Wednesday, December 27, 2017

शब्द शब्द

शब्द- मानवाला पशु प्राण्यांहून वेगळी/ जास्त दिलेली देवाची देणगीच म्हणा ना. लहान मुलं ऐकून- ऐकून भाषा शिकतात. शब्दाचा संदर्भ लावून ते काही शब्दांचे  अर्थ लावतात. लहान मुलांशी तुम्ही जितक्या भाषा बोलाल, मुलं तितक्या भाषा शिकतात. प्रत्येक भाषेतील शब्द, व्याकरण हे निराळं असतं. आपल्या मनातील एकाच भावाला विविध भाषा त्यांचा शब्दात व्यक्त करण्याची मुभा देतात. शब्दांचं मूळ काम तर भाव व्यक्त करणे. पण शब्द कुठल्या परिस्थितीत  बोलला जातोय त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. तो कुठल्या प्रकारे बोलला जातोय त्यानेही अर्थ ठरतो. शब्दांना थोडा "emotional  drama" जोडला तर खोटं सुद्धा खरं वाटतं. "Body language " या संकल्पनेला यामुळेच महत्त्व आहे. सतत गोडं बोलणारी माणसं प्रथमदर्शनी लोकांना आवडतातच. एखादं काम करायचं नसेल तर ते गोड बोलून काम टाळणं ही कामचुकार माणसाची तर एक कलाच आहे.

"काळजी घे", " मी तुला मदत करेन" या नुसत्या शब्दांना काही अर्थच नाही.काळजी असल्याप्रमाणे वागणूक आणि वेळेगरजेला मदत हे जर वागण्यातून दिसून आलं तर काही त्या शब्दांना अर्थ आहे.

वपु म्हणाले होते , "काही काही शब्द, वाक्यं, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद, साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते." काही शब्द , विधानं, प्रश्न अगदी सहजपणे विचारले जातात. पण त्यामागचा हेतू सरळ असतोच असं नाही.  आपलं मत समोरच्या माणसाच्या गळी उतरवण्यासाठी भावनेला हात घालून कारणं सांगितली जातात. उदा. तुम्ही तुमच्या मुलासाठी खर्च न करून कसं नुकसान करताय अशी भावनिक सबब देणं. एखादं विधान परत परत विशेषतः भावनिक रित्या बोलल्या गेल्याने लोकं त्याच्या बळी पडतात.

"मी माझा शब्द ठेवेन" असं काही लोकं म्हणतात. याचा अर्थ जे मी बोलेन , मी तसाच वागेन. असं बोलूनही सगळे आपला शब्द पाळतात असं नाही. असं झालं तर, आपला त्या माणसावरचा विश्वास उठतो.  शब्द पाळणाऱ्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवला जातो , आणि शब्द न पाळणाऱ्या माणसाची कोणीच किंमत करत नाही. त्यामुळे जसं माणसाची किंमत शब्दावरून ठरते तसंच शब्दाची किंमत माणसावरून ठरते.

"हा खेळ सावल्यांचा" या मराठी चित्रपटातील रात्रीस खेळ चाले या गाण्याच्या दोन ओळी( काही शब्द बदलून) लिहून मी "शब्दावरील" माझे शब्द संपवते..

जे सत्य भासते ते असती नितांत भास
हसतात शब्दाला हा दोष आंधळ्यांच्या

असाच खेळ चाले हा खेळ शब्दांचा
संपेल न कधीही हा खेळ शब्दांचा

-धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...