Wednesday, July 26, 2017

नको येऊ रे पावसा

२६ जुलै २००५- एक न विसरण्यासारखी तारीख. मुंबई मान्सूनाने जो काय धुमाकूळ घातला त्याने घरी पोचणं ही एक आव्हानात्मक गोष्ट करून टाकली. मी तेव्हा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होते. व्ही. जे . टी. आय ला जाण्यासाठी मालाड ते माटुंगा सेंट्रल हा माझा रोजचा प्रवास. मालाडवरून ८:०८ ला सुटणारी मालाड लोकल मी पकडायचे. लेक्चर कितीही वाजता असू दे, मी तीच ट्रेन पकडायचे. फार तर फार ही चुकली तर ८:३५ ची मालाड लोकल पकडायचे .
२६ जुलैला मी ८:०८ ची मालाड लोकल पकडली . ती ८:४५ ला दादरला पोचली. त्या दिवशी माझं लेक्चर ११ वाजताच होतं . मग मी कॉलेजला जाण्याच्या ऐवजी माझ्या आजीकडे ( आईची आई) हिंदू कॉलनीत गेले. हिंदू कॉलनी पासून व्ही. जे. टी. आय. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.
११ ला लेक्चर साठी निघाले तेव्हा आजी मालवणीत म्हणाली "अगो सोन्या, संध्याकाळी रवाक ये" (संध्याकाळी राहायला ये या अर्थाने) . मी माझ्या वडलांच्या आईकडेच लहानाची मोठी झाले.आईच्या आईकडे सुट्टीत राहायला जायचो, ३-४ दिवस लागून सुट्टी आली की. खूप दिवसांनी आईच्या आईकडे आले होते म्हणून तिने मला राहण्याचा आग्रह केला. त्यादिवशी आमची लेक्चर ३ वाजताच संपली. मग मी नेहमीप्रमाणे माटुंगा स्टेशन ला जायला निघाले. मी आणि माझी मैत्रीण जान्हवी चालत होतो तेवढ्यातच पावसाच्या धारा पडू लागल्या. माटुंगा स्टेशनला आले तर २० मिनिटं झाली तरी ट्रेन येत नव्हत्या. तोवर पावसाचा जोर वाढला होता. मला मग ट्रेनची वाट बघण्याचा कंटाळा आला आणि मी माझ्या आजीकडे हिंदू कॉलनीत जायला निघाले. माटुंग्यापासून हिंदू काॅलनीत जाईपर्यंत पाऊस इतका वाढला होता की छत्री असूनसुद्धा मी पूर्ण भिजून गेले. त्यादिवशी देवाने मला ट्रेनची वाट न बघता हिंदू कॉलनीत जाण्याची बुद्धी दिली याबद्दल मी अगदी मला नशीबवान समजते.
पावसाचा जोर वाढतच होता. ५ वाजल्यानंतर फोनही लागणं बंद झालं होतं.अधून मधून काही फोन लागत होते. माझ्या आई बाबांना तर ऑफिस मधून निघणंच शक्य नव्हतं. दोघेही तिकडे राहिले आणि दुसऱ्या दिवशी मालाडला गेले. मालाडला माझ्या आजीबरोबर आत्या होती , माझा भाऊसुद्धा घरी शाळेतून लवकर आला होता. आजी आणि भावाबरोबर माझ्या दोन आत्या होत्या त्यामुळे काही काळजी नव्हती. राणी मावशी भगिनी समाज मध्ये होती, आजीच्या घरापासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर. पण पाणी इतकं तुंबलं होतं की तिला येई येई पर्यंत खूप उशीर झाला. आमच्या गल्लीतल्या काकांच्या पायात खिळा रुतला. पाणी तुंबलं होतं , पाय ठेवताना त्यांना खिळा दिसला नाही. डॉक्टर बाजूलाचअसूनसुद्धा त्यांच्याकडे जाऊन टी.टी च इंजेकशन घेणं हेसुद्धा एक दिव्य होतं. माझा एक मामा जो पार्ल्याला राहतो त्याने आजीकडे येण्याचा निर्णय घेतला . सी. एस. टी हून पार्ल्याला पोचू की नाही याची त्याला शाश्वती नव्हती. आम्ही टी . व्ही. वर बातम्या बघत होतो, तेव्हा व्हाट्सअँप वगैरे काही नव्हतं. 
त्यावेळी मी कॉलेज मध्ये होते, माझ्यावर कसलीच जबाबदारी नव्हती. पण आता आई झाल्यावर लक्षात येतं आहे, ज्यांची लहान मुलं तेव्हा पाळणाघरात असतील, ज्यांच्या घरी कोणी वृद्ध व्यक्त्ती एकटी असेल ,त्यांचं काय झालं असेल ते. पावसाचं हे रुद्र रूप परत कधीच येऊ नये ही इच्छा. 
-धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...