Thursday, August 31, 2017

रिमझिम पाऊस पडे सारखा

जसा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला ,तसाच अमेरिकेतील Houston मध्ये hurricance Harvey ने धुमाकूळ घातला. मुंबईत मुंबईकरांनी बहुतांश वेळा एकमेकांना मदतच केली. Houston मध्ये मात्र रात्री होणारी लुटालूट थांबवण्यासाठी curfew पुकारावा लागला. तर या पावसावर आणि या परस्पर विरोधी मानवी वृत्तीवर ही कविता. "रिमझिम पाऊस पडे सारखा " या मराठी गाण्याच्या चालीवर आणि शब्दांवर आधारित ही माझी कविता.
रिमझिम पाऊस पडे सारखा
Houston लाही पूर चढे
पाणीचपाणी चहूकडे
ग बाई गेले ऊन कुणीकडे
घरे बुडली , वाहतुक थांबली
Harvey ला सगळी माणसं घाबरली
लुटालुट करायला माणसं सरसावली
दचकून माझा ऊर उडे
ग बाई गेली माणुसकी कुणीकडे
ट्रॅफिक मध्ये माणसं अडकली
कधी पोचू घरी प्रश्नात पडली
साधी माणसं मदतीला आली
Mumbai Spirit यालाच म्हणे
ग बाई मला मुंबईकरांवर भरवसा आहे गडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
मुंबईलाही पूर चढे
पाणीचपाणी चहूकडे
ग बाई माणुसकी आहे मुंबईकडे
RJ मलिष्काला सांगावसं वाटतं " मुंबई ला मुंबईकरांवर भरोसा हाय"
-धनश्री
My earlier post on Mumbai Rains is here: https://dsaidso.blogspot.in/2017/07/blog-post_26.html

Monday, August 28, 2017

वैचारिक दारिद्य

आपल्याला आपण केलेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागणं यासारखी दुसरी असुरक्षितता नाही. आम्ही असं करतो म्हणून असं होतं, हे सारखं सारखं का सांगावं लागतं? स्वतःलाच आपण जे करतो ते जेव्हा चुकीचं वाटतं तेव्हा ते कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी कारणं दिली जातात. मग आजीने सांगितलेले बोल आठवतात "अगो मुर्खांच्या तोंडी लागू नये". या वाक्याचा पदोपदी अनुभव येतो. मूर्ख माणसाला बोलायला फक्त तोंड लागतं, डोकं लागत नाही. मुळात डोकं वापरायचंच  नसतं. काही दिवसांपूर्वी रेणुका खोत या मराठी ब्लॉगरचा एक लेख वाचला.
त्यात तिने  "वैचारिक दारिद्य रेषेखाली " हा शब्द  वापरला. आता कुठेही बोलण्याच्याआधी किव्वा तोंडाची वाफ घालवण्याआधी मी हा विचार करते. त्या माणसाची वैचारिक जडण घडण कशी असेल. जेव्हा वैचारिक दारिद्र्य जाणवतं तेव्हा मी बोलतचं नाही.
--धनश्री

Saturday, August 26, 2017

गणपती बाप्पा मोरया

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. गणपतीचा तो माझा पहिला अनुभव आणि त्यामुळे बरंच काही आठवतं गणपती म्हटलं की. त्याबद्दल काही!

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. तो शिरोडकरांचा गणपती. अंधेरी माझे सर्वात मोठे चुलत काका राहतात. त्यांचा वय वर्ष ९४, माझ्या बाबांपेक्षा ते जवळजवळ ३० वर्षांनी मोठे. त्यांना दोन मुली, एकीच्या घरीच गणपती असतो. त्यामुळे त्या गणपतीची बरीचशी तयारी माझी आई ,बाबा ,काकी आणि आत्या करतात. मलाही जितकं जमणार नाही इतकी चोख तयारी असते. सगळा स्वयंपाक, अगदी मोदकासकट घरी बनवला जातो. जेवायला दुसऱ्या दिवशी, म्हणजे कंदमुळाच्या दिवशी तर कंदमूळ खाण्यासाठी अजून लोक जेवायला असतात.माझ्या आईचा वय ६०च्या पुढे आहे आणि आत्यांची वयं तर ७२-८८ या गटातली. तरीही जेव्हा मी त्यांचा एवढा पूजेची तय्यारी, स्वयंपाक करण्याबद्दलचा वर्षानुवर्षांचा उत्साह बघते तेव्हा नुसतं थक्क व्हायला होतं.एक छोटीशी कविता त्याबद्दल :

गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
आठवणी दाटून आलेल्या
सांगते थोड्या तुम्हाला

गावचो दीड दिवसाचो गणपती
पहिल्यांदा मुंबैक आणलो
गोरेगावक अण्णा आजोबांकडे तो बसयलो

किती तो स्वयंपाक किती ती तय्यारी
सारस्वत जेवणासाठीच जगतात ही खात्री होते पुरी
पहिल्या दिवशी असतात पाच भाज्या आणि मोदक
सगळे मिळून स्वयंपाकाला लागतात पटपट
दुसऱ्या दिवशी मोठा टोप भरून कंदमूळ
वड्यासकट खाताना येते मजा भरपूर

आरतीला शेजारीपाजारी येतात
संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी करतात
आत्याला भारी उत्साह असतो
वय ७५च्या पुढे असून लाडू चिवडा घरीच बनतो

भावंडांच्या गप्पा रंगतात,एकमेकांबरोबरची नाती अजून घट्ट होतात
गणपती च्या निमित्ताने सगळे एकत्र येतात

तूच कर्ता तूच करविता,
गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
गणपती बाप्पा मोरया

-धनश्री
#ganapatibappamoraya #marathikavita #marathipost

Wednesday, August 23, 2017

दे धक्का- ठेव दुसऱ्यावर ठपका !

माझी मोठी आत्या म्युनिसिपालिटी शाळेत प्राथमिक शिक्षिका होती. मुलांना अगदी जीव ओतून शिकवायची. त्यांच्यासाठी वेगवेगळे तक्ते बनवायची. शाळेत येणारी मुलं साध्या परिस्थितीची होती. घरी त्यांना सांगणारे शिकवणारे पालक नव्हते.
आत्याला बाकीच्या काही शिक्षिका सांगायच्या "अहो बाई एवढं कशाला शिकवता , या मुलांना काही समजत नाही" आत्याने मात्र आपलं काम चालू ठेवलं.  तरीही त्या दुसऱ्या शिक्षिका बोलतच होत्या, "एवढं कशाला करता?" आत्याने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून मुलांना पूर्ण मेहनत घेऊन शिकवलं.मुलांमध्ये चांगली प्रगती झाली आणि त्यांना परीक्षेत चांगले मार्क पडू लागले. आत्याने चांगलं शिकवलं आणि मुलांमध्ये प्रगती दिसली तर आपल्यालाही शिकवावं लागेल, काम करावं लागेल, या भीतीने दुसऱ्या शिक्षिका आत्याला परावृत्त करत होत्या. कर्तव्यनिष्ठ असल्यामुळे आत्या रोज आपले कर्तव्य करत होती. तिला यश आलंच.
रोजच्या जीवनात पण आपण असे प्रसंग अनुभवतो.एखाद्याबद्दलचं एक मत पुढे करायचं आणि आपल्या स्वार्थासाठी मुद्दामून आपल्याला हव्या तशा मताचा propaganda करायचा .
दुसऱ्यावर ठपका ठेऊन कामं न करणं अगदी सोपं असतं. काही पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा नसतो. त्यात काय बरोबर चूक आहे असं ठरवणारी मी कोणीच नाही. पण अशावेळी आमची मुलं काही ऐकतच नाही आमचं, अभ्यासचं करत नाही असं म्हटलं की झालं. मग पोराला ट्युशन लावायची. ट्युशनला घालू नये असं मी म्हणत नाही. पण आपल्याला अभ्यास घ्यायचा नाही हे सांगा ना, पोरावर ठपका कशाला?
या आणि अशा अनेक प्रकाराने impression management केली जाते. म्हणजे आपण नामा निराळं राहायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचे.

टीप:लेखात काही उदाहरणं दिली आहेत. सगळेच लोक असेच असतात, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हाच असतो वगैरे असं काही नाही. Impression Management ची ही फक्त काही उदाहरणं आहेत.तुमचे असे काय अनुभव आहेत? comments मध्ये कळवा.

पुढल्या लेखात याविषयीची काही psychology theory याबद्दल लिहीन.

-धनश्री
#impressionmanagement #marathipost

Friday, August 18, 2017

कोडगेपणा

🙂


कोडगेपणा- या शब्दाचा समानार्थी शब्द मला सांगता येणार नाही. पण थोडक्यात काहीही फरक न पडणे, मनाला लाऊन न घेणे हा कोडगेपणा. निर्लज्जम  सदा सुखी त्याप्रमाणे.   आपल्या आजूबाजूला तो सर्रास दिसतो. म्हणजे आता हे बघा ना , एखाद्या माणसाला त्याला दिलेलं काम करायचं नसेल, तर तो काही केल्या ते करणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, ओरडा, पण तो ते काम करणार नाही. याउलट कामं करणं किती मूर्खपणाचं आहे ते तो तुम्हाला सांगेल.  म्हणजे आपण जरी चुकलो तरी आपण किती शहाणे आणि दुसरे किती मूर्ख हे सिद्ध करायचं. मला नेहमी वाटायचं की काही लोकांना असं निर्लज्जपणे वागायला कसचं काही वाटत नाही? तेव्हा मला लक्षात आला की एक तर तत्वाने वागायचं , काम करायचं नाहीतर निर्लज्ज व्हायचं. निर्लज्जपणा बाळगला की मार्ग सोपा असतो, कामं करायला नको. स्वाभिमानाने जगणं कठीण. एक तर स्वाभिमान बाळगून तत्त्वाने जगायचं नाहीतर निर्लज्ज बनून सगळं गुंडाळून ठेवायचं.

काही लोक स्वतःच्या मुलाला अगदी नुसतं वरण भाताचं  जेवण घालतील. पण कोणी दुसऱ्याने तसचं केलं तर किती आळशी आहे, नुसता वरण भात करते अशी नावं ठेवतील.  तुम्ही जर व्यवस्थित साग्रसंगीत जेवण देत असाल तर मुलाला किती लाडावून ठेवलयं अशी नावही ठेवतील.  थोडक्यात काय, आम्ही करतो ते शहाणपणाचं, दुसरे मूर्ख. दुसऱ्यांना मूर्ख किव्वा अकार्यक्षम ठरवून स्वतःला शहाणं ठरवता येत नाही. असं करणं म्हणजे स्वतःला स्वतःबद्दलच्या असलेल्या असुरक्षिततेची जाहीर कबुली. शेवटी आपण एकमेकांना शहाणे आणि मूर्ख ठरवणारे कोण? आपल्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर विश्वास असणारी माणसं असं कधी करणारचं नाही.

शेवटी काय, आपण काहीही करून आपली बाजू बरोबर सिद्ध करण्याचा कोडग्या माणसाचा अट्टाहास.

--धनश्री

Wednesday, August 16, 2017

लेकी बरोबर गप्पा

लेकी बरोबरचे काही मजेशीर प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
प्रश्न: बाबा काय करतो गं?
लेकीचं उत्तर: ऑफिसमध्ये जातो, काम करतो, gems आणतो, बॉडी लोशन आणतो, कँडी आणतो
प्रश्न: आई काय करते गं?
लेकीचं उत्तर: ऑफिसमध्ये जाते, काम करते, केक आणते, लाडू आणते
प्रश्न : बाबाला काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: gems
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: कँडी
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर: चॉकलेट
प्रश्न: अजून काय आणायला सांगू?
लेकीचं उत्तर:( थोडसं चिडून) बस्स अजून काही नकोय!
लहान मुलांचं काय मस्त असतं नाही, आपल्याला काय हवं ते किती पक्कं आहे स्वराच्या मनात.
बाकी काही असो वा नसो, आम्ही chocolate आणि gems आणण्यासाठी नोकरी करतो ही गोड जाणीव आम्हाला स्वरा करून देते!
-धनश्री

Monday, August 14, 2017

नाद निनाद / Sound of music मराठीत

काल "नाद निनाद" हे मराठी संगीत नाटक बघितलं. इंग्रजीमधील प्रसिद्ध "Sound of music" ह्या चित्रपटाचं ते मराठीत रूपांतर. बंगलोरमधला त्यांचा पहिला आणि एकमेव मराठी प्रयोग. याआधी कोकणीत "Sound of Music" चे काही प्रयोग झाले होते. तसं मी नाटक सिनेमा काही फार बघत नाही. वेळ असेल, जमलं तर बघते. नाद निनादची मात्र गोष्टच निराळी होती. त्यामध्ये माझी मैत्रीण राधिका जोशी मारियाच्या भूमिकेत, म्हणजेच मुख्य भूमिकेत होती. राधिका माझी IIMB मधली मैत्रीण, आणि हॉस्टेलमधली शेजारी. IIMB मधून अर्थशास्त्रात Ph .D करत असतानासुद्धा राधिका नित्यनेमाने गाण्याचा रियाज करायची. किशोरी अमोणकरांच्या जयपूर अत्रौली घराण्याची ती गायिका. जेव्हा राधिकाने नाटकाबद्दल कळवलं, तेव्हापासूनच जाण्याची इच्छा होती. योगायोगाने मी तेव्हा बंगलोरमध्येच होते.त्यामुळे "नाद निनाद " बघायला गेले.
नाटकाच्या कथेतील मुख्य पात्र मारिया. मारिया ही ऑस्ट्रिया मध्ये राहणारी एक मुलगी. नन बनण्यासाठी ती कॉन्व्हेंट मध्ये येते. मारियाला गाण्याची आणि निसर्गाची खूप आवड. कॉन्वेंटमधल्या मदरना मारिया खूप वेगळी वाटते. ती मारियाला एका कर्नलच्या घरी गव्हर्नेस म्हणून पाठवते. कर्नलच्या सात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मारिया वर असते. कर्नलची पत्नी वारल्यामुळे ते मुलांसाठी गव्हर्नेस ठेवतात. त्यांच्याकडे आदल्या गव्हर्नेस टिकू शकल्या नाहीत. एका महिन्यातच निघून गेल्या. मारिया मात्र टिकते आणि सगळ्यांची मनं जिंकते.
संगीत नाटक असल्यामुळे नाद निनाद सुमधुर गाण्यांनी सजलं होतं. "Sound of music" मधील इंग्रजी गाण्यांच्या चालीवरच मराठीत अनुवाद करून ही गाणी घेतली होती. काही इंग्लिश lyrics ही होते.राधिकाच्या सुमधुर आवाजांनी सजलेली गाणी अगदी "Once more" म्हणण्यासारखी होती. सगळ्या कलाकारांचा अभिनय अगदी झकास होता. मुख्यत्वे सात मुलांचा अभिनय अगदी वाखाणण्याजोगा होता. या पहिल्या प्रयोगाची इतकी सफाईदार तयारी होती की तो पहिला प्रयोग आहे असं सांगितलं तर खोटं वाटेल. कलाकारांची वेशभूषा साजेशी होती.
एकूणच नाद निनाद परत परत दाद देण्यासारखा होता. "नाद निनाद" या नाटकाचे अजून प्रयोग मराठीत व्हावेत हीच सादिच्छा!
-धनश्री

Friday, August 11, 2017

Ice Cream love

I totally love ice creams, especially sundaes! Ice creams are just yummilicious. Writing a short poem dedicated to my love of ice creams - accompanied by some ice cream pics I took!

Ice Cream , Dear Ice Cream,
What exactly are you,
Ice or cream or a sundae simply new
Be it a birthday or an anniversary, dessert are thou'
Leaving everyone with a feeling of wow

Vanilla or strawberry or a flavour you choose
 Yummilicious it will be, do trust my views
Make it a sundae with whipped cream and toppings
Eat it quickly without it dropping

In Happiness or sadness you lift our spirits
Eating Ice Cream certainly has merits
Be it a cup, cone or a sundae
Ice cream makes my day a happy day!

-Dhanashree

Wednesday, August 9, 2017

पुरी ओ पुरी



आज पुऱ्या केल्या. पुऱ्या करताना त्या मस्त छान फुगाव्या असं वाटतं. तर आता पुरी बनवण्यावर एक कविता.

पुरी ओ पुरी, तू फुगशील का बरी
तेल तापलं नसेल तर करशील काय बिचारी
छोट्याशा कढईत तेल तापत ठेवते
त्यात छोटासा कणकेचा गोळा घालते
गोळा वर आला की तेल तापलं म्हणते
पहिली पुरी त्यात तळायला घेते
झटकन पुरी फुगायला लागते
खाणाऱ्यांची रांग लगेच लागते
"मला मोठी पुरी" ठकू सांगते
दिलेली पुरी लगेच संपवते
पुरी ओ पुरी, तू फुगशील का बरी
बरं झालं बाई तू फुगलीस हा बरी
नाहीतर माझी तारांबळ उडाली असती भारी
-धनश्री

Monday, August 7, 2017

संगीत संस्कार

माझा १९८०च्या दशकातील जन्म. मी इंटरनेटच्या आधीचं आयुष्य अनुभवलंय, आमच्याकडे तर फोन सुद्धा मी ७ वर्षांची असताना आला होता.त्याआधी अगदी दादरला आजीला फोन करायचा असेल तर आम्ही PCO मध्ये जाऊन फोन करत होतो. मला वाटतं की २०००च्या नंतरच्या पिढीला तर PCO म्हणजे काय हेच सांगावं लागेल.असो. मी लहान असताना गाणी ऐकायची असतील तर प्रामुख्यानं दोन साधनं होती- रेडिओ आणि टेप रेकॉर्डर. टी. व्ही. वर पण गाणी लागायची पण ती ठराविक वेळी. चित्रहार, छायागीत नंतर डी.डी. मेट्रो आल्यावर सुपरहिट मुकाबला हे गाण्याचे प्रसिद्ध आणि प्रेक्षकांचे लाडके कार्यक्रम. रेडिओवर प्रामुख्याने विविध भारती ऐकलं जायचं. टेप रेकॉर्डरवर आपल्याला हवी ती कॅसेट लावून गाणी ऐकता येत असायची. माझ्या आईला गाण्यांची खूप आवड, आणि त्यातही जुन्या गाण्यांची, भावगीतांची जास्त आवड. माझी आई गाण्यांची यादी बनवून दादरच्या एका दुकानात देत असे. मग ते लोक ती गाणी एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून देत असत. याचा फायदा असा होता, की तुम्हाला एका चित्रपटातलं एकच गाणं हवं असेल तर पूर्ण कॅसेट विकत न घेता, वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी एका कॅसेटमध्ये मिळायची.शनिवार- रविवार आमच्याकडे टेप रेकॉर्डरवर गाणी चालू असायची. आपल्याला हवं ते गाणं एका "click " ने मिळण्याइतकं सोपं नव्हतं. त्यामुळे एकदा कॅसेट सुरु झाली की ती संपेपर्यंत ऐकायची. 
असं असल्यामुळे नकळतच मला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकण्याची सवय लागली. हे गाणं असं का, संगीतकार कोण, त्या गाण्याची पार्श्वभूमी काय हे घरी चालू असलेल्या चर्चेमुळे कळायचं. रिमझिम पाऊस पडे सारखा, तुझ्या गळा माझ्या गळा, मधुबन में राधिका, राधा ना बोले ना बोले ना बोले रे अशी अनेक गाणी आमच्याकडे कॅसेट मध्ये होती. आताची मुलं जसा chu-chu TV वरची गाणी लावण्याचा आग्रह धरतात तसं त्याकाळी शक्यच नव्हतं. जे गाणं चालू आहे ते ऐकायचं. लहानपणी ऐकलेलं जास्त लक्षात राहतं आणि अजूनही आठवतं.
आता मात्र काळ खूप बदललाय. आपल्याला हवं ते गाणं आपल्याला एका mouse click ने मिळतं.आपण तसं करत असल्यामुळे मुलांनाही ते कळतं, हवं ते गाणं लावणं किती सोपं आहे ते. त्यामुळे मुलंही त्यांना आवडीचं गाणं लावण्याचा आग्रह धरतात. असं असताना वेगवेगळा संगीताचा अनुभव ते कसा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्यापरीने मी माझ्या लेकीला हल्ली रोज रात्री झोपताना एक जुनं मराठी गाणं ऐकवते. ती तेव्हा म्हणते "हे नकोय" , पण तरीही मी ते गाणं चालू ठेवते. जुनी गाणी ऐकून त्याची आवड निर्माण व्हावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपला सांगीतिक इतिहास माहित असावा असं मला जरूर वाटतं. कुठल्याही पुस्तकातून तो समजू शकतोच पण त्या शिक्षणाची सुरुवात जर लहानपणीच्या अनुभवातून, संस्कारातून झाली तर बरं नाही का?
--धनश्री

Friday, August 4, 2017

पवाईमार्गे जाताना...

सध्या माहेरी आहे . माझी आई मालाडला राहते आणि माझी नोकरी ऐरोलीला आहे. आमची ऑफिसची बस पवईमार्गे ऐरोलीला जाते. माझी सर्वात पहिली नोकरी पवईला होती. तेव्हासुद्धा आमची बस याचमार्गाने जायची. पवई म्हटलं की त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात.पहिल्या नोकरीचं महत्त्व काही वेगळंच असतं. मी तिकडे तीन वर्ष काम केलं. MBA साठी प्रवेश मिळाल्यावर नोकरी सोडली. नोमुराने मला अनेक गोष्टी दिल्या. माझा तो पहिला "corporate " अनुभव होता. एका प्रख्यात investment bank मध्ये काम कसं चालतं ते कळलं. वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले. सहकाऱ्यांशी छान मैत्री झाली. काही मित्र-मैत्रिणींशी तर अजून संपर्कात आहे. नोकरीमुळे जो आर्थिक धनलाभ झाला त्याने माझं MBA शिक्षण होण्यात खूप मदत झाली. मला कर्ज घ्यावा लागला नाही.नोमुराचं कॅन्टीन तर अगदी सुरेखचं होतं. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आणि वैविध्यपूर्ण खाणं. त्याचा मेनू आदल्या आठवड्यातच ठरलेला असायचा आणि तो आम्हाला आमच्या इंट्रानेट वर मिळायचा. नोमुरा मध्ये प्रत्येक गोष्टीला एक शिस्त होती. तीन वर्षात एकदाही आमची ऑफिसची बस कधी ५ मिनिटंसुद्धा उशिरा आली नाही .कुठल्याही वेळेत काही बदल होणार असेल तर तो आधीच कळवला जायचा.
पवईला जाऊन मस्त खाऊया, ते दिवस परत जगूया असं खूपदा वाटत होतं. पण कामाच्या व्यापात ते काही जमलं नाही. त्यामुळे आज जेव्हा पवाईमार्गे ऑफिसला जात होते तेव्हा त्या पूर्ण प्रवासात जणू काही मी ते दिवस जगत होते.पवईलेक अजूनच सुंदर वाटत होता. नुसतं त्या दृश्याकडे बघून डोळ्यात कायमचं टिपून ठेवावं असं वाटत होतं. काही फोटोही काढले मग.एखाद्या जागेशी आपल्या किती आठवणी जडलेल्या असतात नाही? मग ती नोकरीची जागा असली तरीसुद्धा.
--धनश्री


Wednesday, August 2, 2017

सी ए टी CAT , CAT माने बिल्ली!



CAT(Common Admission Test)  ही परीक्षा IIM MBA प्रवेशासाठी द्यावी लागते. मला MBA केलं तर IIM मधूनच करायचं होतं. MBA साठी नुसती CAT देऊन भागत नाही. त्यानंतर इंटरव्ह्यू असतोच. तो यशस्वीपणे पार  पडला तरच IIM  मध्ये प्रवेश मिळतो. तसं नाही झालं तर परत पुढच्यावर्षी CAT द्यावी लागते आणि प्रवेशमिळेपर्यंत हे चक्र चालूच राहतं.या चक्रावरील ही कविता.

मांजरीच्या मागे लागलीस आहेस का ?
वेडी तू झाली आहेस का?
वेडीबिडी काही झाली नाही हो
MBA च्या मागे धावते आहे हो

सी ए टी CAT , CAT माने बिल्ली
MBA प्रवेशाची ही आहे किल्ली
आर ए टी RAT , RAT माने चूहा
Percentile च्या RatRace मध्ये फसले बुआ

दर नोव्हेंबरला येते न चुकता
देवाला साकडं घालते बाहेर पाड यातून एकदा
किती ती तयारी, किती ते Mock Paper
काहीही करून मला CAT मध्ये पास कर
CAT देऊन होताच Interview ची तयारी
निकाल काही लागो, पुढची तयारी करते कुमारी

जानेवारी महिन्यात निकाल लागतो
Percentile च्या बळावर Interview Call येतो
Interview साठी पुन्हा ती तयारी
सगळे Interview झाल्यावर हुश्श:!! म्हणते बिचारी

निकाल लागेपर्यंत मनासारखं जगूया
काही नाही झालं तर पुन्हा CAT देऊया

निकाल चांगला लागताच, कुमारी पेढे वाटते
MBA च्या तयारीला लगेच लागते
निकाल खराब लागता, कुमारी हताश होते
वेड्यासारखी परत  मांजरीच्या मागे धावू लागते

सी ए टी CAT , CAT माने बिल्ली
MBA प्रवेशाची ही आहे किल्ली

--धनश्री
#marathipost #marathikavita

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...