Monday, August 14, 2017

नाद निनाद / Sound of music मराठीत

काल "नाद निनाद" हे मराठी संगीत नाटक बघितलं. इंग्रजीमधील प्रसिद्ध "Sound of music" ह्या चित्रपटाचं ते मराठीत रूपांतर. बंगलोरमधला त्यांचा पहिला आणि एकमेव मराठी प्रयोग. याआधी कोकणीत "Sound of Music" चे काही प्रयोग झाले होते. तसं मी नाटक सिनेमा काही फार बघत नाही. वेळ असेल, जमलं तर बघते. नाद निनादची मात्र गोष्टच निराळी होती. त्यामध्ये माझी मैत्रीण राधिका जोशी मारियाच्या भूमिकेत, म्हणजेच मुख्य भूमिकेत होती. राधिका माझी IIMB मधली मैत्रीण, आणि हॉस्टेलमधली शेजारी. IIMB मधून अर्थशास्त्रात Ph .D करत असतानासुद्धा राधिका नित्यनेमाने गाण्याचा रियाज करायची. किशोरी अमोणकरांच्या जयपूर अत्रौली घराण्याची ती गायिका. जेव्हा राधिकाने नाटकाबद्दल कळवलं, तेव्हापासूनच जाण्याची इच्छा होती. योगायोगाने मी तेव्हा बंगलोरमध्येच होते.त्यामुळे "नाद निनाद " बघायला गेले.
नाटकाच्या कथेतील मुख्य पात्र मारिया. मारिया ही ऑस्ट्रिया मध्ये राहणारी एक मुलगी. नन बनण्यासाठी ती कॉन्व्हेंट मध्ये येते. मारियाला गाण्याची आणि निसर्गाची खूप आवड. कॉन्वेंटमधल्या मदरना मारिया खूप वेगळी वाटते. ती मारियाला एका कर्नलच्या घरी गव्हर्नेस म्हणून पाठवते. कर्नलच्या सात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मारिया वर असते. कर्नलची पत्नी वारल्यामुळे ते मुलांसाठी गव्हर्नेस ठेवतात. त्यांच्याकडे आदल्या गव्हर्नेस टिकू शकल्या नाहीत. एका महिन्यातच निघून गेल्या. मारिया मात्र टिकते आणि सगळ्यांची मनं जिंकते.
संगीत नाटक असल्यामुळे नाद निनाद सुमधुर गाण्यांनी सजलं होतं. "Sound of music" मधील इंग्रजी गाण्यांच्या चालीवरच मराठीत अनुवाद करून ही गाणी घेतली होती. काही इंग्लिश lyrics ही होते.राधिकाच्या सुमधुर आवाजांनी सजलेली गाणी अगदी "Once more" म्हणण्यासारखी होती. सगळ्या कलाकारांचा अभिनय अगदी झकास होता. मुख्यत्वे सात मुलांचा अभिनय अगदी वाखाणण्याजोगा होता. या पहिल्या प्रयोगाची इतकी सफाईदार तयारी होती की तो पहिला प्रयोग आहे असं सांगितलं तर खोटं वाटेल. कलाकारांची वेशभूषा साजेशी होती.
एकूणच नाद निनाद परत परत दाद देण्यासारखा होता. "नाद निनाद" या नाटकाचे अजून प्रयोग मराठीत व्हावेत हीच सादिच्छा!
-धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...