२० जून - बऱ्याच लोकांसाठी ही कॅलेंडर मधील नेहेमीसारखीच एक तारीख. पण माझ्यासाठी २० जून ला वेगळंच महत्त्व आहे. २० जून २०११ हा माझा IIMB
( IIM Bangalore )मधील शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. आज त्या दिवसाला सहा वर्ष उलटली. मला आठवतं बाबा मला पोचवायला आले होते बंगलोरला.
२००८ साली इंजिनीरिंग नंतर मी लेहमन ब्रदर्स ह्या अमेरिकन बँकेत नोकरीला लागले. काहीतरी कठीण आणि आव्हानात्मक करावं म्हणून CAT देण्याचं ठरवलं. IIM
मधील MBA साठी CAT द्यावी लागते हे माहिती होतं . २००८ साली CAT दिली आणि मला ९८.७३ Percentile मार्क पडले.ह्या मार्कांवर मला IIM बंगलोर, इंदोर आणि शिलाँग ह्यांनी Interview साठी बोलावलं.त्यानंतर मी फक्त शिलाँग मध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवू शकले. पण काय कोणास ठाऊक , माझं मन सांगत होतं , IIM अहमदाबाद , बंगलोर, किंवा कलकत्ता मिळालं तरच MBA करायचं . नोकरी उत्तम चालू होती. त्यामुळे नोकरीला कंटाळले म्हणून MBA करते असं मुळीच नव्हतं . पुढे काहीतरी अजून मोठं शिकायचं, करायचं ही एकच इच्छा होती. मी परत २००९ साली CAT दिली. तेव्हासुद्धा हवं तेवढं यश मिळालं नाही. त्यावर्षी मला दिल्लीतील FMS मध्ये प्रवेश मिळत होता. मी ठरवलं FMS न घेता परत एकदा IIM साठी प्रयत्न करायचा. २०१० मध्ये परत CAT दिली. खरंतर तेव्हा नियमितपणे पेपर सराव वगैरे करायचा कंटाळा आला होता. अर्थातच आदल्या दोन वर्षांची मेहनत होतीच. मुख्य म्हणजे जास्त ताण न घेता मी त्या वर्षी ती परीक्षा दिली. त्याचं फळ म्हणजे मला IIMB मध्ये त्यांच्या PGP(MBA) मध्ये प्रवेश मिळाला. ज्यादिवशी मी माझा निकाल बघितला, तेव्हा माझा आनंद गगनात मावेना. तीन वर्षांची मेहनत होती. ह्या तीन वर्षात माझे कुटुंबीय आणि शिक्षक अगदी माझ्या पाठीशी उभे होते.
आज मला IIMB मधून पास होऊन ४ वर्ष झाली. IIM मधून पास झाल्यावर लोकं त्याचा आर्थिकद्रुष्ट्या फायदा झाला का असा नेहमी विचार करतात. तो विचार मीही करते, ह्याला अपवाद नाही. आर्थिक फायदा झाला की नाही ह्याचं उत्तर काळानुसार बदलेल . पण दोन वर्ष भारतातल्या बुद्धिमान आणि कर्तबगार लोकांबरोबर राहून जी जडणघडण झाली त्याचं मोजमाप पैशात करणं शक्य नाही . इतका अभ्यास आणि परीक्षा असायच्या , त्यातून ताण घेऊन त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे शिकलो. उच्चशिक्षित आणि अतिशय नम्र शिक्षक बघून " विद्या विनयेन शोभते" ह्याचा रोज प्रत्यय आला .
IIMB मधल्या आठवणी आणि अनुभव खूप आहेत.. पुढे कधीतरी लिहिनंच ..आज खास सहावर्षांपूर्वीची आठवण म्हणून हे लिहावसं वाटलं.
IIMB मधल्या आठवणी आणि अनुभव खूप आहेत.. पुढे कधीतरी लिहिनंच ..आज खास सहावर्षांपूर्वीची आठवण म्हणून हे लिहावसं वाटलं.
No comments:
Post a Comment