पुढे पुढे ती कधीच करत नाही - अशी माझी आई
शर्मिला ताई आणि नीलिमा ताई म्हणतात 'आम्ही तेव्हा महिना- महिना दादरला राहायला असायचो आणि नीमा आणि वीणा आमच्यासाठी रोज चपात्या बनवायच्या . त्यांची सकाळी नोकरीची घाई असताना त्या रोज आमच्यासाठी करायच्या. आणि हो तेव्हा चपात्या stove वर बनवायच्या ' . नीमा म्हणजे माझी आई आणि वीणा म्हणजे माझी मावशी. शर्मिला ताई आणि नीलिमा ताई माझ्या सर्वात मोठ्या चुलत मावस बहीणी.
त्या बोलल्या म्हणून मला आईने हे केलं ते समजलं नाहीतरी मला कळलंच नसतं. घरी कामवाल्या मावशी आल्या नाहीत म्हणून जरी चार चपात्या कराव्या लागल्या तरी लोक इतका इश्यू करतात, आणि येवढं काही करून माझ्या आईने मला कधीच हे सांगितलं नव्हतं.
तर हे लिहिण्याचे कारण म्हणजे आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. तिची स्तुती केली तरी ती - त्यात काय येवढं ? असंच नेहेमी म्हणते.
माझी आई एअर इंडिया मध्ये manager म्हणून रिटायर झाली. जेव्हा लोक भारतात सुद्धा विमान प्रवास करत नव्हते तेव्हा म्हणजे १९७८ साला पासून आईने सिंगापूर , स्वित्झर्लंड, मॉरिशस असे अनेक परदेश प्रवास केले. तेव्हा इंटरनेट नव्हतं तरी आईने सगळे एकटीने केले. पण एकदाही कधी मी येवढं फिरून आले आहे असं मिरवल तर नाही, साधा उल्लेख सुद्धा ती करत नाही.
तर माझ्या आईच्या वाढदिवसा निमित्त मी एक तिच्यासाठी कविता केली आहे. माझी आई एकदम साधी आहे. कधी ती स्वतः हे केलं ते केलं सांगणार नाही. मार्केटिंग अजिबात नाही. म्हणून या कवितेचे नाव आहे ' पुढे पुढे ती कधीच करत नाही '
एअर इंडिया मध्ये manager, घरी आमची आई
पुढे पुढे ती कधीच करत नाही
रोज स्वयंपाक करून खायला आम्हाला देई
शाळेचा अभ्यास रोज आमचा घेई
मी हे करते मी ते करते कधी म्हणत नाही
पुढे पुढे ती कधीच करत नाही
आस्तिक माझी आई देवाच्या पाया पडे
माणसाची सेवा हीच देवाची सेवा हे सदैव ती म्हणे
आजीची सेवा तिने मुलीप्रमाणे केली
नातीचाही सांभाळ तिने दिवसभर केला
मी हे करते मी ते करते कधी म्हणत नाही
पुढे पुढे ती कधीच करत नाही
प्रेमळ आहे ती खूप , गरजेला नेहेमी धावून येई
स्वयंपाक पूर्ण करेल, पण त्याचा गवगवा नाही
पुढे पुढे ती कधीच करत नाही
माणसाची आर्थिक परिस्थिती बघून तिची वागणूक बदलत नाही
श्रीमंत माणसाकडे गोड गोड आणि गरिबाकडे दुर्लक्ष
असं ती कधीच करत नाही
जगभर फिरून तिचा साधेपणा हरवला नाही
पुढे पुढे ती कधीच करत नाही
अशी माझी आई, हुशार आणि कर्तबगारी
पुढे पुढे ती कधीच करत नाही
No comments:
Post a Comment