Monday, September 11, 2017

क्रेडिट घ्यावं का मिळवावं?

काल वाचाल तर वाचाल हा IBN lokmat चॅनेलवरचा कार्यक्रम बघितला. त्यात भाऊ तोरसेकर आणि सायली राजाध्यक्ष Sayali Rajadhyaksha या मराठी ब्लॉगर्स यांच्याशी चर्चा होती. सायली मावशीचे दोन्ही ब्लॉग्स ( अन्न हेच पूर्णब्रह्म आणि साडी आणि बरचं काही ) मी वाचते त्यामुळे त्यांचा ब्लॉगिंग विषयीचा अनुभव ऐकण्याची इच्छा होतीच.
या चर्चेत त्यांना ब्लॉगिंग ने उत्पन्न(आर्थिक धनलाभ )निर्माण होतं का हा प्रश्न विचारला होता .या प्रश्नाला सायली मावशी आणि भाऊंनी मस्त उत्तरं दिली. भाऊ म्हणाले "मी लिहितो ते माझ्या समाधानासाठी लिहितो. गरजा किमान ठेवल्यामुळे मला काही उत्पन्नाची अपेक्षा नाही. मला सांगितलेल्या १३ नियतकालिका अशा आहेत की ते माझा लेख बेधडकपणे अग्रलेख म्हणून पण छापत असतात.."
सायली मावशी म्हणाली "आपण लिहिलं आहे ते आपण लिहिलेलं आहे ते कायम राहणार आहे म्हणजे ते कुणीही जरी स्वतःच्या नावावर खपवलं, असं झालेलं आहे, होतं खूपदा कि तसेच्या तसे वर्तमानपत्रात पण येतात आणि मला त्याचे काही वाटत नाही.मला असं वाटतं की जितक्या जास्त लोकांपर्यंत ते पोचतं ......आणि एकदा तुमची शैली लोकांना कळायला लागली की ते कळतं लोकांना कुणी लिहिलेलं आहे त्यामुळे मला काही वाटत नाही. वाचक तेवढा चतुर असतो."
किती सत्य होतं त्या उत्तरात. जे आपलं आहे ते आपलं राहरणारच आणि ते कितीही दुसऱ्याने आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपण केले हे सत्य बदलत नाही.
माझ्या घरी पण मला असचं सांगण्यात यायचं.पण ते मला बऱ्याचदा खूप आदर्शवादी वाटायचं .MBA करूनसुद्धा मार्केटिंग मला जमत नाही. स्वतःचंच मार्केटिंग करणं कठीण वाटतं . " स्वतःचीच स्तुती करणार्याक मूर्ख म्हणतात" या आजीच्या संस्कारात मी वाढले आहे. आपण काहीतरी फार मोठं करतो आहोत / केले आहे असं मला काही वाटत नाही. त्यामुळे ते बढवुन चढवून सांगताच येत नाही.बऱ्याचदा असं होतं आपण काम करतो पण त्याचं श्रेय/ क्रेडिट घ्यायला कोणीतरी दुसरं तयार असतं. त्यामुळे मग चिडचिड होते. असं वाटतं की आपण हे सगळे करून काय फायदा. त्यावेळेला मला माझी आई , आत्या नेहेमी सांगायचे, आपण काम अगदी चोख करायला पाहिजे. लोकांना बरोबर कळतं कोण कसं आहे ते. फक्त कोण बोलून दाखवत नाहीत .त्यामुळेच कदाचित शांत बसून काम करणाऱ्याला खूप काम दिलं जातं आणि कितीही बडेजाव मारणारा बिनकामाचा मनुष्य नुसता मोठ्या मोठ्या गप्पाच मारत राहतो.आई म्हणते जरी लोकांना कळलं नाही तरी आपण आपल्या समाधानासाठी आपलं कर्तव्य अगदी चोख करावं.
काहीही काम न करता त्याचं श्रेय मिळवण्याची अपेक्षा बाळगणारे खूप असतात.म्हणजे आपण स्वयंपाक करायचा कोणीतरी दुसऱ्याने पुढेपुढे करून तो वाढायचा. किव्वा आपण सगळी मीटिंगची तयारी करायची पण मीटिंगमध्ये दुसऱ्यानेच ते केल्याचा आभास आणायचा. अशी एक ना अनेक उदाहरणं देतां येतील.
आपल्या कामाचं दुसऱ्याने श्रेय घेणं आधी खूप त्रासदायक वाटायचं. अजूनंही वाटतंच, फक्त आता जाणीवपूर्वकपणे त्याचे त्रास नाही होऊ द्यायचा असं ठरवलंय. त्यामुळे काल जेव्हा सायली मावशींकडून आपल्या घरातल्यासारखेच विचार ऐकले तेव्हा बरं वाटलं.तेव्हा अजूनच पटलं कुणीही कोणाचं क्रेडिट घेऊ शकत नाही. ज्याने जे मिळवलेलं असतं ते त्याचंच असतं, हे एक सत्य आहे.
बाकी चर्चा छानच झाली. पण मला हा एक मुद्दा सर्वात जास्त भावला आणि त्याबद्दल लिहावंसं वाटलं.
-धनश्री

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...