Monday, October 16, 2017

"आबा" टिपरे

दादरच्या शारदाश्रम सोसायटीच्या "G "विंग मधल्या दुसऱ्या माळ्यावर माझी आत्या राहायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तिच्याकडे राहायला जायचे. तिथे तिचा पुतण्या म्हणजे देवदत्त दादा तेव्हा काहीतरी कॉम्पुटर काम करून बिझनेस करायचा. ही साधारण १९९८-२००० ची गोष्ट.त्याकाळी आजच्या सारखे घरोघरी कॉम्प्युटर नव्हते. त्यामुळे कॉम्प्युटर वर देवदत्त दादा काय करतो ही उत्सुकता होती. तेव्हा कळलं की तो काहीतरी वेबसाईट, ऍनिमेशन असं काम करतो. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कळली तर ती अशी की तो दिलीप प्रभावळकर यांची वेबसाईट डिझाईन करतो. तेव्हा सुरुवातीला दिलीप प्रभावळकर कोण हे माहित नव्हतं. नंतर कळलं  दिलीप प्रभावळकर म्हणजे हसवा फसवी या नाटकात विविध भूमिका करणारे नट. दिलीप काका तेव्हा शारदाश्रम सोसायटीतच राहायचे. आणि ते माझ्या आत्याच्यासमोरच्या विंग मध्ये पहिल्या माळ्यावर राहायचे.त्यामुळे तिथे राहायला गेलं की तिच्या गॅलरीत उभं राहून दिलीप काका दिसतील का असं आम्हाला वाटायचं. ते दिसतील या आशेपायी मी कितीतरी वेळ गॅलेरीत उभी राहायचे. पण ते काही कधी दिसले नाहीत. देवदत्त दादाला सांगून त्यांना भेटायला जाणं तेव्हा थोडं odd वाटत होता. गेले तरी बोलणार काय असा प्रश्न पडायचा.
नंतर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली.त्या मालिकेपासून मी दिलीप काकांची जणू काही फॅनच झाले. ते आता माझे आबा होते. २००१ साली मला माझे सक्खे आजोबा नव्हते. फक्त आमच्या शेजारचे आबा होते. त्यामुळे टिपरे आबांमध्ये मी माझे आबा शोधात होते. प्रत्येक टिपरेचा एपिसोड बघताना मला माझे आबा दिसत होते. मी श्रीयुत गंगाधर टिपरे अजूनही YouTube वर बघते. टिपरे घरातलं हलकं- फुलकं कौटुंबिक वातावरण बघायला खूप मजा येते. तर असं एकदा ऑफिसमधून आल्यावर मी YouTube वर टिपरे बघत होते. मी शक्यतो माझी लेक बरोबर असताना YouTube वगैरे काही बघत नाही. कारण ती बघायचा हट्ट करते आणि सारखी गाणी लावायला सांगते. त्यादिवशी मात्र खूप दमायला झालं होतं आणि काहीतरी छान बघावंसं वाटत होतं. त्यामुळे मी टिपरे लावलं.लेकीला सांगितलं आबांना बघतेय. माझी लेक चक्क आवडीने टिपरे बघू लागली.१८ व्या एपिसोड मध्ये एक सीन होता ज्यामध्ये आबा मध्यरात्री उठतात . ते बघून माझी लेक म्हणाली " आबा डोकं टेका, आबा डोकं टेका" . ती टिपरे मालिकेशी  relate करू शकत होती. मग मला म्हणाली " आबा कुठे राहतात, आबांकडे जाऊया का?" मी तिला म्हणाले वैशाली मावशीच्या ( माझ्या आत्या ची मुलगी ) समोर राहतात. तेव्हा ती म्हणाली "वैशाली मावशीकडे जाऊया का ? आबांना फोन करूया का?"  मला या गोष्टीचं फार नवल आणि कौतुक वाटलं .१५ वर्षांपूर्वी मी जेव्हा १५ वर्षांची होते तेव्हा आबा मला जितके आपलेसे वाटत होते तेवढेच आज ते माझ्या अडीच वर्षाच्या लेकीला वाटले. Aaba is timeless .टिपरे या मालिकेला आणि आबांना माझा सलाम 🙏
-धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...