सगळ्यांचे लाडके आणि दादरकरांचे भूषण अशा देवकाकांच्या स्मृतिप्रत्यार्थ २७ डिसेंबर रोजी "जुळल्या सगळया त्या आठवणी" हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारकामध्ये मध्ये संपन्न झाला . देव काकांची विविध प्रकारची गाणी या कार्यक्रमात सादर झाली. नुसती गाणीच नव्हे तर त्या गाण्यांशी निगडित आठवणी , किस्से, त्यांच्या शिष्यांचे अनुभव या सगळ्यामुळे ती मैफिल अजूनच रंगली .
देवकाका हे आपल्याला उत्तम संगीतकार म्हणून माहित आहेतच. त्याचबरोबर ते एक उत्तम कवी , शिक्षक आणि माणूस कसे होते याची जाणीव या कार्यक्रमानंतर झाली.
देव काकांचं शिक्षण विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात झालं. पण लहानपणापासूनच घरी संगीताचे संस्कार होत गेले. त्यांच्या घरी मोठमोठे गवय्ये यायचे. आकाशवाणीत नोकरीसाठी गेले असताना त्यांना विचारल गेलं - तुम्हांला काय येतं? तेव्हा त्यांनी पेटी वाजवता येते असं सांगितलं. तेव्हा आकाशवाणीत पेटीवर बंदी होती . शेवटी त्यांना विचारलं गेलं , तुम्हाला सतार वाजवता येते का? तेव्हा ते नोकरी मिळवण्यासाठी सतार वाजवता येत नसूनही हो म्हणाले आणि मग चक्क ७ दिवसात सतार शिकले.
देवकाका नागपूर आकाशवाणीत नोकरीला असतानाची गोष्ट. साधारण १९६८-१९७० चा सुमारास संगीतकर प्रभाकर जोग यांनी देवकाकांना मुंबईहून पत्राद्वारे स्वर लिहून पाठवले. संगीतकाराने चाल लिहिली आणि मग त्यावर गाणं लिहिण्याचा हा देव काकांच्या आयुष्यातला पहिला योग . म्हणूनच "स्वर आले दुरुनी , जुळ्या सगल्या त्या आठवणी" हे अगदी त्या प्रसंगाला अनुसरून गाणं जन्माला आलं.
रवींद्र साठे नानासाहेबांबद्दल( ते देवकाकांना नानासाहेब म्हणत) म्हणाले ,"नानासाहेबांकडे गेलं की तुम्ही त्यांना काहीही विचारा, ते तुमचं ऐकून तुम्हांला मदत, मार्गदर्शन करणार. आता ते नाहीत, तर कोणाकडे जायचं हा प्रश्न आहे"
रंजना जोगळेकर देवकाकांबद्दल बोलताना म्हणाल्या , गायकांना ते कसे योग्य मार्गदर्शन द्यायचे. त्या काळात रंजना ताईंचा आवाज काहीतरी वेगळाच झालेला, गाणी छान होत नव्हती.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत गेला. तेव्हाच देवकाकांनी त्यांना फोन करुन , तुझ्यासाठी एक गाणं लिहिलयं असं म्हणून बोलावून घेतलं. रंजन ताई तिकडे गेल्या आणि चक्क रडायला लागल्या, त्यांनी त्यांची समस्या सांगितली. देव काकांनी त्यांना एक गाणं लिहून दिलं आणि त्याचा रोज सराव करायला सांगितलं.त्याच बरोबर त्यांनी मी तुझ्यासाठी एक गाणं करुन ठेवणार आहे याबद्दल आश्वासन दिलं. देवकाकांना नंतर एक प्रोजेक्ट मिळालं होतं- १२ महिन्यांसाठी बारा गाणी बनवायची असं.त्यासंबद्धी त्यांनी प्रवीण दवणेंना एक गाणं लिहायला सांगितलं. काका म्हणले, "तू माघ महिन्यासाठी गाणं लिही" त्यावरून "माघाची थंडी माघाची" हे अगदी ठसकेबाज गाणं निर्माण झालं जे रंजना ताईंनीच गायलंय.
देव काकांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचली,लिहिली. युगुल गीतं , विडंबन,समस्वरी, बोलगीतं असं अनेक प्रकार. देवकाका ओशो रजनीश यांचे भक्त. ओशोंच्या शिकवण्यांवर त्यांनी हिंदी गाणीसुद्धा रचली.ते म्हणायचे- प्रेक्षकाला संगीताचा स्वर ताल हे व्याकरण कळत नसतं. मात्र भाव नक्की कळतो. अशी भाव पोचवणारी सुरेल बोलगीतं त्यांनी रचली. त्यातलाच एक बोलगीत म्हणजे - "सांग कसं जगायचं, कढत कढत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवायचं..." किती सुरेख गाणं आहे हे." देवकाकांची काही मस्त विडंबन गीतं या कार्यक्रमात होती . त्यातलं एक विवाहित पुरुषाने म्हटलेले गीत अणि त्याला दिलेले बायकोने उत्तर ही दोन्ही इतके सुरेख होती की बस क्या बात हैं अस वाटयाला लागलं. " जवा हैं मोहोब्बत हसीना हैं जमाना" या गाण्याच्या चालीवर एक लाजवाब समस्वारी गीत सादर झालं जयमाला 'once more' मिळालं.
बाकी कार्यक्रम अगदी उत्तमच झाला . दादर सांस्कृतिक मंचाचे त्याबद्दल आभार. उत्तरा मोनेंनी कार्यक्रमाचं सुरॆख निवेदन केलं. कार्यक्रम अगदी वेळेत सुरु झाला.स्टेज वर गायकांच्या मधोमध एक माईक आणि त्यासमोर देवकाकांची आवडती पेटी होती. जणू काय ते आपल्यातच आहेत. कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी "जीवनात ही घडी अशीच राहूदे " असं वाटत होतं.
-धनश्री जोगळेकर (शिरोडकर)
https://dsaidso.blogspot.com