Friday, August 18, 2017

कोडगेपणा

🙂


कोडगेपणा- या शब्दाचा समानार्थी शब्द मला सांगता येणार नाही. पण थोडक्यात काहीही फरक न पडणे, मनाला लाऊन न घेणे हा कोडगेपणा. निर्लज्जम  सदा सुखी त्याप्रमाणे.   आपल्या आजूबाजूला तो सर्रास दिसतो. म्हणजे आता हे बघा ना , एखाद्या माणसाला त्याला दिलेलं काम करायचं नसेल, तर तो काही केल्या ते करणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, ओरडा, पण तो ते काम करणार नाही. याउलट कामं करणं किती मूर्खपणाचं आहे ते तो तुम्हाला सांगेल.  म्हणजे आपण जरी चुकलो तरी आपण किती शहाणे आणि दुसरे किती मूर्ख हे सिद्ध करायचं. मला नेहमी वाटायचं की काही लोकांना असं निर्लज्जपणे वागायला कसचं काही वाटत नाही? तेव्हा मला लक्षात आला की एक तर तत्वाने वागायचं , काम करायचं नाहीतर निर्लज्ज व्हायचं. निर्लज्जपणा बाळगला की मार्ग सोपा असतो, कामं करायला नको. स्वाभिमानाने जगणं कठीण. एक तर स्वाभिमान बाळगून तत्त्वाने जगायचं नाहीतर निर्लज्ज बनून सगळं गुंडाळून ठेवायचं.

काही लोक स्वतःच्या मुलाला अगदी नुसतं वरण भाताचं  जेवण घालतील. पण कोणी दुसऱ्याने तसचं केलं तर किती आळशी आहे, नुसता वरण भात करते अशी नावं ठेवतील.  तुम्ही जर व्यवस्थित साग्रसंगीत जेवण देत असाल तर मुलाला किती लाडावून ठेवलयं अशी नावही ठेवतील.  थोडक्यात काय, आम्ही करतो ते शहाणपणाचं, दुसरे मूर्ख. दुसऱ्यांना मूर्ख किव्वा अकार्यक्षम ठरवून स्वतःला शहाणं ठरवता येत नाही. असं करणं म्हणजे स्वतःला स्वतःबद्दलच्या असलेल्या असुरक्षिततेची जाहीर कबुली. शेवटी आपण एकमेकांना शहाणे आणि मूर्ख ठरवणारे कोण? आपल्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर विश्वास असणारी माणसं असं कधी करणारचं नाही.

शेवटी काय, आपण काहीही करून आपली बाजू बरोबर सिद्ध करण्याचा कोडग्या माणसाचा अट्टाहास.

--धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...