Sunday, October 29, 2017

खाऊ, कापी आणि आठवणी



"सारस्वत लोकं खाण्यासाठी जगतात" खूप वर्षांपूर्वी एका समारंभात ऐकलं होतं. मी माहेरची सारस्वत आहे आणि माझ्याबाबतीत तरी हे वाक्य १००% खरं आहे. मला खाण्याची प्रचंड आवड आहे, त्यात सर्वात आवडता स्वयंपाक म्हणजे अस्सल सारस्वती पद्धतीचा स्वयंपाक. अर्थात मला ब्राह्मणी पदार्थ सुद्धा आवडतात, करायला आणि खायला सुद्धा. खाण्याची आवड, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं असा नव्हे. याचा अर्थ म्हणजे माझ्यासाठीतरी चविष्ट खाणं असा आहे. मीटिंग होती म्हणून खायचं विसरले असं माझ्याकडून होणारच नाही. उलट मीटिंग लांबेल या भीतीनेच मी आधीच खाऊन घेते.
अगदी लहानपणापासून आई, आत्या, आजीकडून खाण्याचे मस्त लाड पुरवले गेले.चपाती भाजी भात आमटी कडी तर असायचीच त्याशिवाय कधीतरी जे तोंडी लावण्यासाठी अन्य प्रकार केले जायचे त्यातला एक प्रकार म्हणजे कापी. माझी आत्या अगदी उत्कृष्ट कापी बनवते, दर आठवड्याला ती आमच्यासाठी बनवायची. आमच्याकडे जास्तीकरून बटाट्याचे कापी व्हायचे , पण वांग्याचे , केळ्याचे , सुरणाचे सुद्धा काप केले जातात.
कापी हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. बटाटे उभे चिरून, धुऊन मीठ लावून ठेवायचे. थोड्या वेळाने लाल तिखट लावून घ्यायचं. आणि मग ते काप तांदळाच्या पिठात भिजवून पॅनवर shallow fry करायचे. बटाटे शिजले की मस्त कापी तय्यार.माझ्या लेकीलासुद्धा कापी खूप आवडतात. आज तिच्यासाठी वरण भात आणि कापी केल्या. तिने " मस्त झालंय" असं सांगितलं. लेकींकडून प्रेमाने कौतुकाची थाप मिळाली. अगदी मस्त वाटतंय.
- धनश्री 

Sunday, October 22, 2017

ढोबळ आत्मविश्वास

२००० साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रियांका चोप्रा त्यावर्षीची मिस वर्ल्ड ठरली. मिस वर्ल्ड या स्पर्धेत तिला जो प्रश्न विचारला गेला होता त्याचं खरंतर तिने चुकीचं उत्तर दिलं होतं. असा प्रश्न विचारण्यात आला होता "तुम्हाला सर्वात आवडणारी हयात स्त्री कोण?" त्यावर तिचं उत्तर होतं मदर तेरेसा.तिने ते उत्तर अतिशय आत्मविश्वासाने दिलं म्हणून तिला मिस वर्ल्ड ठरवण्यात आलं.यावरून काय बोध घ्यावा हेच मला कळत नव्हतं. ही स्पर्धा झाली तेव्हा खरंतर मी शाळेत होते. तेव्हाही वाटायचं आणि आत्ताही वाटतं नुसता आत्मविश्वास आहे म्हणून चुकीचं उत्तर बक्षिशास पात्र ठरतं का? अशा उत्तरांना बक्षीस दिल्याने आपण जनतेला काय सांगतो - नुसता आत्मविश्वास महत्वाचा , माहिती चुकीची असली तरी चालेल?सामाजिक जीवनात अनेक लोक भेटतात जे काही न करतासुद्धा आपण किती केलं हे आत्मविश्वासाने सांगू शकतात. ती एक वेगळी कलाच आहे. माझ्या शैक्षणिक जीवनातला एक अनुभव सांगते- मी IIM बंगलोर मधून MBA केलं. तिथे मात्र एक जाणवलं - तिकडच्या प्रोफेसर्स समोर तुम्ही काही तयारी/ अभ्यास न करता काहीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तर तुम्ही तिकडच्या तिकडे पकडले जाता.त्या प्रोफेसर्सना सर्वसाधारण सगळ्याच विषयांची माहिती असते.
आत्मविश्वासाला बुद्धीची किव्वा कर्तृत्वाची साथ हवीच, नाही का? तुम्हाला काय वाटतं?
-धनश्री

Monday, October 16, 2017

"आबा" टिपरे

दादरच्या शारदाश्रम सोसायटीच्या "G "विंग मधल्या दुसऱ्या माळ्यावर माझी आत्या राहायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तिच्याकडे राहायला जायचे. तिथे तिचा पुतण्या म्हणजे देवदत्त दादा तेव्हा काहीतरी कॉम्पुटर काम करून बिझनेस करायचा. ही साधारण १९९८-२००० ची गोष्ट.त्याकाळी आजच्या सारखे घरोघरी कॉम्प्युटर नव्हते. त्यामुळे कॉम्प्युटर वर देवदत्त दादा काय करतो ही उत्सुकता होती. तेव्हा कळलं की तो काहीतरी वेबसाईट, ऍनिमेशन असं काम करतो. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कळली तर ती अशी की तो दिलीप प्रभावळकर यांची वेबसाईट डिझाईन करतो. तेव्हा सुरुवातीला दिलीप प्रभावळकर कोण हे माहित नव्हतं. नंतर कळलं  दिलीप प्रभावळकर म्हणजे हसवा फसवी या नाटकात विविध भूमिका करणारे नट. दिलीप काका तेव्हा शारदाश्रम सोसायटीतच राहायचे. आणि ते माझ्या आत्याच्यासमोरच्या विंग मध्ये पहिल्या माळ्यावर राहायचे.त्यामुळे तिथे राहायला गेलं की तिच्या गॅलरीत उभं राहून दिलीप काका दिसतील का असं आम्हाला वाटायचं. ते दिसतील या आशेपायी मी कितीतरी वेळ गॅलेरीत उभी राहायचे. पण ते काही कधी दिसले नाहीत. देवदत्त दादाला सांगून त्यांना भेटायला जाणं तेव्हा थोडं odd वाटत होता. गेले तरी बोलणार काय असा प्रश्न पडायचा.
नंतर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली.त्या मालिकेपासून मी दिलीप काकांची जणू काही फॅनच झाले. ते आता माझे आबा होते. २००१ साली मला माझे सक्खे आजोबा नव्हते. फक्त आमच्या शेजारचे आबा होते. त्यामुळे टिपरे आबांमध्ये मी माझे आबा शोधात होते. प्रत्येक टिपरेचा एपिसोड बघताना मला माझे आबा दिसत होते. मी श्रीयुत गंगाधर टिपरे अजूनही YouTube वर बघते. टिपरे घरातलं हलकं- फुलकं कौटुंबिक वातावरण बघायला खूप मजा येते. तर असं एकदा ऑफिसमधून आल्यावर मी YouTube वर टिपरे बघत होते. मी शक्यतो माझी लेक बरोबर असताना YouTube वगैरे काही बघत नाही. कारण ती बघायचा हट्ट करते आणि सारखी गाणी लावायला सांगते. त्यादिवशी मात्र खूप दमायला झालं होतं आणि काहीतरी छान बघावंसं वाटत होतं. त्यामुळे मी टिपरे लावलं.लेकीला सांगितलं आबांना बघतेय. माझी लेक चक्क आवडीने टिपरे बघू लागली.१८ व्या एपिसोड मध्ये एक सीन होता ज्यामध्ये आबा मध्यरात्री उठतात . ते बघून माझी लेक म्हणाली " आबा डोकं टेका, आबा डोकं टेका" . ती टिपरे मालिकेशी  relate करू शकत होती. मग मला म्हणाली " आबा कुठे राहतात, आबांकडे जाऊया का?" मी तिला म्हणाले वैशाली मावशीच्या ( माझ्या आत्या ची मुलगी ) समोर राहतात. तेव्हा ती म्हणाली "वैशाली मावशीकडे जाऊया का ? आबांना फोन करूया का?"  मला या गोष्टीचं फार नवल आणि कौतुक वाटलं .१५ वर्षांपूर्वी मी जेव्हा १५ वर्षांची होते तेव्हा आबा मला जितके आपलेसे वाटत होते तेवढेच आज ते माझ्या अडीच वर्षाच्या लेकीला वाटले. Aaba is timeless .टिपरे या मालिकेला आणि आबांना माझा सलाम 🙏
-धनश्री

Friday, October 13, 2017

रोज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

७ मे २०१५ या दिवशी माझ्या लेकीचा सकाळी ९:३० च्या सुमारास जन्म झाला. साधारण १०:१५ च्या दरम्याने माझ्या डॉक्टरने दूध द्यायला तिला माझ्या जवळ आणले. तेव्हा माझी डॉक्टर जे वाक्य बोलली ते माझ्या अजून लक्षात आहे. ती म्हणाली" You have to feed your baby after every 2 hrs. And you have to sleep when she sleeps. You have to wake up when she wakes up" हे वाक्य ऐकून मला जरा टेन्शन आलं, आपल्याला बाळाप्रमाणे कसं झोपायला जमणार? झोप मला अति प्रिय. याचा अर्थ मी सकाळी उशिरा उठते असं नाही. मला कॉलेजमध्ये असताना सकाळी ५ ला उठून अभ्यास करण्याची सवय होती. पण म्हणून मी रात्री १० ला झोपायचे. वर्षानुवर्ष मला साधारण १० वाजता झोपण्याची सवय. लेक जेव्हा जन्माला आली तेव्हा रात्री दर दोन तासांनी ती दुधासाठी उठायची. मग तिला दूध पाजून झोपायचे. आता मात्र गेले काही महिने चित्र बदललयं. माझी लेक बऱ्याचंदा रात्री १२- ०१ च्या मध्ये झोपते. आज १२ ला जरा पडल्यावर मला म्हणाली, "आई लाडू दे, भूक लागलीय" . चक्क तिला मध्यरात्री लाडू भरवला आणि झोप झोप करत काही मिनिटांपूर्वी झोपवलं. मी IIM मध्ये असताना सुद्धा कधी जागरण केलं नव्हतं पण आता मात्र आईच्या भूमिकेत जणू काही जागरण रोजचंच झालंय.आणि जणू काही वर्क शक्ती मला या जागरणाचे बळ देतेय, दुसऱ्यादिवशी परत ५:३०-६ ला उठण्याचं

Tuesday, October 10, 2017

मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ

हृतिक रोशनच्या लक्ष्य चित्रपटातील हे गाणं " मै ऐसा क्यूँ हूँ " या गाण्याचा समारोप " मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ " याने होतो. आपण जसे आहोत तसे आहोत, ते जाहीरपणे कबुल करण्यात काहीच कमीपणा नाही. 
एकदा आमच्या सोसायटीत एका मुलीचा दुसऱ्या मुलीच्या पायावर चुकून पाय पडला. जिच्यावर पाय पडला तिने विचारलं " आंधळी आहेस का ? ". ती पहिली मुलगी " हो, मी आंधळी आहे" असं म्हणाली. हे खरंतर थोडंसं खूप straightforward वाटू शकेल. प्रत्येक वेळी असं उत्तर देणं बरोबर असेल असंही नाही. पण हे उत्तर आपला ठामपणा दर्शवण्यात खूप मदत करतं.
सोशल मीडियाच्या आणि फेसबुकच्या युगात आपल्याला " conforming to crowd mentality" याचं खूप दडपण येऊ शकतं. उदा. तुमचे मित्र लग्नाच्या वाढदिवसाला फिरायला गेले आणि तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला अगदी आपण हे काय करतोय असं वाटू शकतं.तुम्हाला जाण्याची गरजही वाटत नसेल पण केवळ लोक काय म्हणतील/ विचारतील याने तुम्ही त्रस्त होत असाल. त्यावरून कोणी तुम्हाला विचारलं " हे असं का करता, तुम्ही असे आहात का? " तर बऱ्याचदा आपण स्पष्टीकरण द्यायला जातो. म्हणजे जर कोणी विचारलं " काय हे, ट्रेन ने काय जातोस , एवढे पैसे कमावतोस ना. " तर अशा वेळी ट्रेन ने जाण्याचं स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी " मी गरीब आहे " असं म्हटलं तर प्रश्नच मिटला.कोणी आपल्याला गरीब म्हटल्याने आपण थोडीच गरीब होतो?
माझी लेक मला असे बरेच अनुभव देते आजकाल. मी तिला जेव्हा सांगते "अगं असं करू नकोस, लोक हसतील " , तेव्हा ती मला " लोक हसू दे " असं उत्तर देते.
मी तिला जेव्हा सांगते "तू वेडी आहेस का, वेडी मुलं असं करतात " , तेव्हा ती मला "मी वेडी आहे " असं उत्तर देते. मला जे अजून जमत नाही ते ती करून दाखवते.
त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारलं की "तू अमुक तमुक आहेस का " , तर हो " मी अमुक तमुक आहे" असं म्हणूंन बघा. चर्चा तिकडेच संपेल. कोडगेपणा असणारे तर हे नेहेमीच करतात. तुमच्यात कोडगेपणा नसेल तर योग्य वेळी हे उत्तर देता आलं पाहिजे. " मै ऐसा क्यूँ हूँ" ला "मै ऐसा ऐसा ऐसा ही हूँ" हे उत्तर देऊन बघा!
- धनश्री

Sunday, October 8, 2017

फोन कधी करावा? - लेक माझी शिक्षक

माझ्या नवऱ्याने लेकीला सकाळी ८:३० च्या सुमारास फोन केला. तेव्हा ती नुक्ती आळस देऊन उठत होती. तिने माझ्या नवऱ्याला सांगितलं "बाबा, मी ब्रश लावते, तोंड धुते मग तुला फोन करते. " आणि असं झाल्यावर तिने फोन ठेवला. 
काय मस्त उत्तर होतं ते. 
कधी कधी आपल्याला कधीच फोन न करणारे लोक मुद्दामून कामाच्या वेळेला फोन करतात. बरं केला म्हणून काहीच हरकत नाही कारण फोन तर झटपट संवादासाठीच असतो. पण फोन केल्यावर ह्यांचे काहीतरी नसते प्रश्न किव्वा सल्ले असतात. मग अशा लोकांना कसं थांबवायचं आणि नाही म्हणायचं याला मला तरी संकोच वाटायचा . कधी थेटपणे उत्तर देता आलं नाही. पण आज हे मी माझ्या लेकीकडून शिकले. सरळ सांगायचं कामात आहे म्हणून:) 
- धनश्री

Saturday, October 7, 2017

वक्तशीरपणा-आजचाअनुभव

आज uberPool बुक केली. माझा पहिला pickup होता. मी ऑफिसच्या खालीच थांबले होते त्यामुळे कॅब आल्यावर मी लगेच बसले. मग दुसरा pickup आला. तो समोरच्या ऑफिसमधला होता. त्या ऑफिसच्या गेटच्या आतमध्ये जाण्याची परवानगी गार्ड देत नव्हता. याचं कारण माझ्याकडे त्या ऑफिसचा पास नव्हता.तरीही तो दुसऱ्या pickup चा मनुष्य ड्रायव्हरशी वाद घालत होता गेटच्या आतमध्ये येण्याच्या मुद्द्यावरून. आणि हे सगळं होऊन सुद्धा तो मनुष्य वेळेवर खाली उतरला नव्हता. मग मी ड्रायव्हरला विचारलं " कितना टाइम लगा रहा हैं , समझ नाही आता क्या उसको शेअर कॅब किया हैं? " त्यावर मला ड्रायव्हर म्हणाला "पागल का कोई जवाब होता हैं क्या?" किती खरं होतं ते, मुर्खांच्या तोंडाशी लागून काय उपयोग?. मग तो ड्रायव्हर म्हणाला " ड्रायव्हर मतलब घर का नौकर समझ राखा हैं. कुछ भी बोलते हैं" हे सगळं होता- होता २० मिनिटं उलटली. अजून तो मनुष्य आला नाही. मग शेवटी मी ड्रायव्हर ला विचारलं की बुकिंग कॅन्सल नाही होणार का? तर त्याने प्रयत्न केला आणि शेवटी कॅन्सल केलं बुकिंग. हे सगळं करता- करता त्या माणसामुळे आमची २५ मिनिटं फुकट गेली.
वक्तशीरपणा खरं तर आपल्याला शाळेपासून शिकवला जातो. आम्हाला शाळेत असताना value education या विषयात Punctuality ( वक्तशीरपणा) ही एक value म्हणून शिकवली जायची. त्यात त्याचं महत्त्व समजावलं जायचं आणि आम्हाला त्याविषयावर माहिती आणायला सांगितली जायची.
जर कोणाला भेटायचं असेल, तर आजी म्हणायची लवकर पोच , उगीचच तुझ्यामुळे त्याला उशीर नको. त्यामुळे आपल्या वेळेइतकंच दुसऱ्याच्या वेळेला महत्त्व असतं हे आम्ही शिकलो.
आता एका सुशिक्षित नोकरदार माणसाला जर वेळेचं महत्त्व नसेल, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग समजायचा?

-धनश्री

Friday, October 6, 2017

बोलण्यातली आणि वागण्यातली यू-टूर्न - आजचाअनुभव

माझा बऱ्यापैकी बोलका स्वभाव आहे. म्हणजे मी जरा ओळख झाली की भरपूर गप्पा मारू शकते. त्यामुळे ट्रेन मध्ये वगैरे माझ्या मस्त मैत्रिणी होतात. आता इथे जोपर्यंत शिक्षण, नोकरी सांगण्याचा प्रश्न येत नाही तोपर्यंत मी त्याबद्दल सांगण्याच्या फंदात पडत नाही. 
एकदा मी असच ट्रेन मध्ये गप्पा मारत होते. मग माझी ती ट्रेन मधली मैत्रीण खूप मोठेपणा मारून बोलत होती , "मी MBA केलं आहे , मी अमुक एक branded गोष्टीच वापरते , अमुक एक हॉटेलमध्येच जाते , नेहेमीच flight ने जाते . "
आता तिला काय सांगू की मी IIM मधून MBA केलंय, आणि आई एअर इंडियात नोकरी करत असल्यामुळे लहानपणापासून सातत्याने विमान प्रवास करत आलेय. तर असो. तिच्या मोठ्या गप्पा ऐकून खूप कंटाळा आला, तेव्हा मी तिला माझ्याबद्दल सांगितलं.तिचा सुरच बदलला आणि चेहरा तर बघण्यासारखा होता.
असे अनुभव मला बऱ्याचदा येतात. परिस्थिती बघून लोकांचं बोलणं आणि वागणं अगदी ३६० डिग्री यू- टूर्न घेतं. माणसाचं खरं रूप बघायचं असेल तर आपण अगदी low-profile असावं. आपल्याकडे काहीही नसताना आपल्याला मदत करणारे हेच आपले खरे हितचिंतक. बाकीचे सगळे आपल्या चांगल्या परिस्थितीचे मित्र, आपले नव्हे. आणि हा फरक आपल्याला जितका लवकर समजेल तितकं बरं.
-धनश्री

Wednesday, October 4, 2017

"बॅग भरशील का?" - आजचाअनुभव

" अगं माझी बॅग भरशील का?" रमेश त्याच्या बायकोला म्हणाला. 
रमेश हा आमचा शेजारी. स्वतःची प्रवासाची बॅग दुसरा कसा भरू शकतो हा मला प्रश्न पडला. 
"अगं मला बॅग भरता येत नाही गं" रमेश म्हणाला. या वाक्यावर मला हसू का रडू हेच कळत नव्हते.
बॅग भरणं म्हणजे नक्की काय? आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी- कपडे, ब्रश , इतर toiletries,औषध असतील तर काही त्या बॅगेत भरणं. एखाद्या शाळकरी मुलाला हे नाही जमणार कदाचित , पण नोकरी करणाऱ्या माणसाला ते न जमणं म्हणजे अगदी कीव करण्यासारखी गोष्ट.
आजूबाजूला बघितल्यावर लक्षात आलं कि वर्षानुवर्ष प्रवास करत असलेली लोकंसुद्धा स्वतःची बॅग स्वतः भरतातच असं नाही. प्रवासातून खूप काही शिकायला मिळतं, exposure मिळतं असं ही लोकं म्हणतात .पण तरीही बॅग भरायला येत का नाही , का ते शिकण्यासाठी क्लास लावावा लागतो तोसुद्धा प्रवास करून?
-धनश्री

Sunday, October 1, 2017

प्रेमाचा उत्साह- आजचाअनुभव

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक लोक काहिनाकाहीतरी शिकवून जातात. म्हणजे अगदी एखादा सफाईकामगार किती चोखपणे आपलं सफाई काम करतो हे बघण्यासारखं असतं. लोकांचं चांगलं बघून काहीतरी शिकणं ही एक वृत्ती आहे. रोजच्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप काही शिकवून जातात, अनुभव देऊन जातात. अनुभवासारखा शिक्षक नाही. त्यामुळे मी आजपासून जसं जमेल तसं मला काहीतरी बोध देणारे अनुभव शेयर करणार आहे. 
आजचा अनुभव:
परवा मावशीकडे गेले होते. माझी मावशी नुकतीच कॅन्सरमधून बरी होते आहे. गेल्या रविवारी तिचं अगदी असहाय्य अंग दुखत होतं. म्हणजे रात्र-रात्र झोप न लागून तिला प्रचंड अंगदुखीमुळे 2-3 दिवस उठता पण येत नव्हतं . आम्ही खूप घाबरलो होतो. पण नंतर तिचं औषध बदललं आणि २-३ दिवसांनी ती जरा बरी झाली. जेव्हा मी तिच्याकडे परवा गेले तेव्हा सुद्धा तिला थोडा अंगदुखीचा त्रास होताच. तरीही तिने मला चक्क चहा करून दिला , घरी जे सुकं खाणं होतं ते सुद्धा दिलं. केवळ प्रेमापोटी तिने मला चहा करून दिला. तोसुद्धा अगदी लगेच.मी तिला म्हणाले मी करते तर ती म्हणाली नको आत्ताच ऑफिसमधून आली आहेस, मी करते. आपण आजारी असताना सुद्धा उठून माझी विचारपूस आणि चहापान करणं हे मोठंच . या प्रेमाच्या उत्साहाला माझा सलाम!

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...