Wednesday, February 19, 2020

मोठेपणा


‌गेल्या आठवड्यात रस्त्यावरून जाताना ओळखीच्या काकू भेटल्या. माझी त्यांच्याशी फारशी ओळख नाही म्हणजे  जाता-येता दिसतात फक्त. माझ्याबरोबर माझी लेक होती. ती कुठल्या शाळेत जाते अशी  काकूंनी चौकशी केली. माझ्या लेकीनं शाळेचे नाव सांगितलं. त्यावर त्यांनी आपला नातू कुठल्या शाळेत जात होता सांगायची सुरुवात केली. (आता त्यांचा नातू कॉलेजात आहे.) तर हा त्यांचा संवाद. "माझा नातू आर्य विद्यामंदिर शाळेत जात होता. मग त्याला IG बोर्ड हवा होता. अंबानी च्या शाळेत दोनदा ट्राय केली ऍडमिशन ,पण मिळाली नाही म्हणून मग शेवटी जमनाबाई मध्ये घेतली."त्यांच्या बोलण्यात नातू इंटरनॅशनल बोर्डात जातो त्याचा भयंकर मोठेपणा होता.  मला त्यांच्या वागण्याचं  नवल वाटलं. नातू कुठल्या शाळेत जातो यावरून कसला आलाय मोठेपणा?

‌ काही लोकांना आपण मोठ्या घरात राहतो किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी  राहतो याचा भारी मोठेपणा असतो. माझी आई मुंबईच्या दादरमध्ये वाढली. तिच्या माहेरचं हिंदू कॉलनीत पाच खोल्यांचं घर होतं. अतिशय मोठं घर आणि हिंदू कॉलनी सारखी सुशिक्षित सुसंस्कृत आणि पॉश लोकांची एरिया. तरीही माझ्या आईने कधीही- कधीही म्हणजे खरंच कधी एकदा सुद्धा आमचं असं मोठं घर होतं हे विधान केलेलं आठवत नाही. छोट्या घरांना तुच्छतेने बघितले असं  आठवत नाही. त्यामुळे मला घरावरून असा मोठेपणा करणाऱ्यांची खूप मजा वाटते.

‌ एकदा तर एका ओळखीच्या बाईंनी त्यांच्या मुलाला सासर्याने कसं दिल्लीचं विमान प्रवासाचं तिकीट काढून दिलं त्याचा मोठेपणा केला. मी त्यांना विचारलं तुमच्या मुलाची टिकीट काढण्याची सुद्धा ऐपत नाही का? असं म्हटल्यानंतर त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होता.

‌ काही लोकांना आपण किती फिरलो विशेषतः किती परदेश फिरलो याचा भारी मोठेपणा असतो. दुसरे काही विषय नसतात त्यांच्याकडे बोलायला. वाचन ,काम, अजून काही छंद,  काहीच नाही. मला म्हणायचं तुम्हाला फिरायचं होतं तुम्ही फिरला. त्याचा कसला आलाय मोठेपणा?

‌ मोठेपणा कसला आणि कुठे मारायचा त्याला सुद्धा काहीतरी सीमा असते. त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्व माणसाच्या वागणुकीला आहे. तो माणुसकीने वागतो का हे खरं महत्त्वाचं..बाकी  मोठेपणा करणं ही रिकामटेकड्या लोकांची कामं.
-धनश्री
#dsaidso
#randommusings

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...