It is my Aunt's 75th birthday today. We stayed together and she took care of us while we were growing up. Despite living in the same city, we did not meet today because of COVID social distancing protocol . They are senior citizens and I felt it was best to talk on phone and celebrate. Atya also did not force me to visit, she will never put others in a difficult situation anyway. I wrote a small write up on her, and it covers just maybe 1 % of what she did for us.
I could go on and on writing, this is just a small start maybe
माझ्या मीना आत्याचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे . पंच्याहत्तर म्हणजे लोक म्हातारं म्हणतात. काही लोक आम्ही केस रंगवतो आणि मेकअप करतो म्हणून आम्ही तरुणचं आहोत असं म्हणतात. काही लोक वय हे काम न करण्याचं excuse म्हणून वापरतात. माझ्या आत्याचं असं काहीच म्हणणं नसतं . जे आहे ते आहे. आपल्याला जमेल ते, पटेल ते आणि आपल्या संस्कारात बसेल ते करत रहावं असं तिचं म्हणणं असतं . लोकांचं चांगलं घ्यावं आणि वाईट सोडून द्यावं.
मीना आत्या शाळेत शिक्षिका होती. भूगोल, मराठी , संस्कृत, इंग्लिश हे विषय तिने शिकवले. ती आर्टस् ग्रॅजुएट आणि बी. एड. आहे. ग्रॅजुएशन झाल्यानंतर पोस्टग्रॅज्युएशन कर असे तिला तिचे शिक्षक सांगत होते. पण घरच्या परिस्तिथीमुळे नोकरी करणं गरजेचं होतं . लहानपणापासून आत्याला स्पोर्ट्सची आवड होती. कॅरम हा तर तिचा आवडता खेळ आणि त्यात तिने बक्षीसंही मिळवली आहेत . अगदी हल्लीचीच गोष्ट - २०१६ साली गावी गेली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिनियर सिटीझन कॅरम स्पर्धेत तिला बक्षीस मिळालं . मीना आत्या बद्दल लिहायला गेलं तर खूप आहे . इतकं की त्याबद्दल एक पुस्तकंच होईल. आठवणी खूप आहेत - वाढदिवसानिमित्त सुरुवात तरी करतेय.
लहानपणापासून मी ,आई ,बाबा ,माझा भाऊ, आत्या आणि आजी एकत्र राहतोय. आजी, आई बाबा, आत्यांनी आम्हाला वाढवलं . माझा भाऊ झाल्यानंतर बाय आत्या ( आमच्या वरच्या माळ्यावर राहायची) आम्हाला शाळेत सोडायची आणि मीना आत्या शाळेतून आणायची. अजूनही मी आईकडे गेले की लोकं याची आठवण काढतात. समजा मीना आत्याला काही काम असेल त्यावेळी, किंवा बाय आत्याला काही काम असेल , तर त्या आपसात ऍडजस्ट करायच्या . माझ्या आईला कधी मुलांना शाळेत सोडण्याचा प्रश्न सोडवावा लागला नाही, किंवा मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न पण कधी सोडवावा लागला नाही . आत्या आम्हाला अभ्यासात मार्गदर्शन करायची. वक्तृत्व स्पर्धेसाठी लायब्ररीतुन पुस्तक आणायची , काय लिहायचं ते सांगायची. वेगवेगळ्या परीक्षांसाठी बसायला प्रोत्साहन द्यायची.
माझी आई एअर इंडियात होती. त्यामुळे लहान असताना आम्ही विमानाने फिरायला जायचो. आजीबरोबर सोबत पाहिजे म्हणून आत्या थांबायची. कधीही तिने - तुमचं बाबा बरं आहे, तुम्हाला फिरायला मिळतं असं म्हटलं नाही. हल्ली असं बोलणारे लोकं सर्रास दिसतात , म्हणून आत्याच्या स्वभावाचं जास्तच कौतुक वाटतं. आत्या आम्हाला गावाला घेऊन जायची - मी, भाऊ आणि आत्या. आत्या अजून कुठे गेली तर आईला सुट्टी घ्यावी लागेल म्हणून आत्या आम्हाला घेऊन गावाला जायची. मे महिन्याचा सुट्टीत आम्ही खूप मजा करायचो. आत्या आमच्याबरोबर चेस, कॅरम, पत्ते खेळायची. मुख्य म्हणजे आम्हाला सांभाळायला लागतं म्हणून सुट्टीत समर कॅम्पला टाक अशी तिने माझ्या आई बाबांवर कधीही जबरदस्ती केली नाही. आत्या आणि आजीमुळे आमच्या सुट्ट्या मस्त carefree अख्खा दिवस खेळण्यात गेल्या.
आत्याचा शाळेतल्या ६ मैत्रिणींचा ग्रुप. कधी कधी मैत्रिणींनी भेटायला बोलावलं , आणि आमची काही परीक्षा असेल, आजीला काही बरं नसेल तर आत्या जायची नाही. आमच्यासाठी, घरासाठी थांबायची. अर्थात म्हणजे आई हे तेच करायची घर पहिलं. हल्ली - मी लहान मुलाला सोडून कशी फिरायला गेले हे मिरवण्याची पद्धत आहे. पण माझी आत्या आमच्यासाठी थांबली - एकदा नाही अनेकदा. नुसता माझ्यासाठी नाही , माझ्या मुलींसाठीसुद्धा . मी बंगलोरला असताना माझ्या आईला मुंबईला येण्याची गरज होती. तेव्हा मीना आत्या वेंगुर्ल्याला जाणार होती, तिकीट बुक होतं . पण ती माझ्या गरजेसाठी , मुलीला सांभाळण्यासाठी बंगलोरला आली. आत्याला मी विचारलं --" हल्ली स्वतःच्या मुलांसाठी , नातवंडांसाठी पण कोणी असं करत नाही, तू किती केलंस ". त्यावर तिचं म्हणणं -" मी माझ्या नातीसाठी केलं , तुला त्रास होऊ नाय, तू आमची म्हणून केलं ".
पैशाच्या बाबतीत, एकूणच आमच्या घरात काटकसरी आणि नसता खर्च न करण्याचं वातावरण होतं . मी नोकरीला लागल्यावर आत्याने मला savings करण्याची सवय लावली . ती सवय असल्यामुळे मला MBA च्या फीसाठी खूप फायदा झाला. स्वतःचा वाढदिवस आला की काही लोकांना स्वतःच कौतुक, गिफ्ट्स घेण्याची सवय असते. कधी कधी तर आपण हे घेऊया का? असं म्हणून वाट्टेल ती महागडी गिफ्ट्स लोक मुलांकडून घेतात. आत्याची अशी वृत्ती नाही. आमच्या घरात कोणाचीच अशी वृत्ती नाही .
आता सर्वात महत्वाचं - माझी आई आणि आत्या एकत्र राहिल्या.संसारिक डावपेच कळायला लागल्यावर बायका किती डॅम्बीस आणि राजकारण करणाऱ्या असू शकतात हे बघितलं . माझ्या आईने आणि आत्याने दोघीनींही हे केलं नाही. मी माझ्या आईला फोन केला आणि आत्याला काही सांगायला सांगितलं तर ते तसंच नक्की सांगितलं जाणार हे माहीत आहे आणि आत्याला फोन केला तरी तेच. आई आम्ही लहान असताना काही खायला बनवायची ते आई ऑफिसला गेली असताना आत्या आम्हाला द्यायची- त्यामध्येही राजकारण करून मुलांची वाट लावणारे असतात. तसं आत्याने केल नाही. हल्ली घरातली कामं करायची नसतील तर लोक शनिवार रविवार बाहेर पडतात. आत्या तसं करू शकली असती, आणि माझी आईसुद्धा तसं करु शकली असती. म्हणजे दुसऱ्यावर , जो घरी आहे त्यावर काम ढकलायचे . दोघीनींही तसं केलं नाही.
लिहिण्यासारखं खूप आहे, ते लिहीनच . सर्वात महत्वाचं , आत्या माझ्या गरजेच्या वेळेला उभी राहिली . तेव्हा तिला अनेक पर्याय होते- नुसता आराम करण्याचा , जग भटकण्याचा , ..पण ती माझ्यासाठी धावून आली . म्हातारपणी सगळ्यांना मुलं , नातवंडं आठवतात कारण जेव्हा चालण्याची ताकत नसते तेव्हा सगळ्यांनाच नाती आठवतात. पण माझ्या आत्याला मी प्रायोरिटी वाटले तिला ऑपशन्स असताना, यांतच सगळं आलं
-धनश्री
No comments:
Post a Comment