Tuesday, October 10, 2017

मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ

हृतिक रोशनच्या लक्ष्य चित्रपटातील हे गाणं " मै ऐसा क्यूँ हूँ " या गाण्याचा समारोप " मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ " याने होतो. आपण जसे आहोत तसे आहोत, ते जाहीरपणे कबुल करण्यात काहीच कमीपणा नाही. 
एकदा आमच्या सोसायटीत एका मुलीचा दुसऱ्या मुलीच्या पायावर चुकून पाय पडला. जिच्यावर पाय पडला तिने विचारलं " आंधळी आहेस का ? ". ती पहिली मुलगी " हो, मी आंधळी आहे" असं म्हणाली. हे खरंतर थोडंसं खूप straightforward वाटू शकेल. प्रत्येक वेळी असं उत्तर देणं बरोबर असेल असंही नाही. पण हे उत्तर आपला ठामपणा दर्शवण्यात खूप मदत करतं.
सोशल मीडियाच्या आणि फेसबुकच्या युगात आपल्याला " conforming to crowd mentality" याचं खूप दडपण येऊ शकतं. उदा. तुमचे मित्र लग्नाच्या वाढदिवसाला फिरायला गेले आणि तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला अगदी आपण हे काय करतोय असं वाटू शकतं.तुम्हाला जाण्याची गरजही वाटत नसेल पण केवळ लोक काय म्हणतील/ विचारतील याने तुम्ही त्रस्त होत असाल. त्यावरून कोणी तुम्हाला विचारलं " हे असं का करता, तुम्ही असे आहात का? " तर बऱ्याचदा आपण स्पष्टीकरण द्यायला जातो. म्हणजे जर कोणी विचारलं " काय हे, ट्रेन ने काय जातोस , एवढे पैसे कमावतोस ना. " तर अशा वेळी ट्रेन ने जाण्याचं स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी " मी गरीब आहे " असं म्हटलं तर प्रश्नच मिटला.कोणी आपल्याला गरीब म्हटल्याने आपण थोडीच गरीब होतो?
माझी लेक मला असे बरेच अनुभव देते आजकाल. मी तिला जेव्हा सांगते "अगं असं करू नकोस, लोक हसतील " , तेव्हा ती मला " लोक हसू दे " असं उत्तर देते.
मी तिला जेव्हा सांगते "तू वेडी आहेस का, वेडी मुलं असं करतात " , तेव्हा ती मला "मी वेडी आहे " असं उत्तर देते. मला जे अजून जमत नाही ते ती करून दाखवते.
त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारलं की "तू अमुक तमुक आहेस का " , तर हो " मी अमुक तमुक आहे" असं म्हणूंन बघा. चर्चा तिकडेच संपेल. कोडगेपणा असणारे तर हे नेहेमीच करतात. तुमच्यात कोडगेपणा नसेल तर योग्य वेळी हे उत्तर देता आलं पाहिजे. " मै ऐसा क्यूँ हूँ" ला "मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ" हे उत्तर देऊन बघा!
- धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...