्वत पद्धतीचं जेवण मला जरा वेळखाऊ असतं . त्यामुळे माझ्या आईने जेव्हा मला एक सोपी रेसिपी दिली तेव्हा मला अगदी मस्त वाटलं. ही रेसिपी आहे गुळाच्या पोळ्यांची. पोळे म्हणजे आपण धिरडी म्हणतो तसंच . माझी आई म्हणते शाळेतून आल्यावर जेव्हा त्यांना भूक लागायची तेव्हा आजी तिला हे पोळे करून द्यायची. तर यांची कृती याप्रमाणे. -
जितकं कणिक घ्याल तितकंच गुळ घ्या. गुळाचा पाक आधी करून घ्या. पाक करताना थोडंसं पाणी घाला. पाक थंड होईपर्यंत एका भांड्यात कणिक काढून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घाला. पाक करून झाल्यावर थंड होऊन द्या. थंड झाल्यावर कणकेत घाला. मस्त एकत्र करा, पाणी कमी जास्त करा आपल्या सोयीप्रमाणे . या पिठाची consistency साधारण आपल्या डोश्यांचा पिठाप्रमाणे असावी. पीठ तयार झाल्यावर नॉन- स्टिक पॅन वर थोडंसं तूप लावून डोश्याप्रमाणे हे पोळे काढा.
हे पोळे संध्याकाळच्या खाण्यासाठी मस्त आहेत. कधी ऑफिसमधून आल्यावर काही करायला वेळ नसेल तर हे अगदी पटकन होतात. फक्त दोन प्रमुख घटक पदार्थ - कणिक आणि गुळ.
-धनश्री 

Sunday, November 26, 2017

चला स्वयंपाक करूया ...

घरात book असो वा नसो पण एक कूक हवा अशी सध्या बहुतांश घरांची परिस्थिती आहे. नोकरी आणि स्वयंपाक दोन्ही कसा जमणार म्हणून कूक तर हवाच , यात थोडंफार तथ्य आहेच. पण माझ्यासाठी कूक अपरिहार्य असणं ही संकल्पना बऱ्यापैकी नवीन आहे. माझी आई सकाळी ७:४५ वाजता घरातून निघायची. त्याआधी ती २५-३० चपात्या, अर्धा किलो भाजी ,भात अामटी करून निघायची.
आता मात्र आजूबाजूला बघितलं तर वेगळंच चित्र दिसतं. एक दिवस घरातील स्वयंपाकी नाही आली तर लोकांची अगदी तारांबळ उडते . एकदाचही जेवण त्यांना करणं अशक्य वाटू लागतं. पूर्ण दिवसाचा स्वयंपाक एकट्याने करणं कठीण असेल पण एकदाचा स्वयंपाक आता का जमेनासा झालाय? याचं एक कारण तरी आपली स्वयंपाकाबद्दलची मानसिकता. स्वयंपाक म्हणजे एक कंटाळवाणी वेळखाऊ गोष्ट आहे असा समज रूढ होतोय. त्यात "एवढं तू कमावतेस मग तू घरातला स्वयंपाक करत बसणार का?",असले बुरसटलेले विचार. स्वयंपाक करणं आणि कमावणं याचा परस्पर विरोधी समंध आहे असा सामाजिक दृष्टिकोन. आपल्या घरचा स्वयंपाक आपण करणं अगदी " down - market " , " non-glamorous" असा समज धृढ होऊ लागलाय.
या उलट आपण स्वयंपाक करणं याचा एक " stress- buster " म्हणून विचार करायला हवा. मला तरी स्वयंपाक करणं हा मस्त change वाटतो. ऑफिसचं काम दिवसभर असतंच , स्वयंपाक हा वेगळा creative change आहे. साग्र -संगीत स्वयंपाक कठीण आहे. पण सुरुवात करायला दिवसातून एकदा एक सोपा पदार्थ करायला घ्यायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल घरी माझ्या संपूर्ण दिवसाचा स्वयंपाकी आहे, तर मला काय गरज? आपल्याला स्वयंपाक करायला आला तर आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास येतो. गरज पडली तर आपल्याला आपण हवं तसं आपल्या चवीप्रमाणे करून घेऊ शकतो.आपल्या घरच्या खाद्य संस्कृतीचा वारसा आपण असाच पुढे नेऊ शकतो.
घरी स्वयंपाक करणं याचे अनेक फायदे आहेत. सुप्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचं म्हणणं हेच आहे,आपलं पिढीजात आणि ऋतूप्रमाणे घरचं जेवण हे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
माझं हे पोस्ट वाचणाऱ्यांमध्ये अनेक सुग्रणी असतील ज्या अगदी नित्यनेमाने उत्तम स्वयंपाक करत असतील. त्यांच्यासाठी हे पोस्ट नाही आहे. माझ्या आयुष्यात मी माझ्या घरातल्या अशाच सुग्रणींकडुन शिकलेय. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मला हे पोस्ट यासाठी लिहावंसं वाटलं कारण कुठेतरी मला असं वाटतंय की स्वयंपाक करणं ही शिकलेल्या लोकांनी न करण्याची गोष्ट असा समज होत चाललाय . यात काहीच तथ्य नाही. आरोग्य राखायचं असेल तर घरच्या स्वयंपाकाला पर्याय नाही- तुम्ही करा नाहीतर स्वयंपाक्यांकडून करून घ्या. पण वेळे-गरजेला आपल्याला करायला यायला हवाच.
मी सध्या फेसबुक वरती " अंगत -पंगत " नावाच्या ग्रुपची सदस्य आहे. त्या ग्रुपमधील सदस्य छान-छान रेसिपीस share करतात. बघून शिकण्यासारखं असतं . आज मी ग्रुपवरच बघून "वरणफळं " केली. वरणफळं म्हणजे आमटी शिजताना त्यात शंकरपाळीच्या आकाराची कणिक टाकायची.मुलांना द्यायला  अगदी मस्त.  चपाती आणि डाळ  दोन्ही खाल्लं जातं , एका डिशमध्ये.
.- धनश्री

Sunday, October 29, 2017

खाऊ, कापी आणि आठवणी



"सारस्वत लोकं खाण्यासाठी जगतात" खूप वर्षांपूर्वी एका समारंभात ऐकलं होतं. मी माहेरची सारस्वत आहे आणि माझ्याबाबतीत तरी हे वाक्य १००% खरं आहे. मला खाण्याची प्रचंड आवड आहे, त्यात सर्वात आवडता स्वयंपाक म्हणजे अस्सल सारस्वती पद्धतीचा स्वयंपाक. अर्थात मला ब्राह्मणी पदार्थ सुद्धा आवडतात, करायला आणि खायला सुद्धा. खाण्याची आवड, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं असा नव्हे. याचा अर्थ म्हणजे माझ्यासाठीतरी चविष्ट खाणं असा आहे. मीटिंग होती म्हणून खायचं विसरले असं माझ्याकडून होणारच नाही. उलट मीटिंग लांबेल या भीतीनेच मी आधीच खाऊन घेते.
अगदी लहानपणापासून आई, आत्या, आजीकडून खाण्याचे मस्त लाड पुरवले गेले.चपाती भाजी भात आमटी कडी तर असायचीच त्याशिवाय कधीतरी जे तोंडी लावण्यासाठी अन्य प्रकार केले जायचे त्यातला एक प्रकार म्हणजे कापी. माझी आत्या अगदी उत्कृष्ट कापी बनवते, दर आठवड्याला ती आमच्यासाठी बनवायची. आमच्याकडे जास्तीकरून बटाट्याचे कापी व्हायचे , पण वांग्याचे , केळ्याचे , सुरणाचे सुद्धा काप केले जातात.
कापी हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. बटाटे उभे चिरून, धुऊन मीठ लावून ठेवायचे. थोड्या वेळाने लाल तिखट लावून घ्यायचं. आणि मग ते काप तांदळाच्या पिठात भिजवून पॅनवर shallow fry करायचे. बटाटे शिजले की मस्त कापी तय्यार.माझ्या लेकीलासुद्धा कापी खूप आवडतात. आज तिच्यासाठी वरण भात आणि कापी केल्या. तिने " मस्त झालंय" असं सांगितलं. लेकींकडून प्रेमाने कौतुकाची थाप मिळाली. अगदी मस्त वाटतंय.
- धनश्री 

Friday, October 13, 2017

रोज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

७ मे २०१५ या दिवशी माझ्या लेकीचा सकाळी ९:३० च्या सुमारास जन्म झाला. साधारण १०:१५ च्या दरम्याने माझ्या डॉक्टरने दूध द्यायला तिला माझ्या जवळ आणले. तेव्हा माझी डॉक्टर जे वाक्य बोलली ते माझ्या अजून लक्षात आहे. ती म्हणाली" You have to feed your baby after every 2 hrs. And you have to sleep when she sleeps. You have to wake up when she wakes up" हे वाक्य ऐकून मला जरा टेन्शन आलं, आपल्याला बाळाप्रमाणे कसं झोपायला जमणार? झोप मला अति प्रिय. याचा अर्थ मी सकाळी उशिरा उठते असं नाही. मला कॉलेजमध्ये असताना सकाळी ५ ला उठून अभ्यास करण्याची सवय होती. पण म्हणून मी रात्री १० ला झोपायचे. वर्षानुवर्ष मला साधारण १० वाजता झोपण्याची सवय. लेक जेव्हा जन्माला आली तेव्हा रात्री दर दोन तासांनी ती दुधासाठी उठायची. मग तिला दूध पाजून झोपायचे. आता मात्र गेले काही महिने चित्र बदललयं. माझी लेक बऱ्याचंदा रात्री १२- ०१ च्या मध्ये झोपते. आज १२ ला जरा पडल्यावर मला म्हणाली, "आई लाडू दे, भूक लागलीय" . चक्क तिला मध्यरात्री लाडू भरवला आणि झोप झोप करत काही मिनिटांपूर्वी झोपवलं. मी IIM मध्ये असताना सुद्धा कधी जागरण केलं नव्हतं पण आता मात्र आईच्या भूमिकेत जणू काही जागरण रोजचंच झालंय.आणि जणू काही वर्क शक्ती मला या जागरणाचे बळ देतेय, दुसऱ्यादिवशी परत ५:३०-६ ला उठण्याचं

Sunday, October 8, 2017

फोन कधी करावा? - लेक माझी शिक्षक

माझ्या नवऱ्याने लेकीला सकाळी ८:३० च्या सुमारास फोन केला. तेव्हा ती नुक्ती आळस देऊन उठत होती. तिने माझ्या नवऱ्याला सांगितलं "बाबा, मी ब्रश लावते, तोंड धुते मग तुला फोन करते. " आणि असं झाल्यावर तिने फोन ठेवला. 
काय मस्त उत्तर होतं ते. 
कधी कधी आपल्याला कधीच फोन न करणारे लोक मुद्दामून कामाच्या वेळेला फोन करतात. बरं केला म्हणून काहीच हरकत नाही कारण फोन तर झटपट संवादासाठीच असतो. पण फोन केल्यावर ह्यांचे काहीतरी नसते प्रश्न किव्वा सल्ले असतात. मग अशा लोकांना कसं थांबवायचं आणि नाही म्हणायचं याला मला तरी संकोच वाटायचा . कधी थेटपणे उत्तर देता आलं नाही. पण आज हे मी माझ्या लेकीकडून शिकले. सरळ सांगायचं कामात आहे म्हणून:) 
- धनश्री

Monday, September 18, 2017

First impression is the last impression

First impression is the last impression-या वाक्यावर माझा खूप काही विश्वास आहे असं नाही. पण लेकी बरोबरच्या दोन - तीन अनुभवांनंतर मला हेच वाटलं..
पहिला अनुभव-
लेकीला बिल्डिंगच्या खाली खेळायला घेऊन गेले होते. तिकडे मुलं बॅडमिंटन खेळत होती.
लेक: दादा काय खेळतोय?
मी: बॅडमिंटन. ( रॅकेट कडे दाखवून) याला रॅकेट म्हणतात
लेक: ( जोरात ओरडून) मच्छर मारतात याने!
आमच्या घरी मच्छर मारायला रॅकेट आहे. त्यामुळे तिला मी कितीदा समजावलं की ते आणि हे रॅकेट वेगळं आहे. पण ती समजेच ना. मग तिला एक उदाहरण देऊन समजावलं. तिच्या ओळखीतली अद्वैत नावाची दोन मुलं आहेत. तिला मी सांगितलं ते दोन अद्वैत दादा कसे वेगळे आहेत तसे हे दोन रॅकेट वेगळे आहेत. तेव्हा कुठे तिला ते पटलं.
दुसरा अनुभव
पंजाबी ड्रेस च्या साल्वारीला नाडी घालायची होती. त्यासाठी पांढरी नाडी काढली. ती बघून लेकीचे उद्गार होते " mobile charging" . कारण माझा charger सुद्धा तसाच पंधरा लांबलचक आहे.
या दोन्ही मजेशीर अनुभवानंतर मुलांच्या बाबतीत तरी "First impression is the last impression" मला पटले. 🙂

Wednesday, August 16, 2017

लेकी बरोबर गप्पा

लेकी बरोबरचे काही मजेशीर प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
प्रश्न: बाबा काय करतो गं?
लेकीचं उत्तर: ऑफिसमध्ये जातो, काम करतो, gems आणतो, बॉडी लोशन आणतो, कँडी आणतो
प्रश्न: आई काय करते गं?
लेकीचं उत्तर: ऑफिसमध्ये जाते, काम करते, केक आणते, लाडू आणते
प्रश्न : बाबाला काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: gems
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: कँडी
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: चॉकलेट
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर:( थोडसं चिडून) बस्स अजून काही नकोय!
लहान मुलांचं काय मस्त असतं नाही, आपल्याला काय हवं ते किती पक्कं आहे स्वराच्या मनात.
बाकी काही असो वा नसो, आम्ही chocolate आणि gems आणण्यासाठी नोकरी करतो ही गोड जाणीव आम्हाला स्वरा करून देते!
-धनश्री

Monday, August 7, 2017

संगीत संस्कार

माझा १९८०च्या दशकातील जन्म. मी इंटरनेटच्या आधीचं आयुष्य अनुभवलंय, आमच्याकडे तर फोन सुद्धा मी ७ वर्षांची असताना आला होता.त्याआधी अगदी दादरला आजीला फोन करायचा असेल तर आम्ही PCO मध्ये जाऊन फोन करत होतो. मला वाटतं की २०००च्या नंतरच्या पिढीला तर PCO म्हणजे काय हेच सांगावं लागेल.असो. मी लहान असताना गाणी ऐकायची असतील तर प्रामुख्यानं दोन साधनं होती- रेडिओ आणि टेप रेकॉर्डर. टी. व्ही. वर पण गाणी लागायची पण ती ठराविक वेळी. चित्रहार, छायागीत नंतर डी.डी. मेट्रो आल्यावर सुपरहिट मुकाबला हे गाण्याचे प्रसिद्ध आणि प्रेक्षकांचे लाडके कार्यक्रम. रेडिओवर प्रामुख्याने विविध भारती ऐकलं जायचं. टेप रेकॉर्डरवर आपल्याला हवी ती कॅसेट लावून गाणी ऐकता येत असायची. माझ्या आईला गाण्यांची खूप आवड, आणि त्यातही जुन्या गाण्यांची, भावगीतांची जास्त आवड. माझी आई गाण्यांची यादी बनवून दादरच्या एका दुकानात देत असे. मग ते लोक ती गाणी एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून देत असत. याचा फायदा असा होता, की तुम्हाला एका चित्रपटातलं एकच गाणं हवं असेल तर पूर्ण कॅसेट विकत न घेता, वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी एका कॅसेटमध्ये मिळायची.शनिवार- रविवार आमच्याकडे टेप रेकॉर्डरवर गाणी चालू असायची. आपल्याला हवं ते गाणं एका "click " ने मिळण्याइतकं सोपं नव्हतं. त्यामुळे एकदा कॅसेट सुरु झाली की ती संपेपर्यंत ऐकायची. 
असं असल्यामुळे नकळतच मला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकण्याची सवय लागली. हे गाणं असं का, संगीतकार कोण, त्या गाण्याची पार्श्वभूमी काय हे घरी चालू असलेल्या चर्चेमुळे कळायचं. रिमझिम पाऊस पडे सारखा, तुझ्या गळा माझ्या गळा, मधुबन में राधिका, राधा ना बोले ना बोले ना बोले रे अशी अनेक गाणी आमच्याकडे कॅसेट मध्ये होती. आताची मुलं जसा chu-chu TV वरची गाणी लावण्याचा आग्रह धरतात तसं त्याकाळी शक्यच नव्हतं. जे गाणं चालू आहे ते ऐकायचं. लहानपणी ऐकलेलं जास्त लक्षात राहतं आणि अजूनही आठवतं.
आता मात्र काळ खूप बदललाय. आपल्याला हवं ते गाणं आपल्याला एका mouse click ने मिळतं.आपण तसं करत असल्यामुळे मुलांनाही ते कळतं, हवं ते गाणं लावणं किती सोपं आहे ते. त्यामुळे मुलंही त्यांना आवडीचं गाणं लावण्याचा आग्रह धरतात. असं असताना वेगवेगळा संगीताचा अनुभव ते कसा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्यापरीने मी माझ्या लेकीला हल्ली रोज रात्री झोपताना एक जुनं मराठी गाणं ऐकवते. ती तेव्हा म्हणते "हे नकोय" , पण तरीही मी ते गाणं चालू ठेवते. जुनी गाणी ऐकून त्याची आवड निर्माण व्हावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपला सांगीतिक इतिहास माहित असावा असं मला जरूर वाटतं. कुठल्याही पुस्तकातून तो समजू शकतोच पण त्या शिक्षणाची सुरुवात जर लहानपणीच्या अनुभवातून, संस्कारातून झाली तर बरं नाही का?
--धनश्री

Monday, July 24, 2017

जबाबदार कोण?

" काय बाई हिला नोकरी करायला काय झालं, संसाराला जरा हातभार नाही लागणार का?
मुलांच्या शिक्षणाला हल्ली किती खर्च येतो. "
"दिवसभर नुसती ऑफिसमध्ये असते. हिच्या मुलांवर संस्कार कोण करणार? नुसते पैसे मिळवले आणि शाळेची फी दिली म्हणजे झालं का?"
वरील दोन्ही परस्पर विरोधी विधानं आपण कित्येकदा ऐकतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे कोणी सांगायचं? कुठल्याही घरातील संपूर्ण परिस्तिथी माहित असल्याशिवाय आपण काय बरोबर आणि काय चूक हे सांगू शकत नाही. मुळात हे सांगण्याचा बाहेरच्या माणसाला हक्कच नाही.
मनीषा म्हैसकर ह्यांच्या मुलाच्या आत्महत्येवरून पालकत्वाचे धडे whatsapp वरून गिरट्या घालत होते.त्यांचं कुठे चुकलं किंवा मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे मुलाला वेळ देता आल्यामुळे हे सगळं झालं इत्यादी इत्यादी सांगणारे . माझी त्या धड्यांबद्दल जी काही मतं आहेत , ती आपण पुढे बोलूच. फक्त ते धडे देणारे/ फॉरवर्ड करणारे जे कोण आहेत त्यांच्याबद्दल मला भारी मजा वाटतेय. ते धडे त्यांच्या आयुष्यात ते किती पाळतात हे आधी बघावं . आणि मग दुसऱ्यांना शहाणपण शिकवावं.
माझी आजी म्हणायची "दुसऱ्या शिकवेब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण"
कॉलेज मध्ये असताना मनीषा म्हैसकर माझ्यासाठी एक यशस्वी स्रीचं प्रतीक होत्या. माझी मावशी हाफकिन इन्स्टिटयूट मध्ये नोकरी करायची. ती हाफकिन डायरेक्टर सौ. मेधा गाडगीळ यांची सेक्रेटरी होती. मेधा गाडगीळ स्वतः IAS अधिकारी असल्यामुळे मावशीची कामानिमित्त बऱ्याच IAS अधिकाऱ्यांशी भेट- गाठ व्हायची. तसंच ती एकदा मनीषा म्हैसकर यांना भेटली होती. अतिशय प्रभावी आणि हुशार व्यक्तिमत्त्व असं मावशीचं मनीषा म्हैसकर बद्दल मत झालं. त्यामुळे मनीषाताईंबद्दल त्यांची हुशारी, कर्तबगारीता हे चांगले गुण मी लक्षात घेतले. मुख्य म्हणजे लहानपणापासूनच असे संस्कार आहेत की दुसऱ्यात जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं.मनीषाताईंबद्दल ऐकून वाचून त्या माझ्यासाठी एक आदर्श स्री होत्या.
मनीषा ताईंच्या पालकत्वाचे पोस्ट मॉर्टेम करणारे जे messages whatsapp वर फिरता आहेत, त्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. पण हे मुद्दे लगेच त्यांच्या पालकत्वावर ताशेरे नं ओढता, सहज चर्चेचा विषय होऊ शकतात. आणि त्यांची चर्चा लगेच दुसऱ्या दिवशी कशाला?त्यांना जरा श्वास घेऊ द्या. IAS अधिकारी म्हणजे त्यांचं मुलांकडे वेळ नसल्यामुळे लक्ष नसणार हे आपण कसं गृहीत धरू शकतो?घरी असणारे किती पालक आपल्या मुलांना वेळ देता आहेत? मुलांना वेळ देणं आणि नोकरी करणं ह्या "mutually exclusive " events नाही आहेत.
आता हा मी "Co -ordinate geometry " सारखा "graph " बनवला आहे

त्याचे चार भाग आहेत पुढील प्रमाणे:
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे /व्यवस्थित संगोपन करणारे पालक
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे /व्यवस्थित संगोपन करणारे पालक
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे पालक
बहुतांश लोकांचा असा समज असतो की फक्त दोनच प्रकारचे पालक असतात ते म्हणजे किंवा सारखे. आणि सारखे पालक असू शकतात असं लोकांना वाटतंच नाही.
आता हे खरं आहे की नोकरी करणारे पालक घरी राहणाऱ्या पालकांपेक्षा वेळ कमी देऊ शकतात. पण घरी आल्यावर ते वेळ देत नसतील कशावरून? आणि नोकरी करणारे पालक असणारा वेळ मुलांसोबत सक्रियपणे घालवतात हे कशावरून? कशावरून ते बाहेर फिरायला जात नसतील?
मुळात मूल कसं निपजतं ह्याच्यावरून आपण पालकत्वाची प्रगतिपुस्तके लिहू शकत नाही. आपण फक्त दुरून निष्कर्ष बांधू शकतो. खूप कष्ट घेऊन सुद्धा मुलं चांगली निपजतील असं नाही. आणि काही करून सुद्धा काही मुलं अगदी व्यवस्थित निघतात. कारण मुलांच्या जडणघडणीत जरी आई वडिलांचा वाटा मोठा असला तरी आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी मुलांवर कळत नकळत संस्कार करत असतात. याचा अर्थ आपण मुलांकडे लक्ष देऊ नये असं नाही. आपण आपल्या परीने मुलाचं अगदी व्यवस्थित संगोपन करावं. पुढे काय घडेल हे आपण सांगू शकत नाही.आपण आपल्याला जे जमतं ते अगदी करावं आपल्या मुलासाठी . त्याचं मोजमाप आपल्याला रात्री लागणारी झोप असते. आपण आपली कर्तव्य व्यवस्थित करत असू तर आपण अगदी शांतपणे झोपू शकतो.
मला वाटतं काही लोकांना कुणाचं चांगलं बघवतच नाही. मनीषा आणि मिलिंद म्हैसकर हे करिअरच्या दृष्टीने एक यशस्वी जोडपं होतं. त्यांच्यात चुका काढण्यासारखं अजून काही समाजाला मिळत नव्हतं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली - झालं त्यांच्यावर ताशेरे ओढण्याचं जणू काही कारणंच मिळालं.
आता हेच बघा एक दुसरी बाजू. मनीषा म्हैसकर ह्याऐवजी एक गृहिणी असती. अगदी आपल्या संसारात रमणारी , नवरा मुलं बाळांना बघणारी. तिच्या मुलाच्याबाबतीत असं काही झालं असतं तर लोकांनी म्हटलं असता "काय ही सारखी घरी असायची. मुलांच्या गरजा बाहेर पडल्याशिवाय कशा कळणार? " ठपका ठेवायचा असेल तर तो कसाही ठेवता येतो
शेवटी मला अमर प्रेम मधील हे गाणं आठवतंय:
"
कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों को.."

--धनश्री

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...