"सारस्वत लोकं खाण्यासाठी जगतात" खूप वर्षांपूर्वी एका समारंभात ऐकलं होतं. मी माहेरची सारस्वत आहे आणि माझ्याबाबतीत तरी हे वाक्य १००% खरं आहे. मला खाण्याची प्रचंड आवड आहे, त्यात सर्वात आवडता स्वयंपाक म्हणजे अस्सल सारस्वती पद्धतीचा स्वयंपाक. अर्थात मला ब्राह्मणी पदार्थ सुद्धा आवडतात, करायला आणि खायला सुद्धा. खाण्याची आवड, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं असा नव्हे. याचा अर्थ म्हणजे माझ्यासाठीतरी चविष्ट खाणं असा आहे. मीटिंग होती म्हणून खायचं विसरले असं माझ्याकडून होणारच नाही. उलट मीटिंग लांबेल या भीतीनेच मी आधीच खाऊन घेते.
अगदी लहानपणापासून आई, आत्या, आजीकडून खाण्याचे मस्त लाड पुरवले गेले.चपाती भाजी भात आमटी कडी तर असायचीच त्याशिवाय कधीतरी जे तोंडी लावण्यासाठी अन्य प्रकार केले जायचे त्यातला एक प्रकार म्हणजे कापी. माझी आत्या अगदी उत्कृष्ट कापी बनवते, दर आठवड्याला ती आमच्यासाठी बनवायची. आमच्याकडे जास्तीकरून बटाट्याचे कापी व्हायचे , पण वांग्याचे , केळ्याचे , सुरणाचे सुद्धा काप केले जातात.
कापी हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. बटाटे उभे चिरून, धुऊन मीठ लावून ठेवायचे. थोड्या वेळाने लाल तिखट लावून घ्यायचं. आणि मग ते काप तांदळाच्या पिठात भिजवून पॅनवर shallow fry करायचे. बटाटे शिजले की मस्त कापी तय्यार.माझ्या लेकीलासुद्धा कापी खूप आवडतात. आज तिच्यासाठी वरण भात आणि कापी केल्या. तिने " मस्त झालंय" असं सांगितलं. लेकींकडून प्रेमाने कौतुकाची थाप मिळाली. अगदी मस्त वाटतंय.
- धनश्री
- धनश्री
No comments:
Post a Comment