Sunday, May 13, 2018

बाम काका- आठवणी

क्रीडा मानसतज्ञ कै भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  काही आठवणी . ते माझ्या आजीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे.
“आपल्या वरती पोलीस राहतात ना  ते आता येणार आहेत आपल्याकडे " माझी मावशी  मला म्हणाली. मी तेव्हा दुसरीत होते. त्यावेळी मनात पोलिसांची प्रतिमा म्हणजे काय - तर शेवाळी युनिफॉर्म,  धिप्पाड बांधा , मोठी मिशी,मोठे डोळे  अशी होती. थोडक्यात काय तर थोडीशी भितीदायक प्रतिमाच होती . त्यामुळे त्यांना भेटणे टाळायचे म्हणून  मी आतल्या बेडरूम मध्ये जाऊन बसले. "अगं बाम साहेब आले आहेत ग, बाहेर ये सोन्या" असं माझी मावशी म्हणाली. मला बाहेर जायचं नव्हतं. म्हणून मी  आतच बसून होते. बघते तर काय, मी बाहेर येत नाही म्हणून बाम काका आत आले. अशा प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे पोलीस असतात हे मला तेव्हा पहिल्यांदाच कळलं . खरं सांगायचं तर दिसण्यावर तसं काहीच नसतं , पण लहान वयात प्रथमदर्शनी जर कोणाची थोडी भितीदायक प्रतिमा झाली की त्या माणसाकडे जायला भिती वाटते एवढंच . बाम काका आणि काकी त्यादिवशी माझ्याशी अगदी आपुलकीने बोलले. तेव्हापासून आपल्या आजीच्या बिल्डिंगमध्ये पोलीस राहतात याची भिती वाटण्यापेक्षा, अभिमान वाटला . बाम काका IPS Officer होते. निवृत्त होताना ते IGP - Inspector General of Police म्हणून निवृत्त झाले. ते एवढ्या मोठ्या पदावर होते याची त्यांनी कधीही जाणीव करून दिली नाही. आम्हाला ते माहित होतं , पण त्यांनी त्यांच्या  वागण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. नुसतं त्यांच्या नाही , तर बाम काकींच्या किंवा त्यांच्या मुलांच्या वागण्यातून, बोलण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं  नाही. अगदी down to earth वागणूक होती त्या सगळ्यांची .
एकदा माझी मावशी त्यांच्याकडे गेली होती, तेव्हा तिने बघितलं  की सचिन तेंडुलकर आला होता त्यांच्याकडे . त्यानंतर आम्हाला कळलं की ते एक प्रख्यात sports psychologist आहेत. त्यांच्याकडे  मोठमोठे  खेळाडू Counselling साठी यायचे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अंजली वेदपाठक आणि असे अनेक. नुसते खेळाडू  नाही तर मोठमोठे surgeon मोठं ऑपेरेशन करण्याच्याआधी त्यांच्याकडे counselling साठी यायचे. मी स्वतः सुद्धा त्यांच्याकडे MBA प्रवेश परीक्षेच्याआधी मार्गदर्शनासाठी गेले होते. ते yoga , प्राणायाम करण्यावर खूप भर द्यायचे. tennis /badminton असा एखादा प्रत्येक shot ला decision making लागणारा खेळ खेळावा असं ते म्हणायचे. शिकत असताना त्यांना बऱ्याच वेळा भेटण्याचा योग्य आला. तेव्हा ते निवृत्त झाले होते आणि  निवृत्तीनंतर ते नाशिकला राहायला गेले. तरी त्यांचं मुंबईला बऱ्यापैकी येणं- जाणं होतं . आम्हाला त्यांनी नाशिकला येण्याचं बऱ्याचदा आग्रहाने निमंत्रण दिलं होतं . तिथे त्यांचा व्याप बराच मोठा होता . IAS साठी तयारी करण्याचं मार्गदर्शन करायचं , लेक्चर , counselling हे सगळं चालूच होतं . तरीही जेव्हा ते मुंबईला यायचे तेव्हा माझ्या मावशीला " राणी कशी आहेस" असं विचारल्याशिवाय जायचेच नाहीत. माझ्या मावशीला त्यांचा खूप आधार वाटायचा .
गेल्यावर्षी बाम काकांचं लेक्चर   मध्ये असताना निधन झालं . आपली आवडती गोष्ट  करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली . गेल्यावर्षी ही  बातमी ऐकल्यावर खूप वाईट वाटलं. आधी विश्वासच बसत नव्हता. आज त्या गोष्टीला एक वर्ष झालयं. त्यानिमित्ताने हे लिहावंसं वाटलं . बाम काका एवढ्या मोठ्या पदावर होते ह्याच्यापेक्षा त्यांच्या  वागणुकीमुळे ते आम्हाला सदैव लक्षात राहतील. माणसाची किंमत त्याच्या श्रीमंतीमुळे, मोठ्या घरामुळे किंवा अजून कशामुळे नसून त्याच्या माणुसकीमुळेच ठरते. निदान माझ्यासाठी तरी!

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...