Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Wednesday, June 12, 2019

आजी


"काहीतरी बोलूया " ही माझ्या लेकीची नेहमीची मागणी .  मी इतकी बडबडी आहे, पण तो रेकॉर्ड आता माझ्या मुलीने तोडला आहे. एकतर फक्त तिने बोलले पाहिजे किंवा फक्त तिच्याशी लोकांनी बोलले पाहिजे हा अट्टाहास. रात्री झोपताना माझ्याकडून कुठली गोष्ट ऐकायची आणि बाबाकडून कुठली हे तिच्या मनात पक्क ठरलेलं . अशा माझ्या अनेक गोष्टींपैकी तिची आवडती गोष्ट म्हणजे सरस्वती आजीची गोष्ट . सरस्वती आजी म्हणजे माझी आजी, मी तिला आजीच म्हणायचे, लोक तिला ताई आजी म्हणायचे. स्वराने तुझ्या आजीचे नाव काय असे मला विचारले आणि तिचे नाव सरस्वती असे सांगितल्यावर ती स्वरासाठी सरस्वती आजी झाली.  आजी मुळात मालवणी बोलायची आणि आमच्याशी मालवणी मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित मालवणी. मालवणी भाषा ही  कोकणी आणि मराठी या  दोन भाषांच्या मधली भाषा म्हणायला हरकत नाही. मधली म्हटलं कारण ती थोडीफार मराठी आणि थोडीफार कोकणी सारखी वाटते. मालवणी बद्दल लिहिण्याचं कारण हे - माझी आजी काही मालवणी म्हणी सांगायची ज्याचा या काळातसुद्धा उपयोग पडतो, अर्थ लागू होतो.               रोजच्या व्यवहारात त्याची आठवण नेहमी येते.

 स्वराला जेव्हा सरस्वती आजीच्या गोष्टी ऐकायच्या असतात तेव्हा मी तिला आमचे रोजचे किस्से तर सांगतेच, त्याचबरोबर या म्हणीसुद्धा सांगते. एका दिवशी एक  म्हण आणि त्याचं उदाहरण अशी साधारण आमची गोष्ट असते.  तिला गोष्ट सांगताना  नेहमी असं वाटतं कुठेतरी हे लिहून काढावं . पण आजीच्या इतक्या आठवणी भरून येतात की लिहिणं काही होत नाही. एक  लिहायला घेतलं कि दहा गोष्टी आठवतात , आठवणीत, जुन्या काळात जाऊन, आजी नाही याचं  दुःख होतं  आणि मग लिहायला जमत नाही.  पण आज ठरवलंच या लिखाणाला सुरुवात करायची. या विषयावर किती सातत्याने लिखाण होईल हे माहित नाही पण आज सुरुवात करतेय.

आजीला कुठलीही गोष्ट फुकट गेलेली आवडायची नाही. याचा अर्थ ती कंजूस होती असा नसून ती व्यवहारी होती असा आहे. उदाहरणार्थ - लहान असताना माझ्याकडे भरपूर खेळणी आणि कंपासबॉक्स होते. मला या दोन्ही गोष्टींची आवड. एवढ्या वस्तू असूनसुद्धा मी अजून त्यात काय नवीन दिसलं तर मला हवं  असायचं .. एकदा तर मी business हा खेळ घरी असताना अजून एक वेगळ्या पॅकिंग मध्ये business दिसला म्हणून घेण्याचा हट्ट धरला. शाळेच्या result  नंतर मला आजोळहून गिफ्ट असायचं. त्याप्रमाणे  मी माझ्या आजोबांना  business घ्या  असं सांगितलं . घरी आल्यावर आजीने " घरी एक खेळ असताना दुसरा कशाला?" असं थोड्याफार रागातच विचारलं. एकसारखेच दोन खेळ, फक्त थोडेफार वेगळे दिसतात म्हणून घ्यायचे हे तिला पटतच नव्हतं. मी मात्र नवीन आणलेल्या खेळाबद्दल आजी बोलल्याने हिरमुसून बसले होते. मग थोड्यावेळाने आजीने माझ्या जवळ येऊन माझी समजूत काढली .ती म्हणाली" अगो धनु, अशे पैशे फुकट घालयणात नाय. आपल्याकडे पैसे नसले तर आपणाक कोणी विचारुचो नाय. बरा असताना सगळे येतीत पण गरज असताना कोण्णेक धावून येवचो नाय"  तेव्हा हे ऐकताना फारच old-fashioned वाटत होतं . एक खेळ  घेतल्याने काय येवढं बिघडणार आहे असं वाटायचं . त्यावर आजीचं म्हणणं एक खेळ घेण्याबद्दल नसून या वृत्तीबद्दल होतं‌‌ असं ती म्हणाली. तिचं अजून एक म्हणणं होतं ते म्हणजे असे फुकट पैसे घालवण्यापेक्षा गोरगरिबांना मदत करावी.

माझी आजी २००६ साली गेली. आता तिला जाऊन बरीच वर्ष  झालीत.  आता मात्र एवढ्या वर्षात आजीचं बोलणं १००% पटलं. पैशाची चणचण कधीच भासली नाही पण  आपली  आर्थिक आणि सामाजिक स्थिती कळल्यावर लोकांच्या वागण्यात बदल होतो हे लक्षात आलं. "खर्च करायला काय झालं, पैसे तर येतच राहणार" असं म्हणून स्वत:चे पैसे राखून दुसऱ्याला चढवणारे आणि खर्चात पाडणारे भेटले, की आजीच्या शिकवणीची आठवण येते.
आपल्याकडे सगळं असताना लोक कसे वागतात आणि आपल्याला गरज असताना लोक कशी पाठ फिरवतात याचा अनुभव घेतला.  आपल्याला गरज नसताना, सगळं छान चालू असताना  सगळेच येतात. त्यातले जे कठीण प्रसंगात येतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात , तेच खरे आपले. याचा मला प्रत्यय अगदी सारखा येतो आणि आजीची आणि तिच्या असंख्य म्हणींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

आज पुलंचा स्मृतिदिन. पु ल सुद्धा म्हणाले होते " मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची  वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते."

-धनश्री

Thursday, January 10, 2019

My fashionista

आमच्या घरी जणू काही रोज फॅशन  शो चालू असतो. माझी लेक स्वरा रोज छान छान बाहेर घालायचे frill  चे  frock, चनिया चोळी असे कपडे घरी घालून असते. आज तर तिने पॅन्ट वर चनिया चोळी चा backless ब्लाऊज घातला होता.

" अगं स्वरा backless का  घातला आहेस? ठंडी नाही वाजत का?" अस मी विचारलं.

" अगं ओरडते कशाला? बोलून उपयोग काय.. ऐकणारे कुठे मी.. ऐकेल तर ती स्वरा कुठली" मला माझी साडे तीन वर्षांची लेक म्हणाली‌

मी थक्क होऊन गप्प आहे. ...

Translating in English..

There is like a fashion show going on in my house daily. My 3.5 year old daughter wears the finest of frill frocks, chaniya cholis day long at home. Today when I reached home , I saw her wearing a backless chaniya choli blouse and pant.

" Why are you wearing backless..Its cold na.." I said angrily..

" Why are you shouting? What's the use? Am I going to even listen?If I listen, how can I be swara even" my 3.5 year old daughter said.

I was stunned and shut up.

God knows, what's in store next.

Bhagwan , meri Raksha Karna!

-Dhanashree
#dsaidso

Thursday, December 6, 2018

आता वाजले की बारा..

आज माझ्या नवऱ्याच्या फ्लाईटमध्ये अतुल कुलकर्णी होते, अगदी बाजूच्या सीटवर. माझ्या नवऱ्याची फ्लाईट दुपारी १२ वाजताची होती ..११:३० ला त्याने मला अतुल कुलकर्णी  बरोबरची सेल्फी पाठवली. तेव्हा अतुल कुलकर्णी यांच्या नटरंगमधलं "वाजले की बारा" हे गाणं सुचलं.. आणि त्यावरच  आधारित ही पुढील कविता सुचली. हल्ली केलेल्या विमानप्रवासात( माझ्या किंवा कामानिमित्त माझ्या नवऱ्याच्या) विमान वेळेवर आलं - तर सगळं बरोबर आहे का ?असं वाटतं इतकी delayed flights  ची सवय झाली आहे. अतुल कुलकर्णी  फ्लाईटमधे असतील आणि ती delayed असेल, तर अशा वेळी कुठलं गाणं म्हणतील?

( कविता स्त्रीलिंगी लिहिलीय, कारण मूळ गाणं तसं आहे)

आज डिसेंबरची सकाळ, त्यात ६ डिसेंबर आज
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं पोचू जीवं झाला यडापीसा
 ट्रॅफिकचा न्हाई भरवसा वेळ पाळंना
राखली की मर्जी बॉसची, फ्लाईट साठी आले
 या धावपळीने चिंब ओली मी झाले
 फ्लाईट निघेल कधी बरं, काळ येळ ठेवून तर
 मला पोचू द्या ना वेळेत, निघा ना…
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा.
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा

कशा पाई वेळ काढता, गोल गोल फिरता
असं काय कर्ता,  हिला-
उडवा की लवकर ‌तरी
९ ची बी फ्लाईट गेली १० ची बी गेली
आता ११ ची  फ्लाईट निघाली
फ्लाईटला उडू द्या ना त्वरित, आता वाजले की बारा

आणि फ्लाईट सुरू झाली की ते काय म्हणतील ? ----" अप्सरा आली....." (विमान सुंदरीला बघून :))

-धनश्री
Https://dsaidso.blogspot.com

Thursday, November 29, 2018

जुळल्या सगळया त्या आठवणी


सगळ्यांचे लाडके आणि दादरकरांचे भूषण अशा देवकाकांच्या स्मृतिप्रत्यार्थ २७ डिसेंबर रोजी "जुळल्या सगळया त्या आठवणी" हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारकामध्ये मध्ये संपन्न झाला . देव काकांची विविध प्रकारची गाणी या कार्यक्रमात सादर झाली. नुसती गाणीच नव्हे तर त्या गाण्यांशी निगडित आठवणी , किस्से, त्यांच्या शिष्यांचे अनुभव या सगळ्यामुळे ती मैफिल अजूनच रंगली .

देवकाका हे आपल्याला उत्तम संगीतकार म्हणून माहित आहेतच. त्याचबरोबर ते एक उत्तम कवी , शिक्षक आणि  माणूस कसे होते याची जाणीव या कार्यक्रमानंतर झाली.   

देव काकांचं शिक्षण विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात झालं. पण लहानपणापासूनच घरी संगीताचे संस्कार होत गेले. त्यांच्या घरी मोठमोठे गवय्ये यायचे. आकाशवाणीत नोकरीसाठी गेले असताना त्यांना विचारल गेलं - तुम्हांला काय येतं? तेव्हा त्यांनी पेटी वाजवता येते असं सांगितलं. तेव्हा आकाशवाणीत पेटीवर बंदी होती . शेवटी त्यांना विचारलं गेलं , तुम्हाला सतार वाजवता येते का? तेव्हा ते नोकरी मिळवण्यासाठी  सतार वाजवता येत नसूनही हो म्हणाले आणि  मग चक्क ७ दिवसात सतार शिकले.

देवकाका नागपूर आकाशवाणीत नोकरीला असतानाची गोष्ट. साधारण १९६८-१९७० चा सुमारास संगीतकर प्रभाकर जोग यांनी देवकाकांना मुंबईहून पत्राद्वारे स्वर  लिहून पाठवले. संगीतकाराने चाल लिहिली आणि मग त्यावर गाणं लिहिण्याचा हा देव काकांच्या आयुष्यातला पहिला योग .  म्हणूनच "स्वर आले दुरुनी , जुळ्या सगल्या त्या आठवणी"  हे अगदी त्या प्रसंगाला अनुसरून गाणं जन्माला आलं.

रवींद्र साठे नानासाहेबांबद्दल( ते  देवकाकांना  नानासाहेब म्हणत)   म्हणाले ,"नानासाहेबांकडे गेलं की  तुम्ही त्यांना काहीही विचारा, ते तुमचं ऐकून तुम्हांला मदत, मार्गदर्शन करणार. आता ते नाहीत, तर कोणाकडे जायचं हा  प्रश्न आहे"

रंजना जोगळेकर देवकाकांबद्दल बोलताना म्हणाल्या , गायकांना ते कसे योग्य मार्गदर्शन द्यायचे. त्या काळात रंजना ताईंचा आवाज काहीतरी वेगळाच झालेला, गाणी छान होत नव्हती.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत गेला. तेव्हाच देवकाकांनी त्यांना फोन करुन , तुझ्यासाठी एक गाणं लिहिलयं  असं म्हणून बोलावून घेतलं. रंजन ताई तिकडे गेल्या आणि चक्क रडायला लागल्या, त्यांनी त्यांची समस्या सांगितली. देव काकांनी त्यांना एक गाणं लिहून दिलं आणि त्याचा रोज सराव करायला सांगितलं.त्याच बरोबर त्यांनी मी तुझ्यासाठी एक गाणं करुन ठेवणार आहे याबद्दल आश्वासन दिलं. देवकाकांना नंतर एक प्रोजेक्ट  मिळालं होतं- १२ महिन्यांसाठी बारा‌‌ गाणी बनवायची असं.त्यासंबद्धी त्यांनी प्रवीण दवणेंना एक गाणं लिहायला सांगितलं. काका म्हणले, "तू माघ महिन्यासाठी गाणं लिही" त्यावरून  "माघाची थंडी माघाची" हे अगदी ठसकेबाज गाणं निर्माण झालं जे रंजना ताईंनीच गायलंय.

देव काकांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचली,लिहिली. युगुल गीतं , विडंबन,समस्वरी, बोलगीतं  असं अनेक प्रकार. देवकाका ओशो रजनीश यांचे भक्त. ओशोंच्या शिकवण्यांवर त्यांनी हिंदी गाणीसुद्धा रचली.ते म्हणायचे-  प्रेक्षकाला संगीताचा स्वर ताल हे व्याकरण कळत नसतं. मात्र भाव नक्की कळतो. अशी भाव पोचवणारी सुरेल बोलगीतं  त्यांनी रचली. त्यातलाच एक बोलगीत म्हणजे - "सांग कसं जगायचं, कढत कढत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवायचं..." किती    सुरेख गाणं आहे हे." देवकाकांची काही मस्त विडंबन गीतं या कार्यक्रमात होती . त्यातलं एक विवाहित पुरुषाने म्हटलेले गीत अणि त्याला दिलेले बायकोने उत्तर ही दोन्ही इतके सुरेख होती की बस क्या बात हैं अस वाटयाला लागलं. " जवा हैं मोहोब्बत हसीना हैं जमाना" या गाण्याच्या चालीवर एक लाजवाब समस्वारी गीत सादर झालं जयमाला 'once more'  मिळालं.

बाकी कार्यक्रम अगदी उत्तमच झाला . दादर सांस्कृतिक मंचाचे त्याबद्दल आभार. उत्तरा मोनेंनी कार्यक्रमाचं सुरॆख निवेदन केलं. कार्यक्रम अगदी वेळेत सुरु झाला.स्टेज वर गायकांच्या मधोमध एक माईक आणि त्यासमोर देवकाकांची आवडती पेटी होती. जणू काय ते आपल्यातच आहेत.  कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी "जीवनात ही घडी अशीच राहूदे " असं वाटत होतं.

-धनश्री जोगळेकर (शिरोडकर)
https://dsaidso.blogspot.com

Friday, November 23, 2018

आपण करू ती फॅशन..

 साल २०१३ - माझ्या लग्नाआधीची खरेदी चालू होती . साड्या खरेदी करुन झाल्या होत्या . आता ब्लाऊज शिवायला टाकायचे होते . मला स्वतःला मोठया गळ्याचे   ब्लाऊज  घालायला आवडत नाहीत . लोकांना ते छान दिसतात पण मला ते छान  दिसत नाही असं मला वाटतं . त्यामुळे फॅशनच्या आहारी न जाता मी मला हवे तसे गळ्यांचे ब्लाऊज शिवून घेतले. ब्लाऊजच्या बाह्या मात्र फॅशनच्या आहारी जाऊन छोट्याच ठेवल्या. मला थोड्या  लांब बाह्यांचे ब्लाऊज बरे दिसतील असं माझ्या घरच्यांचं मत होतं. पण मी मात्र त्यावेळेच्या फॅशन प्रमाणे छोट्या बाह्यांचे ब्लाऊज शिवले.

साल २०१८- आता सोशल मीडियावर #deepveer गाजतंय. 
sabyasachi लुक वगैरे काय ते. आता  दीपिकाच्या रिसेप्शनचे लुक बघा ना . ऑफ- व्हाईट प्लेन लांब हाताचा बंद गळ्याचा ब्लाऊज. खर सांगायचं तर आजीबाई सारखा वाटतोय तो मला. आणि सोनेरी कांजीवरम वर हिरवा मोठा चोकर ...वरती चपट , अगदी तेल लावल्यावर होतात तसे केस....‌कदाचित ह्यातलं सौंदर्य किंवा फॅशन कळण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. बघून जे वाटलं ते लिहिलं. मात्र यावरून आजीची आठवण झाली. आजी म्हणायची " आपण करू ती फॅशन"... कदाचित या #deepveer आणि  #virushka नंतर ही चपट केस आणि लांब बाह्या अगदी "in-thing in fashion"   असेल.

आता माझ्या छोट्या बाह्यांचे ब्लाऊज 'out of fashion" नाही झाले म्हणजे मिळवलं. पण मग तेव्हा 
आजी म्हणायची त्याप्रमाणे " आपण करू ती फॅशन"... म्हणायचं.

- धनश्री

Sunday, November 11, 2018

दिवाळी , फराळ‌ आणि त्याचं दडपण



(Inspired by an earlier post by Mrinmayee Ranade-also shared on my wall earlier)

चला आता दिवाळी संपली. दिवाळीत बायकांना फराळ करण्याचं‌ दडपण असत असं वाचण्यात आलं. तर हे  दडपण का असावं? फेसबुक , social media वर बायका फराळाचे फोटॊ share करताना दिसतात. त्यामुळे हे दडपण येत असावं  का ? घरातून घरचाच फराळ हवा अशी मागणी होत असेल का ?
त्यामुळे हे दडपण येत असावं  का ?
बघूया...

आपण आपल्या आईला घरी सांग्रसंगीत फराळ करताना बघितलेलं असतं . कधीकधी अगदी नोकरी मुलं बाळं संभाळून हे सगळं तिने केलेलं असतं . मग त्यामुळे आपल्या मनांत आपल्याला आईसारखं करता आलं पाहिजे अशी‌ इच्छा असते. ती कितपत चूक कि बरोबर याचा विचार करायला हवा. मागे मृण्मयी रानडे म्हणाल्याप्रमाणे , काळानुसार भरपूर बदल झाले आहेत . त्यामुळे दोन पिढ्यात होणार्या गोष्टींची तंतोतंत तुलना नाही होऊ शकत.

दुसरं दडपण फेसबुकवरील फोटोंमुळे येऊ शकतं . अमुक एक कोणातरी कसं सगळ करतेय आणि आपण कसं काहीच नाही करत असं वाटू शकतं. तर फेसबुक वरील दाखवायचे दात आणि घरात खायचे दात वेगळे असतात हे न कळण्याइतके आपण दुधखुळे नक्कीच नाही आहोत . तो फराळ पोस्ट टाकणाऱ्या बाईने केलेला असतो की मदतनीसांकडून करवून घेतलेला असतो हे कसं सांगणार ? आणि अगदी स्वतः केला असेल तर बाकीचे जेवण केले का नुसता फराळ बनवायचा म्हणून जेवण बाहेरुन मागवले?

आणि अगदी सगळा फराळ स्वतः केला असेल तर स्वतःच्या घरच्यांसाठी केला . कोणावर त्याचे उपकार नाहीत. ते करतात म्हणून त्याचं दडपण आपल्यावर  नकॊ. प्रत्येकाची परिस्तिथी वेगळी. आणि  त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्रत्येकजण करतं.
कित्येक बायका लोकांना दिसायला पाहिजे म्हणून मुद्दामून दिवाळीच्या  वेळी फराळ करतात . नाहीतर वर्षाचे बाकीचे महिने साधा स्वयंपाक करतील का याचा प्रश्न पडतो .हे  मी  माझ्या स्वतः  बघितलेल्या अनुभवावरून सांगते.

जेवण केलं असो व नसो , पण ते वाढण्यात पुढे पुढे करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता त्या गोष्टींचं किचनमध्ये मधे रांधणाऱ्या बायकांनी दडपण घ्यावं का?

सांगण्याचा मुद्दा हाच की , फराळ घरी केला म्हणजे आपण सुग्रणपणाची परीक्षा पास झालो असं काही नाही . आपल्या घरच्यांसाठी आपण रोज पौष्टिक अणि घरच अन्न करणं महत्वाचं . मग ते स्वतः करा नाहीतर मदतनीसांकडून करुन घ्या.

आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन, फेसबुक फराळ फोटोस वरुन प्रेरणा घेऊन फराळ केला तर उत्तमच. पण तो नाही करता आला तर त्याचं दडपण नकॊ. कारण आपली सोय महत्वाची.
आणि हे नुसतं दिवाळी फराळाच्या बाबतीत लागू नाही.  अनेक रीती-भाती निभावताना आपली सोय महत्त्वाची.

-धनश्री जोगळेकर
https://dsaidso.blogspot.com

Wednesday, October 10, 2018

एवढी मोठी झालीस तू धनू ?

मनीषा कोरडे लिहीतात, (http://www.esakal.com/saptarang/manisha-korde-write-navratri-article-saptarang-148206 )
"नवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ..

१ला खेळ-
1. लहानपणीचा स्वतःचा एखादा फोटो उकरून काढावा आणि ती जी लहान मुलगी आहे, तिच्याकडं माया-ममतेनं बघावं. त्या अजाण अबोध दिवसांपासून ते आजवरच्या तिच्या प्रवासाचं कौतुक करावं. याचा अर्थ खूप जुन्या गोष्टी आठवत बसायच्या, असा नाही, तर त्या फोटोकडं बघून किंवा फोटो नसेल, तर मनात प्रतिमा आणून "छान, मस्त मोठी झालीस गं तू, पूर्वी काही कळायचं नाही तुला, आज किती शहाणी झालीस,' एवढंच म्हणायचं आहे. भूतकाळातल्या भूतांना शितं घालायची नाहीत ("मला यानं मारलं', "कमी मार्क मिळाले' असं डिटेलिंग करत बसायचं नाही). ज्या अस्तिक आहेत, त्यांनी त्या आपल्या छोटेपणातल्या मुलीला आशीर्वाद दिले तरी चालतील. ज्या नास्तिक आहेत त्यांनी त्या छोट्या लेकराचं कौतुक केलं तरी पुरे!

मुद्दा काय आहे? मुद्दा स्वतःत डोकावण्याचा आहे. ते होतंय का? या निमित्तानं ही जी एक जागा तयार होते आहे स्त्रियांसाठी- ती अनमोल आहे- तिचा पूरेपूर वापर आपण करतोय की नाही, हे बघणं महत्त्वाचं!
नऊ दिवसांचे नऊ नवे खेळ मी तुम्हाला सुचवणार आहे. आपण हे करून बघूयात का? मी तरी करणार आहे. तुम्ही ते केलंत, तर मजा येईल. "

या खेळानिमित्त मी माझ्या लहानपणीच्या आठवणी third person मधे लिहिल्या आहेत . लिहिण्यासारखं खूप आहे , पण आता थोडक्यातच संपवलंय.

एवढी मोठी झालीस तू धनू ?

अगं ,ती फोटोतली छोटी धनू ती तूच का ? दिवस कसे फटाफट जातात नाही ? तू एवढी मोठी  झालीस यावर  विश्वासच बसत नाही आहे माझा . लहान असताना तुला नटायची किती आवड होती . आणि हो , अभ्यासू आणि हुशार तर तू पहिल्यापासूनच होतीस .त्यामुळे जेव्हा तुला VJTI  प्रवेश मिळाला , तेव्हा मला अजिबात नवल वाटलं नाही . घरच्यांचं उत्तम मार्गदर्शन, तुझी मेहनत आणि हुशारी सगळ्याचं जणू काही ते फळ होत.

तुला आठवतं का पहिल्या प्रयत्नात तुला IIM मिळालं नव्हतं तेव्हा तू किती निराश झाली होतीस ? नंतर शिक्षकांच्या , आईवडिलांच्या समजावण्याने तू परत जोमानं तयारी केलीस. "आपण कर्म करत राहावे , फळाची  अपेक्षा करु नये" , ही विचारधारा मनाशी बाळगून तू खऱ्या अर्थानं प्रयत्न केलास. तुला त्या वर्षी यश मिळालच . IIM हॉस्टेलमध्ये एकटी कशी राहशील याचीसुद्धा तुला धाकधूक होतीच. पण तेही तू पार पाडलस की . Placement, CGPA या चक्रातून बाहेर पडलीस.

तुला लग्न होईपर्यंत कुठं काही फारसा स्वयंपाक येत होता? लग्नानंतर मात्र तू करत गेलीस आणि तुला सगळं जमत गेलं . अर्थात सुरुवातीचा काळ  कठीण होताच. सुरुवात वरण भात बनवण्यापासून केलीस आणि आता चक्क सगळा स्वयंपाक तू करु शकतेस. तू कोणावरही त्याबाबतीत अवलंबून नाहीस.

 स्वरा झाल्यवर तिचा बंगलोरला सांभाळ कसा होईल यांची काळजी होतीच न गं तुला. त्यावेळेलाही‌ तुझ्यामागे  आपली माणसं खंबीरपणे उभे राहिले आणि तुझी काळजी मिटली. 

आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक कठीण प्रसंग आले .त्यांना तू किती समर्थपणे तोंड दिलंस की नाही ?

आजीचे संस्कार पाळत गेलीस , प्रमाणिकपणे वेळच्यावेळी आणि मन लावून काम केलंस. बऱ्याचदा यश आलं, काहीवेळा अपयशही आलं. तू मात्र तुझे प्रयत्न चालू ठेवलेस.  या वाटचालीत साथ देणारी छान माणसं तुला भेटली.

कधीतरी असाच आपलं लहानपणीचा फोटो बघत जा, काय काय केलंस याचा आढावा घे . बघ कसं मस्त वाटेल तुला. अशीच मोठी हो, माझे आशिर्वाद तुझ्यासोबत कायम आहेत .

-धनश्री

Tuesday, October 2, 2018

कोण कोणाची आई

प्रसंग १
लेकीला माझ्या बहिणीने गुजरातहून चनिया चोळी आणली. मी लेकीला मस्करीने विचारलं ," स्वरा मी अशी चनिया चोली आणू का ?"
ती म्हणाली नको.
मी का नको असं विचारल्यावर, डोळे मोठे करुन, थोडा आवाज उंचावून लेक म्हणाली "मी सांगते ते ऐक , का म्हणून विचारू नकोस"

प्रसंग २ -
"मी हिला सांगितलं , नख काप, वाढली आहेत नखं तुझी, ऐकतच नाही माझं "
हे वाक्य माझी लेक मला म्हणाली.

आजच्यापुरते लेकीकडून झालेलें अपमान बस. :)
कोण कोणाची आई हा मला हल्ली  नेहमीच पडलेला
 प्रश्न आहे .

#लेकमाझीशिक्षक

-धनश्री

Sunday, September 23, 2018

वडाळा GSB गणपती


"पोवळ्याची माळ आणि हिऱ्याची कुडी असणाऱ्या बायकांनाच  प्रवेश" असं लिहिलं तरी चालेल वडाळा GSB गणपती मंडळाने. मी जन्माने GSB , म्हणजेच माहेरची GSB . GSB लोकांचे मुंबईतले दोन मोठे गणपती म्हणजे वडाळा आणि किंग्जसर्कल . वडाळा GSB माझ्या घरापासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर. कामाच्या व्यापामुळे इतका बाजूला असूनही मी तो गणपती  काल म्हणजे चक्क दहाव्या दिवशी बघायला गेले. सिल्कच्या साड्या , अगदी बाजू -बाजूला  असलेल्या मोठ्या पोवळ्यांची माळ, हिऱ्याची कुडी ही तिकडे येणाऱ्या बायकांची वैशिट्ये . पंजाबी ड्रेस मधे किंवा जीन्स मधे येणाऱ्या बायका अगदी हातावर मोजण्यासारख्या असतात. आपण पोवळ नाही घातलं तर अगदी out of place वाटेल म्हणून मी सुद्धा माझी अगदी  बारीक पोवळ्यांची माळ आणि हिऱ्याची कुडी घालून गेले होते . म्हणजे पापलेट नाही तर मांदेली तरी आहे  मासे म्हणून म्हणायला तसंच कांहीतरी . काल गणपती बघयला खुप गर्दी नव्हती . प्रवेश केल्यापासून दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत अर्धा तास सुद्धा लागला नाही . जातांना नैवेद्याचा १०० रुपयांचं ताट घेतलं. नारळ, केळी , फुलं असं त्या ताटात होत. ते ताट घेउन गणपती दर्शनाला गेलो. सोन्याने मढलेला गणपती हे त्याचं  वैशिट्य .‌गणपती अगदी सुंदर दिसत होता. वातावरण फार प्रसन्न होत. दर्शन झाल्यावर प्रसादाचं ताट घेउन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी तो ताटातला प्रसाद कापडी पिशवीत घालुन आम्हाला देण्यात आला .मग आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो. तिकडे कटलेट, केळा भजी , कचोरी असे वेगवेगळे पदार्थ मिळतात. पदार्थ अगदी गरमागरम आणि चविष्ट असतात . रोज जेवणाचा प्रसाद असतो...मी अजून प्रसादाचं जेवण जेवलेले नाही पण तो स्वयंपाक इतक्या मोठ्या प्रमाणात होतो ह्याचा प्रत्यय तिकडे चिरताना बसलेल्या लोकांकडे बघून येतो ..भरपूर मोठे टोप भरलेले अळू, असंख्य नारळ असं चिरताना आचारी दिसतात. गजरे , हार बनवताना बायका दिसतात. खऱ्या अर्थाने भक्त देवाची सेवा करताना दिसतात. कोण मोठं नाही कोण छोटा नाही , सगळे फक्त भक्त.  हे बघितल्यावर खुप छान वाटतं .
गणपती बाप्पा मोरया!

-dhanashree
Https://dsaidso.blogspot.com

Saturday, September 15, 2018

Jab I met Shahrukh Khan


"Is it really true?" I thought. "Am I really meeting SRK?" But yes it was true. I got to meet SRK and witness the shoot of BYJUs latest ad thanks to my husband. SRK was literally not even 100 metres away from me during the shooting. But given the rules and the silence that is to be maintained, we were not allowed to meet him during the shooting. We could just watch from a distance. I spent almost 8 hours at the recording studio. Of which watching Shahrukh was hardly for a few hrs. Rest of the time being spent in SRK getting ready and makeup for the various looks. Even in that little time, SRK was a true entertainer. Watching a take and retake of the same ad multiple times was enjoyable only due to Shahrukh.
Finally the moment came.  As Gauri Shinde announced "Pack up", SRK proceeded to move out. The people around (mostly from BYJUs) who were watching him from a distance thronged him. People had got DDLJ posters to get his autograph and all. His bodyguards tried to keep people away as they circled around him. I had a notebook in my hand which contained a collection of my poems in 3 languages written for him. The bodyguards thought I was taking his autograph and wanted to drive me away. I just managed a minute to talk to him and told him this is my gift of multilingual poems for him. He opened the notebook, saw my name there and asked "Dhanashree, can I take this?" I still find this absolutely unbelievable. I didn't tell him my name, he opened the notebook while his bodyguards shooed me away, and thanked me. And just in that moment, my husband managed to click a pic. I did not have the time to buy a fancy greeting card, or a fancy notebook, all I had is good content in my usual notebook. That I could give it to SRK and receive his thanks is something I will remember for a lifetime. The collection of my poems for SRK is as follows -

मन्नत

एक मन्नत मांगी थी खुदा से मैने
कभी मन्नत में रेहनेवाले बादशाह से मिला हमें

कहा खुदा ने थोडा सब्र करो
परदेस के मॅडम tussads वाले बादशहा से पहले मिलो

एक wax statue को बस हम देख सकते हैं
SRK बनने  का फॉर्म्युला थोडी पूछ सकते हैं

'कभी ख़ुशी कभी गम ' मे वक्त निकल गया
' चलते चलते ' एक 'चमत्कार ' हो  गया

बडे बडे शहरो  मे छोटी छोटी बाते होती हैं
 और कभी छोटे छोटे लोगों की बडी बडी ख्वाईशें पूरी होती हैं
हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं और एक बार King Khan से मिलने  की तमन्ना रखते  हैं

बॉलीवूड के बादशाह से मिलने का मौका आया
एक दिन हम उनसे मिल पायेंगे
ये मैने  सोचा न था
मैने सोचा न था

Leadership
To imagine, To dream, To believe
To change ways and embrace the new
To be unafraid and not fear failure
To be passionate about goals, far and near

To inspire the team to move ahead
And be welcoming and inclusive of ideas that come ahead
Having the diligence to execute
And striking a balance between delegation and 'know it all' attitude

To have a plan to achieve the team goals
And yet accept the uncertainties that come in due course
Let the goals not be limiting
But be the milestones to achieve higher

This is what Leadership is all about
As per IIMBUEspeech by SRK , " naam toh suna hi Hoga"

[This poem is based on Shahrukh khan's speech at IIMBUE, the IIMB leadership summit]

Life Lessons

If you want to do something, do it really well
Put in your full effort, do with full JOSH, SRK tells

Maybe put in a bit of madness to your efforts
Taking your aberrations along, be a 'Deewana' of reaching your destination

Maybe  you may fail,sometimes life may be bad
Have faith, have hope
Continue your efforts, you will get the 'Chamatkaar' results in due course

Let 'fear' not intimidate you
Let 'failures' not deter you
The real 'Baazigar' wins even after failures
Chooses not to be held back by his 'Darr' here

It's ok to be confused
It's ok to be worried
"Kabhi Haa, Kabhi Na"
Let life move at its own pace

In all this, be kind, try helping others
Do everything 'Dil Se' spread love to others

Take happiness and sadness in its ephemeral spirit
Live in the present, because you know 'Kal Ho Naa Ho'

Everything will eventually be ok in the end
If it's not ok, it's not the end
Because ' Picture abhi baaki hain doston'

[ Above poem based on Shahrukh Khan's speech at University of Edinburgh]



From your 'Fan'

I thought it was a 'Chamatkaar'
Am I really meeting 'King Khan'?

The 'Deewana' we grew up seeing
Or the 'Baazigar' we watched as kids

The epitome of acting excellence
The Badshaah of Bollywood

Who spans across generations
From 'Ye kaali kaali aankhen' to 'Lungi Dance' hereto

Absolutely thrilled to meet you
My name is Dhanashree, and I am your 'Fan,'
Bas Aapne naam Nahi suna Hoga..


कोण आहे शाहरुख?

कोण आहे शाहरुख, लेकीने मला विचारलं
तो लुंगी डान्स करतो तोच काय गं , तिने खात्री करु घेतलं

 तो  टी . व्ही . वर पिक्चर मध्ये कसा येतो ? हा तिचा पुढचा प्रश्न
त्याचं ऑफिस तेच का , हे तिचं न संपणारं विचारणं

३ वर्षाच्या लेकीला अजून काय सांगावं
' किंग खान ' किंवा 'बादशाह' म्हणजे काय , हे तिला कस उमगाव

शाहरुख म्हणजे खूप अभ्यासू विद्यार्थी
acting आणि   dance यांचा सतत अभ्यास करणारा निश्चयी आणि मेहनती विद्यार्थी

प्रत्येक चित्रपटात त्याचा जोमाने परफॉर्मन्स देणं
प्रेक्षकांना आनंदी करणं हाच त्याचा एकाची धर्म

हसत खेळत जगावे, हाच त्याचा मंत्र
"जिंदगी नफरत के लिये बहुत कम  होती हैं ", हाच त्याचा कानमंत्र

शाहरुख म्हणजे  शाहरुख म्हणजे शाहरुख आहे
त्याच्या कर्तृत्वामुळे तो बॉलीवूडचा सुपरस्टार आहे

-Dhanashree Joglekar
https://dsaidso.blogspot.com

Monday, September 10, 2018

कॉपी आणि फुकटचं श्रेय

मी आद्या या ब्रँडचे दागिने वापरते. त्या ब्रॅण्डची अगदी  तंतोतंत कॉपी होतेय त्याबद्दलची ही पोस्ट आहे - (   https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156836054896165&id=615421164)  खरं सांगायचं तर काही काम न करता त्या कामाचं श्रेय घेणाऱ्यांची संख्या इतकी वाढलीय की त्यांबद्दल काय लिहू तितकं कमी  आहे . पण तरीही ही पोस्ट वाचल्यानंतर काहीतरी लिहावसं वाटलं.
 बाबूजींनी म्हटल्याप्रमाणे " कष्टवीन फळ ना मिळते " संस्कारात मी  वाढले. आपण प्रामाणिकपणे कर्तव्य करावं , अगदी मन लावून काम करावं , मग यश येतच असे घरी संस्कार होते . दिखावा किंवा "शोबाजी"नव्हतीच . लोकांना दाखवायला पाहुणे आल्यावर अगदी साग्रसंगीत स्वयंपाक आणि इतर वेळी मुलांना नुसता वरण भात असं "शोबजी" प्रकरण नव्हतं .
शॉर्टकट हा प्रकारच मला माहित नव्हता . 
" तुमचं बाबा बरं आहे , तुम्हांला १० रुपये अजून द्यायला काय झालं?" असं आजकाल रिक्षावाले म्हणताना दिसतात. माझं यावर एवढंच म्हणणं आहे , १० रुपये फुकट मिळवण्याचा ध्यास का ? का नाही अजुन कष्ट करुन मिळवत १० रुपये? हा १० रुपयांचा प्रश्न नसून तत्वाचा प्रश्न आहे . असं फुकटचे पैसे खाताना लाज कशी  नाही वाटत? जनाची नाही तर मनाची तरी  लाज कशी नाही वाटत? share केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे "मग का अडकताय त्याच त्याच गोष्टीत ? नवनिर्मितीचा ध्यास नाही का जराही ?आपण स्वतः काही न करता फोटो सुद्धा copy करायचे , ध्येय काय आहे बरं ? ध्येय जाऊदे , काही संस्कार ?" खरंच यातून संस्कार दिसतात .
आधी कॉपी , फुकटच मोठेपणा घेणार्यांची खुप चीड यायची. आता तसं काहीच वाटत नाही . गाढवाशी आणि  आपलं तेच खरं करणाऱ्या माणसाशी काय बोलावं ? कारण  अशी माणसं हजार खोटं बोलून " मी निप्पाणीचा ताम्भाकुचा व्यापारी लखोबा लोखंडे आणि तो मी  नव्हेच " असं म्हणणाऱ्यातलीच असतात.
-Dhanashree

Sunday, June 24, 2018

My write up in Loksatta





Loksatta , the marathi daily of the Indian Express Group had invited writeups on the occasion of Father's day. I.had submitted one and it got published( the shorter version of it I mean). Sharing the same. It talks of how my father helped me right from the start and even after my marriage when I moved cities, houses and even in looking after my daughter.
It is published in page 4 of chaturang, the Saturday supplement of Loksatta.
They published a section of my write up. Some more part of my write up as follows

"स्त्री पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो- ऐकतो, बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं याबद्दल चर्चा होत असतातच.माझ्या बाबांचा माझ्या पायावर उभा राहण्यात सिंहाचा वाटा आहे, लहानपणी अभ्यास घेण्यापासून , IIM ला MBA करताना मार्गदर्शन ,ते स्वराला संभाळण्यापर्यंत, आणि तो तसाच राहणार आहे. खरंतर आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, हा विश्वासच खूप स्फूर्ती देऊन जातो. त्या खात्रीनेच मानसिक बळ येतं , खूप काही नवीन करण्याची ऊर्जा येते. त्यामुळेच आज मी नोकरीबरोबरच नियमितपणे ब्लॉगवर लिहिते, निबंध - वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेते. मी बाबांबरोबर भौतिक प्रवास किती केला हे आठवत नाही, पण आयुष्याच्या प्रवासात ते सतत माझ्या सोबत होते, अगदी कितीही चढ ऊतार आले तरी.

माधुरी दीक्षित च्या हल्लीच्या बकेटलिस्ट या चित्रपटात " होऊन जाऊ द्या " या गाण्यातले हे शब्द आहेत " वाटेवरी जरी काटे किती तरी ,तुला फिकीर ना कशाची भीती" . मला माझ्या आयुष्यातल्या स्वप्नांची बकेटलिस्ट कितीही काटे असले तरी कशाची भीती न बाळगता पूर्ण करण्यासाठी पाठीशी उभ्या असणाऱ्या बाबांना "हैप्पी फादर्स डे ". त्यांच्यामुळेच मी कुठल्याही कठीण प्रसंगाला "होऊन जाऊ द्या" असं म्हणत कणखरपणे सामोरी जाऊ शकते
"

-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com

Tuesday, June 19, 2018

मी एक पास / नापास आई ?

स्वरा - " आई मला टिकली लाव न गं "

मी बॅगेतुन एक टिकलीचं पाकीट काढून त्यातली एक टिकली तिला लावली.

स्वरा - " आई , ही नको , ती शुभांगी सारखी टिकली लाव न गं "

मी - " अगं कोण ही शुभांगी , आता ही टिकली  लाव न "

स्वरा - " अगं ती शुभांगी , ती टी . व्ही वर असते ती , ती मोठी टिकली लावते ती "

अरेच्चा , माझ्या आत्ता लक्षात आलं, ती शुभांगी गोखलेंबद्दल म्हणत  होती .मागे श्रीयुत गंगाधर टिपरे यांचे जुने एपिसोड्स बघताना ती शामल म्हणजे  शुभांगी असं मी  म्हणाले होते .

तर असो . गेले दोन दिवस मी "शुभांगी " टिकली आणायला विसरतेय . आज घरी जाताना मी  नेली म्हणजे पुरे. नाहीतर मला प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं  जावं  लागेल..
" आई तू टिकली का नाही आणलीस ?
आई  तू का विसरलीस?
आई आता जाऊया का आणायला?
आता का  नकॊ जाऊया आणायला? "

या  आणि  अशा अनेक प्रश्नांना घरी पाय ठेवताक्षणी उत्तर देताना हे‌ प्रश्न मला कुठल्याही बोर्डच्या परीक्षेपेक्षा नकोसे वाटतात. यात आपण नापास होण्याचीच शक्यता जास्त.

हाच विचार करता करता आपलं बालपण आठवतं. आपणही आपल्या आईला अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यायला  लावली होती. आता स्वतः आई झाल्यावर ते किती कठीण होतं ते कळलं.

पु ल एकदा एका कथेत म्हणाले होते - "मी एक नापास आजोबा"

आता मला वाटतं मी एक आईपणात नापास होण्याची भीती बाळगणारी आणि पास होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी आई आहे .
 आणि हो आईपणात पास झालेल्या  आयांना माझा सलाम!

#dsaidso #marathi

-धनश्री

Thursday, June 7, 2018

हैप्पी बर्थडे सायली राजाध्यक्ष

सायली राजाध्यक्ष या फूड आणि lifestyle ब्लॉगर  यांना  मी follow  करते. मला त्यांच्या लिखाणातला खरेपणा , स्पष्टपणा आणि अर्थातच महिती  खूप आवडते .त्यांचा आज वाढदिवस आहे . त्याबद्दल एक  कविता
कानडी बोलणाऱ्या राज्यात मराठी ऐकणं तसं  दुर्मिळच
कोणीतरी गप्पा मारायला हवंय मराठीत ही इच्छा  सदैव होती मनात
लोणचं महोत्सवामुळे झाली तुमची ओळख
गप्पा मरायला तुमच्या  ब्लॉगपोस्ट यांची  होती मला  सोबत
कधी रोजच्या स्वयंपाकाबद्दल गप्पा
तर कधी साध्या झटपट पदार्थांबद्दल
कधी स्वयंपाकाचं नियोजन तर कधी स्वयंपाकाचं ललित
या गप्पांमुळे झटपट काही मस्त स्वयंपाक शिकले मी खरा
कधी विस्तृत माहिती असणारी प्रवासवर्णन
कधी देश परदेशी असलेल्या  लेखकांनी लिहिलेले लेख  यांच  संपादन
साड्यांच्या गप्पा जणू आम्हाला एक शॉपिंग मॉल मध्ये नेतात
फॅशन करण्याचे नवे आणि सोपे मार्ग सुचवतात
तुमच्या लिहिण्यातला स्पष्टपणा आणि खरेपणा भावला
जे आहे ते अगदी तसंच  सुंदररित्या मांडण्याचा तुमचा  धाडस भावला
तुमचा ब्लॉग वाचून लिहिण्यास येते स्फूर्ती
रेसिपीस करून पाहिल्या तेव्हा नवऱ्याकडून मिळते शबासकी
तुमचा ब्लॉग वाचून मिळणाऱ्या आनंदाचं कांही मोजमाप नाही
हैप्पी बर्थडे म्हणून तुमच्या  ऋणात मी सदैव रहाणं पसंत करीन
You can read Sayali Rajadhyaksha blog here -https://shecooksathome.com
https://sareesandotherstories.blog
-DHANASHREE

Sunday, May 13, 2018

बाम काका- आठवणी

क्रीडा मानसतज्ञ कै भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  काही आठवणी . ते माझ्या आजीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे.
“आपल्या वरती पोलीस राहतात ना  ते आता येणार आहेत आपल्याकडे " माझी मावशी  मला म्हणाली. मी तेव्हा दुसरीत होते. त्यावेळी मनात पोलिसांची प्रतिमा म्हणजे काय - तर शेवाळी युनिफॉर्म,  धिप्पाड बांधा , मोठी मिशी,मोठे डोळे  अशी होती. थोडक्यात काय तर थोडीशी भितीदायक प्रतिमाच होती . त्यामुळे त्यांना भेटणे टाळायचे म्हणून  मी आतल्या बेडरूम मध्ये जाऊन बसले. "अगं बाम साहेब आले आहेत ग, बाहेर ये सोन्या" असं माझी मावशी म्हणाली. मला बाहेर जायचं नव्हतं. म्हणून मी  आतच बसून होते. बघते तर काय, मी बाहेर येत नाही म्हणून बाम काका आत आले. अशा प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे पोलीस असतात हे मला तेव्हा पहिल्यांदाच कळलं . खरं सांगायचं तर दिसण्यावर तसं काहीच नसतं , पण लहान वयात प्रथमदर्शनी जर कोणाची थोडी भितीदायक प्रतिमा झाली की त्या माणसाकडे जायला भिती वाटते एवढंच . बाम काका आणि काकी त्यादिवशी माझ्याशी अगदी आपुलकीने बोलले. तेव्हापासून आपल्या आजीच्या बिल्डिंगमध्ये पोलीस राहतात याची भिती वाटण्यापेक्षा, अभिमान वाटला . बाम काका IPS Officer होते. निवृत्त होताना ते IGP - Inspector General of Police म्हणून निवृत्त झाले. ते एवढ्या मोठ्या पदावर होते याची त्यांनी कधीही जाणीव करून दिली नाही. आम्हाला ते माहित होतं , पण त्यांनी त्यांच्या  वागण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. नुसतं त्यांच्या नाही , तर बाम काकींच्या किंवा त्यांच्या मुलांच्या वागण्यातून, बोलण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. अगदी down to earth वागणूक होती त्या सगळ्यांची .
एकदा माझी मावशी त्यांच्याकडे गेली होती, तेव्हा तिने बघितलं  की सचिन तेंडुलकर आला होता त्यांच्याकडे . त्यानंतर आम्हाला कळलं की ते एक प्रख्यात sports psychologist आहेत. त्यांच्याकडे  मोठमोठे  खेळाडू Counselling साठी यायचे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अंजली वेदपाठक आणि असे अनेक. नुसते खेळाडू  नाही तर मोठमोठे surgeon मोठं ऑपेरेशन करण्याच्याआधी त्यांच्याकडे counselling साठी यायचे. मी स्वतः सुद्धा त्यांच्याकडे MBA प्रवेश परीक्षेच्याआधी मार्गदर्शनासाठी गेले होते. ते yoga , प्राणायाम करण्यावर खूप भर द्यायचे. tennis /badminton असा एखादा प्रत्येक shot ला decision making लागणारा खेळ खेळावा असं ते म्हणायचे. शिकत असताना त्यांना बऱ्याच वेळा भेटण्याचा योग्य आला. तेव्हा ते निवृत्त झाले होते आणि  निवृत्तीनंतर ते नाशिकला राहायला गेले. तरी त्यांचं मुंबईला बऱ्यापैकी येणं- जाणं होतं . आम्हाला त्यांनी नाशिकला येण्याचं बऱ्याचदा आग्रहाने निमंत्रण दिलं होतं . तिथे त्यांचा व्याप बराच मोठा होता . IAS साठी तयारी करण्याचं मार्गदर्शन करायचं , लेक्चर , counselling हे सगळं चालूच होतं . तरीही जेव्हा ते मुंबईला यायचे तेव्हा माझ्या मावशीला " राणी कशी आहेस" असं विचारल्याशिवाय जायचेच नाहीत. माझ्या मावशीला त्यांचा खूप आधार वाटायचा .
गेल्यावर्षी बाम काकांचं लेक्चर   मध्ये असताना निधन झालं . आपली आवडती गोष्ट  करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली . गेल्यावर्षी ही  बातमी ऐकल्यावर खूप वाईट वाटलं. आधी विश्वासच बसत नव्हता. आज त्या गोष्टीला एक वर्ष झालयं. त्यानिमित्ताने हे लिहावंसं वाटलं . बाम काका एवढ्या मोठ्या पदावर होते ह्याच्यापेक्षा त्यांच्या  वागणुकीमुळे ते आम्हाला सदैव लक्षात राहतील. माणसाची किंमत त्याच्या श्रीमंतीमुळे, मोठ्या घरामुळे किंवा अजून कशामुळे नसून त्याच्या माणुसकीमुळेच ठरते. निदान माझ्यासाठी तरी!

Thursday, April 19, 2018

चहा चपाती


आज सकाळचा नाश्ता झाला का? हा प्रश्न मी हल्लीच ऐकला असेल. लहानपणापासून माझ्या आईकडे “ आज सकाळची चपाती खाऊन झाली का?” हाच प्रश्न असायचा. चहा आणि चपाती हे जणू काही माझं सकाळचं खाणं. अगदी कितीही लवकर बाहेर पडायचं असेल तरी चहा आणि चपाती खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. माझे जेव्हा सकाळचे क्लास असायचे तेव्हा मी अगदी सकाळी ५:३० ला गरम चपाती आणि चहा असं खाऊन जायचे. चहा आणि चपाती खाण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. काहींना चहाच्या कपात थोडीशी चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती अगदी पूर्णपणे बुडवून खायला आवडते. आणि हो मग तो चहा त्या बशीतून प्यायला आवडतो, त्यात म्हणे चपातीची चव उतरते आणि तो चहा अजून चवदार लागतो. बऱ्याच लोकांना सकाळी पोळी भाजी / चपाती भाजी खाण्याची सवय असते.त्यांना जेव्हा मी चहा चपाती खाते असं सांगते तेव्हा त्यांना असं चहा चपाती काय खातात ह्याचं नवल वाटतं . आणि माझ्यामते हल्ली जसे cornflakes, wheatflakes खातात, ते पण दुधात बुडवून खातात ना, तर हे तर चहात ताजी ताजी चपाती बुडवून खाणं झालं. Fresh is best नाही का? ही चहा चपाती खाण्याची पद्धत कुठली हे मला ठामपणे माहित नाही. पण कोकणात बालपण गेलेल्या लोकांची  ही सवय असावी असं माझं निरीक्षण सांगतं. माझा संपर्क असं खाणाऱ्या कोकणातल्या सारस्वत लोकांशी जास्त आहे ( ह्यात कसलाही जातीयवाद नाही).
माझ्या घरी आता सकाळचा नाश्ता असतो- जसं कि इडली, डोसा , उपमा. मला हे सगळे पदार्थ आवडतातच. पण माझं सकाळचं comfort food चहा चपाती आहे. माझ्या घरी चपातीला  पोळी म्हणतात . मी पण पोळी म्हणते. पण  चहा पोळी  म्हणण्यापेक्षा चहा  चपाती म्हणण्यात  मज्जा  आहे. आणि हो बोलण्यापेक्षा मी करण्याला महत्व देते
-धनश्री

Tuesday, March 13, 2018

तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?



I won prize in the Marathi Elocution Competition conducted by Dadar Bhagini Samaj. [ speech for that competition here- http://dsaidso.blogspot.in/2018/02/blog-post_18.html] I also won a consolation prize in the extempore competition. Sharing the pictures of the prizes I received at the hands of Advocate Ujwal Nikam. Dedicating this prize to my parents and aunt who developed and nurtured our interest in reading and writing. A lot of people ask me how come I write in Marathi when my medium of instruction was English . A brief story about that below.
तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?" असं मला काही लोकं विचारतात. खरं सांगायचं तर माझे विचार मी साध्या सोप्या मराठीत व्यक्त करते एवढंच . तरीही जेव्हा माझ्या मराठीबद्दल लोक मला प्रश्न विचारतात , तेव्हा मी मराठी कसं शिकले हे सांगावंसं वाटतं . माझ्या बाबांना चार मोठ्या बहिणी , त्यातल्या तीन शिक्षिका. माझी सर्वात मोठी आत्या आमच्या वरच्या माळ्यावर राहायची, आणि एक आत्या आमच्या बरोबर. माझी शाळा इंग्लिश माध्यमाची होती आणि आम्हाला शाळेत तिसरीपासून मराठी होतं . माझी मोठी आत्या दररोज माझ्याकडून मराठी अक्षरं , बाराखडी लिहून घ्यायची. कविता म्हणून घ्यायची, पाठांतर करून घ्यायची. त्यावेळेला तिचं वय ६० वर्ष होतं . आयुष्यात पहिल्यापासून तिने खूप कष्ट काढले होते- खेड्यात नोकरी, मग त्यानंतर मुंबईत येऊन नोकरी, मुलगी २ वर्षाची असताना नवरा गेल्यामुळे तिची जबाबदारी अशा अनेक जबाबदाऱ्या सतत पार पडल्या होत्या. मग निवृत्तीनंतर ती पूर्णपणे आराम करूया असं म्हणू शकली असती. असं न म्हणता तिने आम्हाला शिकवलं , आम्हाला रोज शाळेत अगदी वेळेवर पोचवलं . माझी मीना आत्याने मला मराठी स्पर्धेत भाषण लिहायला खूप मदत केली. कुठल्याही निबंध , वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर माझ्यापेक्षा तिला उत्साह असायचा. स्पर्धेचा विषय आला कि ती मला त्या विषयावरची लायब्ररीमधून पुस्तकं आणून द्यायची . त्यातले संबंधित पृष्ठक्रमांक सांगायची . मग त्यानुसार मी भाषण लिहायचे . ते ती अधिक सुधारायची. पण भाषण/ निबंध लिहिण्यात पहिल्यापासून माझा सहभाग असायचा. त्यामुळे मी आता स्वतःहून लिहू शकते. हा आमविश्वास लहानपणापासूनच माझ्या आत्यांमुळे माझ्यात घडत गेला. कुठलीही नवी गोष्ट शिकायची, पडेल ते काम करायचं आणि विधायक काम करत राहायचं असे आमच्यावर संस्कार होते. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आत्या मला मराठी शिकवतात म्हणून आपली मुलं आपल्या नणंदांच्या जवळ जातील अशी असुरक्षितता माझ्या आईला कधीच वाटली नाही. आई आम्हाला इंग्लिश शिकवायची, त्याचे निबंध लिहून द्यायची,अनेक गोष्टी आणि विषय शिकवायची. बाबा गणित शिकवायचे, आमच्या शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये मदत करायचे. आपल्या भाचीला आपण एवढं का शिकवावं , नाहीतरी ती आई बाबांचंच नाव लावणार न असं माझ्या आत्यांना सुद्धा कधी वाटलं नाही. माझी कालिंदी आत्या तर मला प्रत्येक वेळेला आठवण करून सांगते, तुला लिहायला आवडतं ना तर लिही, डोक्याला चालना मिळते.
महिलादिनानिम्मित काही लिहिलं नव्हतं , पण आज हे लिहून समारोप करते- माझ्या आत्या आणि आईने आम्हाला घडवताना आमचं हीत बघितलं. आम्ही मोठे झालो तर त्याचं श्रेय कोणाला मिळेल असा ego issue मध्ये कधीच आणला नाही. त्यांच्यात तो समजूतदारपणा आणि आपुलकी होती. घरातल्याघरात राजकारण नव्हतं. कित्येक घरात जेव्हा त्यांच्या घरातच कोण काय करतं आणि कोणाला त्याचं श्रेय मिळतं यावरून स्पर्धा असते. मी स्वतःला भाग्यवान समजते असं आंतरिक राजकारण आमच्या घरात नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या स्पर्धेला सामर्थ्याने तोंड देऊ शकतो.
माझ्या मावशीने मला भगिनी समाज मध्ये वक्तृत्व स्पर्धा असल्याबद्दलचं सांगितलं. आणि त्या स्पर्धेत मला दोन बक्षीसं मिळाली. त्याचे फोटो share करतेय.
- Dhanashree

Sunday, February 25, 2018

आठवणीतले उखाणे

एक जुनी वही सापडली. आणि त्या वहीत काही सुंदर आठवणी सापडल्या. आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे २०१३ साली लिहिलेले उखाणे त्या वहीत होते. ते आता share करतेय.
iPad वर उडतो angry birds चा थवा
सिद्धेशचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
Apple च्या macbook वर फुलं वाहते वेचून
सिद्धेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून
गणेशाला आवडतात दुर्वा शंकराला बेल
सिद्धेशसंगे फुलावी सुखी संसाराची वेल
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण
शिरोडकरांची कन्या झाली जोगळेकरांची सून
चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून
सिद्धेशचं नाव घेते आग्रह केला म्हणून
-धनश्री

Monday, February 19, 2018

"गुलाबजाम कॅफे " हवाच



महाराष्ट्राबाहेर गेल्यावर आपल्या मराठी पदार्थांचं खरं महत्त्व कळतं. मी जेव्हा पहिल्यांदा बंगलोरला शिक्षणानिम्मत गेले, तेव्हा मराठी खाण्याची आठवण येऊ लागली. तेव्हा बंगलोरला आमच्या जवळ असणारं हॉटेल म्हणजे " पेशवा". आम्ही  "पेशवा" मधून महाराष्ट्र मंडळ कार्यक्रमासाठी जेवण मागवायचो.पण पेशवा सारखं हॉटेल बंगलोरमध्ये एखादंच. आता पेशवा बंद होऊन , दुसरं एक पूर्णब्रह्म म्हणून पारंपरिक महाराष्ट्रयीन पदार्थांचं हॉटेल सुरु झालंय.
त्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हा बाहेरगावी जाण्याची पाळी आली तेव्हा जाणवलं- दक्षिण भारतात पंजाबी रेस्टॉरंट्स खूप सापडतील पण एखादं महाराष्ट्रीय रेस्टॉरंट सापडणं कठीण; उत्तर भारतात दक्षिण भारतीय पदार्थ मिळतील, पण महाराष्ट्रीयन पदार्थ मिळणं दुर्मिळच. "इथे सगळं मिळतं - नॉर्थ इंडियन, इटालियन पण आपले मराठी पदार्थ का नाही मिळत? कोणी इथे मराठी रेस्टॉरंट का नाही सुरु करत? " असं मला नेहेमी वाटायचं.
सचिन कुंडलकर यांनी गुलाबजाम या चित्रपटात माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांची हीच ईच्छा पडद्यावर व्यक्त केली. आदित्य हा लंडन मध्ये नोकरीत अगदी well - settled म्हणावा असा मुलगा .लंडन मध्ये एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरु करायचं या इच्छेने तो पुण्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाक शिकायला येतो. तिथे त्याची भेट राधा आगरकर नावाच्या एक डबे पाठवणाऱ्या बाईशी होते. तिच्याकडून तो स्वयंपाक कसा शिकतो आणि त्याची लंडन मध्ये मराठी रेस्टॉरंट सुरु करण्याची इच्छा कशी पूर्ण करतो ही "गुलाबजाम" या चित्रपटाची कथा.
स्वयंपाक ही एक कला आहे. स्वयंपाक अगदी मन लावून केला तर चांगला होतोच असं या चित्रपटात दर्शवलं आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाक हे या सिनेमाचं केंद्रस्थान आहे.  पदार्थांची मांडणी आणि त्यांचं वैविध्य वाखाणण्याजोगं आहे. बऱ्याचदा चित्रपटात foreign location शूटिंग मुळे त्या location मध्ये पर्यटन वाढतं. गुलाबजाम मध्ये असं काहीच नाही. अन्न हेच पूर्णब्रह्म हा या सिनेमाचं विषय. या चित्रपटामुळे जर स्वयंपाक करण्यात रस वाढला तर हे या सिनेमाचं यश असेल. तसचं स्वयंपाक करणं हे बिनडोकपणाचं किंवा कमीपणाचं काम हा  विचार बदलण्यात मदत झाली तर तेसुद्धा या सिनेमाचं यश असेल.आणि सर्वात महत्त्वाचं , चित्रपटातल्या आदित्यने जसा मराठी पदार्थांसाठी लंडनमध्ये गुलाबजामकॅफे सुरु केला, तसच वेगवेगळ्या शहरात साबुदाणा वडा कॅफे, मोदक कॅफे सुरु झाले तर अगदी मस्तच होईल. सचिन कुंडलकर यांनी आपल्या मराठी खाद्यपदार्थांना केंद्रस्थान  बनवून हा चित्रपट बनवला आहे ज्यातून बरंच काही विचार करण्यासारखं आहे. आपणच जर आपली खाद्यसंस्कृती नाही जपली तर ती लोप पावत जाईल. कोणीतरी एक आदित्य हवाच ती जोपासण्याचा आणि दूरदेशी पोहोचवण्याचा ध्यास असणारा.

-धनश्री

#gulabjaam #गुलाबजाम #sachinkundalkar #marathifoodfilm #foodfilm

Sunday, February 18, 2018

खाद्यसंस्कृती कालची व आजची

दादर भगिनी समाज येथील वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत मला तिसरं पारितोषिक मिळालं. मी " खाद्यसंस्कृती कालची व आजची" या विषयावर बोलले. तेच भाषण मी आता share करतेय. आयत्यावेळच्या विषयावरून जे वक्तृत्व होतं त्यात मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं . त्याचा विषय होता" valentine डे" ते विचार नंतर share करेन.

खाद्यसंस्कृती कालची व आजची

मर्ढेकर म्हणाले होते-
"आज होईल का गोड माझ्या हाताची भाकर
आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले
आज होतील का खुश माणसं गं जेवताना"

हा विचार स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असेलच मग तो स्त्री असो किव्वा पुरुष. आपण केलेला स्वयंपाक चांगला व्हावा आणि त्यांनी लोकं तृप्त व्हावीत हे कोणाला वाटणार नाही.
" हे नाही खाल्लंत  तर काय खाल्लंत  " अशी जाहिरात आस्वाद आपल्या तिळगुळ आणि पुरणपोळी आईसक्रीमची करतंय. आपण तिळगुळ आणि पुरणपोळी तर खातोच. पण त्याचं आज आईसक्रीमसुद्धा बनवलं जातंय. हेच आपल्या सतत बदलत असणाऱ्या खाद्यसंस्कृतीचं ताजं उदाहरण आहे .प्रसिद्ध फूड ब्लॉगर सायली राजाध्यक्ष म्हणतात "खाद्यसंस्कृती म्हणजे नेमकं काय? फक्त खाद्यपदार्थ? तर नाही. माझ्या मते खाद्यसंस्कृती म्हणजे एखाद्या प्रदेशातले खाद्यपदार्थ, ते तयार करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ, त्यांची पैदास,  त्यावरून तयार झालेल्या म्हणी, प्रथा आणि परंपराही. या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती असं मला वाटतं. "

पूर्वी प्रत्येक घरात त्या-त्या कुटुंबाचे किंवा  जातीचे   पदार्थ केले जायचे. बाहेर जाऊन हॉटेलिंग करण्याचं प्रमाण फारच कमी होतं. बाहेरचं खाणं म्हणजे वाईट असेच संस्कार असायचे. आता बघाल तर प्रत्येक घरात पारंपरिक पदार्थांबरोबर थोडे वेगळे पदार्थसुद्धा बनवले जातात. पिझ्झा, पास्ता, chinese हे आज मराठी घरात सर्रास बनवले जातात.  सोयीनुसार आपण पाश्चात्य देशांप्रमाणे दूध आणि कॉर्न फ्लेक्ससुद्धा खायला लागलो आहोत. माझंच सांगायचं तर मी माहेरची सारस्वत आहे आणि लग्नानंतरची कोकणस्थ ब्राह्मण. माझी खाद्यसंस्कृती ही या दोन्ही खाद्यसंस्कृतीचा मेळ आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती ही एक अव्याहत सुरु असणारी प्रक्रिया आहे.

पूर्वी म्हणाल तर स्थानिक आणि ऋतूनुसार खाण्यास प्राधान्य होते. "Freezing " या संकल्पनेचा शोध न लागल्यामुळे त्या ऋतूच्या फळभाज्या "Freezer " मध्ये ठेवणेही शक्य नव्हते. कोकणातला माणूस नराळयुक्त पदार्थ खायचा आणि देशावरचा माणूस दाण्याच्या कुटायुक्त. काळानुसार हे चित्र बदलत गेलं."Storage Processing technology"  मधील प्रगतीमुळे अगदी हिवाळ्यातले कोवळे मटार फ्रीझर मध्ये ६-६ महिने ठेवता येऊ लागले. पण परत आता बघाल तर "eat local" या संकल्पनेला महत्त्व येत आहे. सुप्रसिद्ध फिटनेस तज्ञ ऋजुता दिवेकर यांचा याच संकल्पनेवर भर आहे. त्या म्हणतात "Eat what your grandmother ate" . याचं कारण असा की पिढ्यानपिढ्या तुमचं कुटुंब जर ते खात असेल तर ते तुमच्यासाठी पोषक असणारच. त्यामुळे कालची संस्कृती परत आजची संस्कृती होते आहे.

पूर्वी एखादी पाककृती शिकायची म्हणजे एकतर ती आई- आजीच्या हाताखाली शिकायची  किंवा पाककृतीच्या पुस्तकातून. हल्ली मात्र या पाककला शिकण्याच्या पद्धतीत फारच बदल झाले आहेत. आजकाल youtube videos आहेत पाककला शिकवणारे, फूड ब्लॉग्स आहेत, आणि पाककला  किंवा खाण्याशी निगडित फेसबुक ग्रुप्स ही आहेत. अंगत- पंगत हा असाच एक फेसबुक ग्रुप. इथे पारंपरिक महाराष्ट्रयीन रेसिपीस बद्दल चर्चा होते. या ग्रुपमध्ये गावांदेआजींच्या रवा खावा नारळांच्या लाडवांची रेसिपी share झाली. आणि लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. लोकांनी ते लाडू करून पहिले , इतकं की त्यामुळे गवांदे आजींच्या पुस्तकाची  चर्चा वाढून त्याचा खप खूप वाढला.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. गावा- शहराबाहेरचा नातेवाईक - मित्र जेव्हा घरी यायचा तेव्हा तो तिकडे त्याचा कोण ओळखीचा आहे त्याच्याकडे जेवायचा. अगदी लांबच्या ओळखीतली लोकसुद्धा हक्काने जेवायला यायची. हल्ली मात्र एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या व्यवसायात इतका व्यस्त असतो की एकमेकांकडे जाऊन जेवणं अगदी कमी होत चाललंय. हल्ली मात्र जेवायला बोलावण्याच्या पद्धतीत एक नवीन प्रकार आलाय तो म्हणजे पॉप अप किचन.पॉप अप किचन म्हणजे आपण अशा लोकांना जेवायला बोलवायचं ज्यांना आपण ओळखतोच असं नाही. आपण कुठला स्वयंपाक करणार ते ठरवायचं आणि त्याची तारीख आणि किंमत social media वरून जाहीर करायची. पॉप अप किचन मध्ये आपल्याला त्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचा घरगुती अनुभव घेता येतो. त्या खाद्यसंस्कृतीबद्दल अधिक जाणून घेता येतं.

पूर्वी जेवण सजावटीला फारसं महत्त्व नव्हतं. सजावट ही केवळ नैवेद्याच्या ताटाची किंवा केळवणाच्या पानाची केली जायची. हल्ली मात्र फूड स्टायलिंगला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. कुठलाही पदार्थ दिसताक्षणी खावासा वाटावा हा फूड स्टायलिंगचा उद्देश असावा. खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करून त्याची छायाचित्र काढणं हे food stylist आणि फूड फोटोग्राफरचं काम आहे.

आजच्या खाद्यसंस्कृतीतले आणखी काही प्रकार म्हणजे food walks . वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचीं ओळख व्हावी यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी food walks आयोजित केल्या जातात. कल्याण करमाकर हे असेच एक फूड ब्लॉगर आहेत जे food walks आयोजित करतात. food walks मध्ये वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचीं माहिती आणि ते पदार्थ खाण्याची संधीही मिळते.

कालची आणि आजची खाद्यसंस्कृती यांच्याबद्दल बोलताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे " comfort food " . ज्या अन्नाने आपल्याला अगदी तृप्त वाटतं ते म्हणजे "comfort food " . अगदी कितीही वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं तरी जे खावंसं वाटतं ते म्हणजे "comfort food ". उदा. माझं "comfort food " वरण भात आहे.

अजून एका गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं ते म्हणजे अन्न किती पौष्टिक आहे याचा विचार व्हायला हवा. जे अन्न खाल ते पारंपरिक असो व मॉडर्न ते पौष्टिक असलंच पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाशी सुसंगत असा पौष्टिक आहार असावा.

आजच्या खाद्यसंस्कृतीतील आणखीन एक भाग म्हणजे " food delivery startups" - हे आपल्याला जेवण घरपोच करणारे startups आहेत. आपण त्यांच्या website/ app वर जायचं, तिथे असतील त्या रेस्टॉरंट्स मधून खाणं ऑर्डर करायचं. यातले ubereats, swiggy, foodpanda काही startups आहेत.अशी खाद्यसंस्कृती यायला बरीच कारणं आहेत- हल्ली पुष्कळ प्रमाणात तरुण वर्ग कामानिमित्त बाहेर पडतो आहे.paying guest  किंवा sharing मध्ये राहत असताना सगळं स्वयंपाक घरी करणं शक्यच असतंच असा नाही. याने अनेक प्रश्न निर्माण होतात- असं सर्रास बाहेरचं खाणं ऑर्डर केलेलं बरं का? भारतात हल्ली diabetes  आणि हृदयरोगाचं प्रमाण फार वाढतंय. त्याला आपला आहारसुद्धा काही अंशाने जबाबदार आहे. तो सुधारायला हवाच. कुठलीही खाद्यसंस्कृती निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असावी. ती कालची असो व आजची - ती निरोगी आयुष्याची असावी. यावरूनच सांगते- लहानपणापासूनच आमच्या घरी घरचं खाणं आणि चौरस आहार यावर भर होता. घरची संस्कृती तशीच असल्यामुळे असेल कदाचित- माझी आजी जेव्हा ९२व्या वर्षी गेली तेव्हासुद्धा ती बऱ्यापैकी निरोगी होती. माझे सर्वात मोठे काका सध्या ९४ वर्षाचे आहेत, आणि बऱ्याच आत्या ७० च्या पुढे आहेत.या वयातसुद्धा त्या स्वयंपाक स्वतः करतात आणि वयाच्यामानाने बऱ्यापैकी ठणठणीत आहेत. याचं कारण म्हणजे ते फक्त घरचं अन्न खातात. आणि मी माझं नशीब समजते की माझ्या अडीच वर्षाच्या मुलीला असं घरचं जेवण म्हणजे पोळी, भात , लाडू आवडतो. रात्री तर भाताशिवाय ती झोपूच शकत नाही.

माझ्या भाषणाचा समारोप मी एका कवितेने करते. ही कविता मीच बनवली आहे.

खाद्यसंस्कृती कालची व आजची, असो ती कधीची
चवदार खाणं मिळो ही इच्छा आहे मनाची

वरणफळं म्हणा वा म्हणा इंडियन पास्ता
भाजी पोळी म्हणा वा म्हणा फ्रँकी
नावात काय आहे , पोटोबा चवीचा भोक्ता

या घरी जेवायला असे द्या निमंत्रण
किंवा पॉप अप किचनचं फेसबुकवर करा चित्रण
खाद्यसंस्कृतीची ओळख आणि पोटाची भूक हेच आमचे धोरण

नैवेद्याचे ताट दिसे सुंदर
cake वर फॉन्डन्टचे डिझाईनही दिसते उत्तम
"food styling " याच कलेचे नाव असे आजतर

रुचिरा होती स्वयंपाक शिकवणारी आई
youtube , फूड ब्लॉग, फेसबुक ग्रुपने स्वयंपाक शिकणं सोपं केलं ग बाई

खाद्यसंस्कृती कालची असो व आजची
पौष्टिक खाणं खावे हेच ब्रिदमंत्र धरावे उराशी

- धनश्री
(या भाषणात वापरल्या जाणाऱ्या काही माहितीचा संदर्भ- सायली राजाध्यक्ष यांचा ब्लॉग, त्यांचे लिखाण, अंगात पंगत या facebookgroup वरील चर्चा)

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...