Saturday, August 26, 2017

गणपती बाप्पा मोरया

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. गणपतीचा तो माझा पहिला अनुभव आणि त्यामुळे बरंच काही आठवतं गणपती म्हटलं की. त्याबद्दल काही!

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. तो शिरोडकरांचा गणपती. अंधेरी माझे सर्वात मोठे चुलत काका राहतात. त्यांचा वय वर्ष ९४, माझ्या बाबांपेक्षा ते जवळजवळ ३० वर्षांनी मोठे. त्यांना दोन मुली, एकीच्या घरीच गणपती असतो. त्यामुळे त्या गणपतीची बरीचशी तयारी माझी आई ,बाबा ,काकी आणि आत्या करतात. मलाही जितकं जमणार नाही इतकी चोख तयारी असते. सगळा स्वयंपाक, अगदी मोदकासकट घरी बनवला जातो. जेवायला दुसऱ्या दिवशी, म्हणजे कंदमुळाच्या दिवशी तर कंदमूळ खाण्यासाठी अजून लोक जेवायला असतात.माझ्या आईचा वय ६०च्या पुढे आहे आणि आत्यांची वयं तर ७२-८८ या गटातली. तरीही जेव्हा मी त्यांचा एवढा पूजेची तय्यारी, स्वयंपाक करण्याबद्दलचा वर्षानुवर्षांचा उत्साह बघते तेव्हा नुसतं थक्क व्हायला होतं.एक छोटीशी कविता त्याबद्दल :

गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
आठवणी दाटून आलेल्या
सांगते थोड्या तुम्हाला

गावचो दीड दिवसाचो गणपती
पहिल्यांदा मुंबैक आणलो
गोरेगावक अण्णा आजोबांकडे तो बसयलो

किती तो स्वयंपाक किती ती तय्यारी
सारस्वत जेवणासाठीच जगतात ही खात्री होते पुरी
पहिल्या दिवशी असतात पाच भाज्या आणि मोदक
सगळे मिळून स्वयंपाकाला लागतात पटपट
दुसऱ्या दिवशी मोठा टोप भरून कंदमूळ
वड्यासकट खाताना येते मजा भरपूर

आरतीला शेजारीपाजारी येतात
संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी करतात
आत्याला भारी उत्साह असतो
वय ७५च्या पुढे असून लाडू चिवडा घरीच बनतो

भावंडांच्या गप्पा रंगतात,एकमेकांबरोबरची नाती अजून घट्ट होतात
गणपती च्या निमित्ताने सगळे एकत्र येतात

तूच कर्ता तूच करविता,
गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
गणपती बाप्पा मोरया

-धनश्री
#ganapatibappamoraya #marathikavita #marathipost

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...