महाराष्ट्राबाहेर गेल्यावर आपल्या मराठी पदार्थांचं खरं महत्त्व कळतं. मी जेव्हा पहिल्यांदा बंगलोरला शिक्षणानिम्मत गेले, तेव्हा मराठी खाण्याची आठवण येऊ लागली. तेव्हा बंगलोरला आमच्या जवळ असणारं हॉटेल म्हणजे " पेशवा". आम्ही "पेशवा" मधून महाराष्ट्र मंडळ कार्यक्रमासाठी जेवण मागवायचो.पण पेशवा सारखं हॉटेल बंगलोरमध्ये एखादंच. आता पेशवा बंद होऊन , दुसरं एक पूर्णब्रह्म म्हणून पारंपरिक महाराष्ट्रयीन पदार्थांचं हॉटेल सुरु झालंय.
त्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हा बाहेरगावी जाण्याची पाळी आली तेव्हा जाणवलं- दक्षिण भारतात पंजाबी रेस्टॉरंट्स खूप सापडतील पण एखादं महाराष्ट्रीय रेस्टॉरंट सापडणं कठीण; उत्तर भारतात दक्षिण भारतीय पदार्थ मिळतील, पण महाराष्ट्रीयन पदार्थ मिळणं दुर्मिळच. "इथे सगळं मिळतं - नॉर्थ इंडियन, इटालियन पण आपले मराठी पदार्थ का नाही मिळत? कोणी इथे मराठी रेस्टॉरंट का नाही सुरु करत? " असं मला नेहेमी वाटायचं.
सचिन कुंडलकर यांनी गुलाबजाम या चित्रपटात माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांची हीच ईच्छा पडद्यावर व्यक्त केली. आदित्य हा लंडन मध्ये नोकरीत अगदी well - settled म्हणावा असा मुलगा .लंडन मध्ये एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरु करायचं या इच्छेने तो पुण्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाक शिकायला येतो. तिथे त्याची भेट राधा आगरकर नावाच्या एक डबे पाठवणाऱ्या बाईशी होते. तिच्याकडून तो स्वयंपाक कसा शिकतो आणि त्याची लंडन मध्ये मराठी रेस्टॉरंट सुरु करण्याची इच्छा कशी पूर्ण करतो ही "गुलाबजाम" या चित्रपटाची कथा.
स्वयंपाक ही एक कला आहे. स्वयंपाक अगदी मन लावून केला तर चांगला होतोच असं या चित्रपटात दर्शवलं आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाक हे या सिनेमाचं केंद्रस्थान आहे. पदार्थांची मांडणी आणि त्यांचं वैविध्य वाखाणण्याजोगं आहे. बऱ्याचदा चित्रपटात foreign location शूटिंग मुळे त्या location मध्ये पर्यटन वाढतं. गुलाबजाम मध्ये असं काहीच नाही. अन्न हेच पूर्णब्रह्म हा या सिनेमाचं विषय. या चित्रपटामुळे जर स्वयंपाक करण्यात रस वाढला तर हे या सिनेमाचं यश असेल. तसचं स्वयंपाक करणं हे बिनडोकपणाचं किंवा कमीपणाचं काम हा विचार बदलण्यात मदत झाली तर तेसुद्धा या सिनेमाचं यश असेल.आणि सर्वात महत्त्वाचं , चित्रपटातल्या आदित्यने जसा मराठी पदार्थांसाठी लंडनमध्ये गुलाबजामकॅफे सुरु केला, तसच वेगवेगळ्या शहरात साबुदाणा वडा कॅफे, मोदक कॅफे सुरु झाले तर अगदी मस्तच होईल. सचिन कुंडलकर यांनी आपल्या मराठी खाद्यपदार्थांना केंद्रस्थान बनवून हा चित्रपट बनवला आहे ज्यातून बरंच काही विचार करण्यासारखं आहे. आपणच जर आपली खाद्यसंस्कृती नाही जपली तर ती लोप पावत जाईल. कोणीतरी एक आदित्य हवाच ती जोपासण्याचा आणि दूरदेशी पोहोचवण्याचा ध्यास असणारा.
-धनश्री
#gulabjaam #गुलाबजाम #sachinkundalkar #marathifoodfilm #foodfilm
No comments:
Post a Comment