Monday, September 4, 2017

माधुरी दीक्षित मिली दादर में

माधुरी दीक्षित ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री. म्हणजे all- time favourite म्हणाच ना. मी दोन तीन वर्षांची असताना माधुरी दीक्षितच्या तेजाब मधल्या एक दोन तीन ह्या गाण्यावर अगदी मस्त नाचायचे. आमच्या बाजूचे आबा खास माझ्यासाठी तेजाबची विडिओ कॅसेट आणायचे. त्यावेळी छायागीत, सुपरहिट मुकाबला या गाण्यांच्या कार्यक्रमात चित्रपट गीते बघायला मिळायची. त्यात माधुरीचे नाच लागले की मी अगदी टक लावून बघायचे.
माझी आई एअर इंडियात मॅनेजर होती. त्यावेळी आईने दिल तो पागल हैं या चित्रपटाच्या विमानतळाच्या शूटिंगच्या निमित्ताने माधुरी दीक्षितला बघितलं होतं. त्यावेळी तर मला इतकं वाटत होतं की मी का नव्हते विमानतळावर त्यावेळी. नाहीतर मला माधुरीला भेटता आलं असतं.
माझी आत्या तेव्हा दादरच्या शारदाश्रम सोसायटीत राहायची. तिथे माधुरी दीक्षित चे डॉक्टर राहायचे. मी तेव्हा आत्याला सांगायचे "डॉक्टरांना विचार माधुरी कधी येणार ते. मग मी तुझ्याकडे राहायला येते आणि माधुरीला भेटते. "अर्थात हे काही आत्या कसं विचारणार डॉक्टरांना. नंतर मात्र तिने डॉक्टरांना सांगून माझ्यासाठी एक माधुरी दीक्षित चाautographed फोटो आणला. तो मी वर्षानुवर्ष जपून ठेवला होता. या माझ्या माधुरीच्या वेडाला माझी आजी खूप हसायची.ती म्हणायची " माधुरी म्हणजे काय देव असा गो ? काय करतालय तिका भेटून? "
२००६ सालची गोष्ट. कॉलेज झाल्यावर मी माटुंगा स्टेशन ला चालत चालत जात होते. माटुंगा स्टेशन च्या गणपती मंदिरात मी नमस्कार करत होते. माझा मोबाईल फोन vibrate होताना जाणवला.माझ्या मावशीचा फोन होता " अगं, माधुरी आली आहे हिंदू कॉलनीत , पटकन भेटायला ये".मला माझ्यावर विश्वासच बसेना . अगदी मस्त वाटत होतं. मी लगेच टॅक्सी केली आणि हिंदू कॉलोनीत जायला निघाले. माधुरी दीक्षितची आजे सासू, म्हणजे श्रीराम नेनेंची आजी हिंदू कॉलनीत राहायची. ती माझ्या मावशीला ओळखायची त्यामुळे माधुरी आल्यावर तिने माझ्या मावशीला कळवलं. मी हिंदू कॉलनीत ५ मिनिटात पोचले.तिथे माधुरी दीक्षित, तिचा नवरा आणि दोन मुलं होती. माधुरीला बघून मी अगदी speechless झाले. काय बोलावं हेच कळेना. २ मिनिटं मी नुसती शांत होते. मग नंतर मी फक्त एक वाक्य बोलले "मला तुम्ही खूप आवडता". माधुरी दीक्षित नेहेमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिची मुलं पण फार गोड होती. अजून जास्त काही बोलण्याची हिम्मतच नव्हती. माझी मावशी आजींशी बोलली आणि आम्ही निघालो. मला अगदी आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी फोनवर सर्रास कॅमेरा नव्हते. त्यामुळे माझ्याकडे माधुरीबरोबरचा फोटो नाही आहे. तो फोटो मी माझ्या आठवणीत टिपून ठेवला आहे.
माधुरी दीक्षित च्या भेटी निमित्त गॅम्बलर या चित्रपटातील हे गाणं माझ्या शब्दात -
माधुरी दीक्षित मिली दादर में
टॅक्सी किये हम माटुंगा से
उसने कहा मुझसे hi hello
मै बस सोची क्या बोलू
माधुरी को कहा आप favourite हो
उसने कहा हमसे thank you
-धनश्री
P.S. या माधुरी दीक्षित च्या विषयावर पोस्ट लिहिण्याचं सुचवल्याबद्दल माझ्या बहिणीचे म्हणजेच वैशाली ताईचे आभार.

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...