मी माहेरची सारस्वत आहे. सारस्वतांचे जेवण म्हणजे खोबऱ्याचे वाटण आणि जेवणाचे चोचले.वन-बोल मील हा प्रकार तर नसतोच. चपाती भाजी भात आमटी आणि सोलकडी/ताकाची कडी. अगदी संध्याकाळी भरपूर खाल्लेलं असेल तरी भात जेवल्याशिवाय झोपायचं नाही. आता काळानुसार काही पद्धती बदलायला लागल्या आहेत. आणि घरा-घरानुसार तर पद्धती बदलतात.
ही सगळी प्रस्तावना देण्यामागचं कारण असं कि सारस्वत पद्धतीचं जेवण मला जरा वेळखाऊ असतं . त्यामुळे माझ्या आईने जेव्हा मला एक सोपी रेसिपी दिली तेव्हा मला अगदी मस्त वाटलं. ही रेसिपी आहे गुळाच्या पोळ्यांची. पोळे म्हणजे आपण धिरडी म्हणतो तसंच . माझी आई म्हणते शाळेतून आल्यावर जेव्हा त्यांना भूक लागायची तेव्हा आजी तिला हे पोळे करून द्यायची. तर यांची कृती याप्रमाणे. -
जितकं कणिक घ्याल तितकंच गुळ घ्या. गुळाचा पाक आधी करून घ्या. पाक करताना थोडंसं पाणी घाला. पाक थंड होईपर्यंत एका भांड्यात कणिक काढून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घाला. पाक करून झाल्यावर थंड होऊन द्या. थंड झाल्यावर कणकेत घाला. मस्त एकत्र करा, पाणी कमी जास्त करा आपल्या सोयीप्रमाणे . या पिठाची consistency साधारण आपल्या डोश्यांचा पिठाप्रमाणे असावी. पीठ तयार झाल्यावर नॉन- स्टिक पॅन वर थोडंसं तूप लावून डोश्याप्रमाणे हे पोळे काढा.
हे पोळे संध्याकाळच्या खाण्यासाठी मस्त आहेत. कधी ऑफिसमधून आल्यावर काही करायला वेळ नसेल तर हे अगदी पटकन होतात. फक्त दोन प्रमुख घटक पदार्थ - कणिक आणि गुळ.
-धनश्री
No comments:
Post a Comment