Sunday, September 24, 2017

काहे दिया परदेस

काहे दिया परदेस ह्या झी मराठी वरील मालिकेचा काल शेवटचा भाग होता. शिव- गौरी ह्यांची ही प्रेमकथा मनाला अगदी भावली. गौरी सावंत अगदी मुंबईच्या मध्यमवर्गीय घरात आणि संस्कारात वाढलेली. शिव कुमार शुक्ल हा बनारस मधून मुंबईत नोकरीसाठी आलेला मुलगा.
मालिकेतली सगळी पात्र अगदी चोख निवडलेली , त्यांचे अभिनय तर अगदी लाजवाब. शिवचं मिश्र हिंदी-मराठी, आजीचं मालवणी मिश्रित मराठी, आईचा(शुभांगी गोखले) प्रेमळ आवाज, बाबांचं थोडं चिडखोर पण प्रेमळ बोलणं हे सगळं आता ऐकायला मिळणार नाही याचं वाईट वाटतं . मुंबईत मध्ये एक 1BHK मध्ये मराठी कुटुंब कसं आनंदाने राहतं याचं प्रतीक म्हणजे काहे दिया परदेस मधील सावंत कुटुंब.
गौरी सावंतांची धाकटी मुलगी, सगळ्यांची लाडकी, आजीची बर्फी. आई( शुभांगी गोखले) थोडी मृदू स्वभावाची पण सगळ्यांना सांभाळून घेणारी. पण कधी कधी तिच्या याच स्वभावाचा फायदा घेतला जायचा. तेव्हा आजीचं तिला समजावणं , कणखरपणे परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ देणं हे बघण्यासारखं . बाबा( मोहन जोशी) आणि आजीची मजेशीर तू-तू, मै -मै, निशाचं कुचकट बोलणं आणि आजीची तिला चोख उत्तरं हे सगळं जणू काही आपल्याच घरी चालू आहे असं वाटायचं.शिवच्या अम्माला असलेला पैशाचा माज, त्याला ना जुमानता सावंत कुटुंबाचं स्वाभिमानी जगणं , शिवच्या बाबूजींची मधली भूमिका अशा वेगवेगळ्या छटा बघताना त्यात आपल्या आजूबाजूचा वास्तव दिसायचा.
मालिकेत घरांची निवड आणि रचना अगदी परिस्थितीला अनुसरून होती.जसं मुंबईतलं एक 1BHK असतं तसं सावंतांचं घर, अगदी प्रत्येक खोलीच्या रचनेत आणि मांडणीत एक सर्वसामान्य पण नीटनेटकं घर याचा प्रत्यय आला. बनारस चा भपका पण अगदी मस्त दाखवला होता. साधेपणा आणि भपका तितकाच वास्तववादी वाटत होता.
काही दिया .. मधले काही किस्से खूप आवडले, काहीतरी शिकवून गेले. गौरीची आजी जेवणाचे डबे करून द्यायची. त्यावर तिला गौरीच्या सासूबाई म्हणतात " आप तो क्या सिर्फ डिब्बे ही बनाती हैं" . त्यावर आजीचं उत्तर ऐकण्यासारखं होतं . आजी म्हणते " हे खरं आहे की मी डबे करते, पण मी माझ्या कष्टाने कमावते, त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे". किती रास्त उत्तर होतं , कुठलही काम छोटं नाही.पैशाने श्रीमंत नसणारं सावंतांचा कुटुंब विचारांनी आणि संस्कारांनी समृद्ध होतं . नोकरी करून आई आजी घर सांभाळत होते. गौरी पण त्याच संस्कारात वाढलेली. जेव्हा गौरीवर नोकरी न करण्याचा दबाव येतो तेव्हा "नोकरी काय फक्त पैशासाठीच नसून आत्मसन्मानासाठी असते" हे तिचं ठाम उत्तर हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचा आत्मविश्वास दर्शवतो.
झी मराठीवरील अनेक छान मालिका होऊन गेल्या. आभाळमाया, अवंतिका, श्रीयुत गंगाधर टिपरे, उंच माझा झोका ..... त्यात मला सर्वात आवडलेली मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे आणि आता काहे दिया परदेस . टिपरे आवडण्याचं कारण त्याचं कथानक अगदी आपला रोजचं घरगुती आणि कलाकार त्याला साजेसे . टिपरेंमध्ये मला आवडलेले कलाकार म्हणजे आबा (दिलीप प्रभावळकर) आणि आई(शुभांगी गोखले). त्याच प्रमाणे काहे दिया परदेस मध्ये सुद्धा मला सर्वात आवडलेले कलाकार म्हणजे आजी, आई(शुभांगी गोखले) आणि शिव . शुभांगी गोखले आईच्या भूमिकेत दोन्ही मालिकेत अगदी नंबर १ होती, जणू काही ती माझीच आई वाटत होती मला. तशीच आजी आभाळमाया नंतर इतक्या वर्षांनी आजी म्हणून काहे दिया परदेस मध्ये दिसली आणि मला माझ्या आजीची आठवण झाली.
लिहिण्यासारखं अजून खूप काही आहे, मध्ये मालिकेत कधी कधी उगीचच कथानक वाढवण्यासाठी timepass होतोय असंही वाटलं . पण ते प्रत्येक मालिकेत होतंच !
तर आत्तापुरतं एवढंच ! काहे दिया परदेस - You will be missed
-धनश्री

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...