माझा १९८०च्या दशकातील जन्म. मी इंटरनेटच्या आधीचं आयुष्य अनुभवलंय, आमच्याकडे तर फोन सुद्धा मी ७ वर्षांची असताना आला होता.त्याआधी अगदी दादरला आजीला फोन करायचा असेल तर आम्ही PCO मध्ये जाऊन फोन करत होतो. मला वाटतं की २०००च्या नंतरच्या पिढीला तर PCO म्हणजे काय हेच सांगावं लागेल.असो. मी लहान असताना गाणी ऐकायची असतील तर प्रामुख्यानं दोन साधनं होती- रेडिओ आणि टेप रेकॉर्डर. टी. व्ही. वर पण गाणी लागायची पण ती ठराविक वेळी. चित्रहार, छायागीत नंतर डी.डी. मेट्रो आल्यावर सुपरहिट मुकाबला हे गाण्याचे प्रसिद्ध आणि प्रेक्षकांचे लाडके कार्यक्रम. रेडिओवर प्रामुख्याने विविध भारती ऐकलं जायचं. टेप रेकॉर्डरवर आपल्याला हवी ती कॅसेट लावून गाणी ऐकता येत असायची. माझ्या आईला गाण्यांची खूप आवड, आणि त्यातही जुन्या गाण्यांची, भावगीतांची जास्त आवड. माझी आई गाण्यांची यादी बनवून दादरच्या एका दुकानात देत असे. मग ते लोक ती गाणी एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून देत असत. याचा फायदा असा होता, की तुम्हाला एका चित्रपटातलं एकच गाणं हवं असेल तर पूर्ण कॅसेट विकत न घेता, वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी एका कॅसेटमध्ये मिळायची.शनिवार- रविवार आमच्याकडे टेप रेकॉर्डरवर गाणी चालू असायची. आपल्याला हवं ते गाणं एका "click " ने मिळण्याइतकं सोपं नव्हतं. त्यामुळे एकदा कॅसेट सुरु झाली की ती संपेपर्यंत ऐकायची.
असं असल्यामुळे नकळतच मला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकण्याची सवय लागली. हे गाणं असं का, संगीतकार कोण, त्या गाण्याची पार्श्वभूमी काय हे घरी चालू असलेल्या चर्चेमुळे कळायचं. रिमझिम पाऊस पडे सारखा, तुझ्या गळा माझ्या गळा, मधुबन में राधिका, राधा ना बोले ना बोले ना बोले रे अशी अनेक गाणी आमच्याकडे कॅसेट मध्ये होती. आताची मुलं जसा chu-chu TV वरची गाणी लावण्याचा आग्रह धरतात तसं त्याकाळी शक्यच नव्हतं. जे गाणं चालू आहे ते ऐकायचं. लहानपणी ऐकलेलं जास्त लक्षात राहतं आणि अजूनही आठवतं.
आता मात्र काळ खूप बदललाय. आपल्याला हवं ते गाणं आपल्याला एका mouse click ने मिळतं.आपण तसं करत असल्यामुळे मुलांनाही ते कळतं, हवं ते गाणं लावणं किती सोपं आहे ते. त्यामुळे मुलंही त्यांना आवडीचं गाणं लावण्याचा आग्रह धरतात. असं असताना वेगवेगळा संगीताचा अनुभव ते कसा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्यापरीने मी माझ्या लेकीला हल्ली रोज रात्री झोपताना एक जुनं मराठी गाणं ऐकवते. ती तेव्हा म्हणते "हे नकोय" , पण तरीही मी ते गाणं चालू ठेवते. जुनी गाणी ऐकून त्याची आवड निर्माण व्हावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपला सांगीतिक इतिहास माहित असावा असं मला जरूर वाटतं. कुठल्याही पुस्तकातून तो समजू शकतोच पण त्या शिक्षणाची सुरुवात जर लहानपणीच्या अनुभवातून, संस्कारातून झाली तर बरं नाही का?
--धनश्री
No comments:
Post a Comment