Wednesday, June 14, 2017

पु. लं आणि आठवणी

१२ जूनला पुलंचा १७वा स्मृतिदिन झाला त्यानिमित्ताने काही ..

"आई , बाटली भरून दूध " हा गजर करत माझी वयाच्या पाच वर्षापर्यंत उठण्याची सवय. एक दुधाची बाटली संपल्यावर दुसरी आणि दुसरी मिळेपर्यंत रडारड. ही रडारड ऐकून आमचे शेजारचे आबा म्हणत, "अहो धनु ची आई , काय झालं ? द्या हो तिला दूध " आबांचा हा आवाज ऐकताच मी अजून हट्टीपणा करत असे. आबांची मी लाडकी होते. आबांच्या आवाजाबरोबर त्यांच्याकड़े चालू असलेल्या ऑडियो कॅसेट चा आवाज ऐकू येत असे. एवढ्या सकाळी आबा काय ऐकतात हा कुतूहल होताच. त्याव "आबा पु.लं .ची कॅसेट लावतात गं" असं माझी आजी म्हणाली. पु. लं. ची माझी ही पहिली ओळख. पु. लं च्या कॅसेट ने माझं गुड मॉर्निंग होत असे. पु.. हे कोण , किती मोठे व्यक्तिमत्त्व हे तेव्हा काही कळायचं नाही.थोड मोठं झाल्यावर लक्षात आलं कि पु.. हे मराठी साहित्याचा एक अविभाज्य घटक आहेत . त्यानंतर त्यांची भरपूर पुस्तकं वाचली . "तुम्ही कोण होणार, मुंबईकर , पुणेकर की नागपूरकर", "चितळे मास्तर" ... कॅसेटस ऐकल्या. पुलं. ऐकणं म्हणजे पुरेपूर मनोरंजन. अजूनही ऑफिस मधून आले आणि पुलंचे व्हिडिओ youtube वर बघितले तर ऑफिसमधले ताणतणाव पूर्णपणे विसरायला होतात.
माझी पुलंशी दोनदा भेट झाली. खरं सांगते, का कोणास ठाऊक, बोलण्याचं धाडस कधीच झालं नाही. पहिली भेट एका लग्नात झाली. मावशीच्या ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याच्या लग्नात. दुसरी भेट शिवाजी पार्क येथील ठाकूर हॉस्पिटल मध्ये झाली. सुनीताताई देशपांडे ह्या डाॅ. श्रद्धानंद ठाकूरांच्या बहीण. आणि ठाकूर हॉस्पिटल आमचं जणू काही फॅमिली हॉस्पिटल आहे. माझा, माझ्या भावाचा, माझ्या मुलीचा जन्म तिकडेच झाला. 
फार कमी लोकांना माहिती असेल की सुनीताताई देशपांडे ह्या पुलंच्या दुसऱ्या पत्नी होत्या. पुलंची पहिली बायको माझ्या आईच्या काकूची बहीण, कर्जतच्या दिवाडकर कुटुंबातली मुलगी.लग्न झाल्यावर एका वर्षात तिचं निधन झालं. त्यानंतर पुलंचा विवाह सुनीताताईंशी झाला.
२०१२ सालची गोष्ट. आबा आता नवीन सोसायटीत रहायला गेले. त्यांना भेटायला गेले तेव्हा आबांनी विचारला "अगं धनु ही पुलंची कॅसेट आणलीय. घरी घेऊन जा आणि ऐक". खरं सांगायचं तर इंटरनेट आणि youtube च्या काळात मला ह्या कॅसेटची गरज नव्हती. पण ती पुलंची कॅसेट देताना आबांच्या डोळ्यात जी चमक होती ती बघून नाही म्हणणं केवळ अशक्य होतं. आज ८७व्या वर्षी पुलंची ची कॅसेट देताना आबांच्या चेहऱ्यावर अगदी निखळ आनंद होता.त्यावेळी पु लं आपल्यात नव्हते. पण त्या वयात त्यांना एवढं हसू आणि आनंद कदाचित फक्त पुलंचे शब्दच देऊ शकत होते.
भा. रा. तांबे म्हणतात "जन पळ भर म्हणतील हाय हाय ,
मी जाता राहील कार्य काय? "
पु लं तुमचा कार्य इतकं मोठ आहे आणि आम्ही अजूनही त्यामुळे खदाखदा हसतो, लेखन वाचून विचारांनी समृद्ध होतो.

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...