सध्या चार दिवस बंगलोरमध्ये आहे. मुंबईहून काल सकाळी ८:२५ च्या विमानाने बंगलोरला जायला निघाले. बंगलोरला साधारण ११:०० च्या सुमारास विमानतळातून बाहेर पडले.त्यावेळी चक्क मस्त वारा वाहत होता. मुंबईच्या कडक उकाड्यातून बंगलोरला आल्यावर आपण एका थंड हवेच्या ठिकाणी आलो असं वाटत होतं. घरी पंखा नाही लावला तरी जराही उकडत नव्हतं. काल घरातली कामं केली. थोडं वाण्याकडून सामान आणलं , घरातला पसारा आवरला, स्वयंपाकाची तयारी अशी एक नी अनेक कामं केली. आज सकाळी माझा नवरा म्हणाला "कब्बन पार्क" ला जाऊया. नाश्त्याला मस्त गरमागरम पोहे करून आम्ही कब्बन पार्कला ९:३० वाजता पोचलो. मला वाटलं होतं एवढ्या उशिरा ऊन आल्यावर काही जास्त फिरायला मिळणार नाही. हा माझा अंदाज पूर्णपणे चूकीचा ठरला. तिथे इतकी दाट झाडं होती , त्यामुळे ऊन आलं आहे कि नाही हेच कळत नव्हतं . आम्ही कब्बन पार्कमध्ये चालायला सुरवात केली. कब्बन पार्क हे साधारण ३०० एकर भर पसरलेलं आहे. त्यामुळे सगळं काही फिरणं शक्य नव्हतं . योगायोगाने आम्हाला पार्क मध्ये फिरवणारी गाडी दिसली. १५ मिनिटांसाठी प्रत्येकी ६० रुपये असा त्यांचा दर होता. आम्ही त्या गाडीत बसलो.त्यांनी आम्हाला तो परिसर दाखवला. कब्बन पार्क मध्ये वेगवेगळ्या बागा आहेत. एक "डॉग पार्क" आहे जिथे लोकं त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणतात. कब्बन पार्क हे बंगलोरच्या मध्यवर्ती प्रशासकीय विभागात आहे. त्यामुळे पार्काच्या परिसरात आणि आजूबाजूला विधानसौधा , सेंट्रल लायब्ररी, बाल भवन , गव्हर्मेंट म्युझियम आहेत. ही सफर झाल्यावर आम्ही लहान मुलांच्या बागेच्या शोधात निघालो. आमच्या दोन वर्षाच्या मुलीला तिथे आम्हाला घेऊन जायचं होतं . तिथे "टॉय ट्रेन" आहे असं आम्ही ऐकून होतो. पण तिथे गेल्यावर कळलं ती ट्रेन ११:०० ला सुरु होते आणि आता १०:१५ वाजले होते. त्यामुळे आम्ही अजून पुढे चालायचा ठरवलं. तिकडे तर इतकी झाडं होती, अतिशय गारवा वाटत होता . आम्ही झाडाखालच्या एका बाकावर बसलो. इतकी थंड हवा होती,आम्हाला तिथेच राहूया असं वाटत होतं. आम्ही तिथे जवळजवळ अर्धा तास बसलो. खूप प्रसन्न वाटलं , शरीरात एक नवीन ऊर्जा आली आहे असं वाटलं.
तर तुम्हीही कब्बन पार्कला जा आणि तुमचे अनुभव कळवा . तिथे जायला मेट्रो आहे जी कब्बन पार्क स्टेशनला थांबते.
तर तुम्हीही कब्बन पार्कला जा आणि तुमचे अनुभव कळवा . तिथे जायला मेट्रो आहे जी कब्बन पार्क स्टेशनला थांबते.
No comments:
Post a Comment