Monday, July 17, 2017

परीक्षेची पूर्वतयारी

Dear Dhanashree Joglekar, Congratulations! You passed the May 20, 2017 Financial Risk Manager (FRM®) Exam Part I."असा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागला. अभिनंदन करायला बरेच फोन आले. माझ्या एका बहिणीने विचारलं "काय ग्रेट आहेस तू, स्वरा , ऑफिस आणि परीक्षा सगळं कसं केलंस? " परीक्षा पास होण्यात काय ग्रेट आहे हे मला खरंच कळलं नाही. मी काही डॉक्टरांसारखा कोणाचा जीव वाचवला नाही किंवा बाबा आमटेंसारखं काही समाजकार्य केलं नाही. परीक्षा पास झाल्याचा आनंद होताच , पण परीक्षा आपण आपल्या करिअरसाठी देतोय त्यामुळे त्याच्यात काही फार मोठेपणा वाटला नाही
परीक्षा २० मे ला होती. परीक्षेचा अभ्यास मी मार्च पासून सुरु केला. सकाळी उठल्यावर अभ्यास, मग थोडासा स्वयंपाक आणि मग ऑफिस ला निघायचे. सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री एक तास एवढा वेळ मी सोमवार ते शुक्रवार पर्यंत देत असे . शनिवार- रविवार हे माझे सुट्टीचे दिवस. त्यादिवशी घरची कामं झाल्यावर जास्तीतजास्त वेळ अभ्यासाला द्यायचा असं होतं
तेव्हा ऑफिस ला जायला मी :३० च्या दरम्यानं निघत असे. दादर स्टेशन पर्यंत कार, मग लोकल आणि त्यानंतर मेट्रो असा माझा प्रवास होता. त्यामध्ये लोकलच्या प्रवासामध्ये मी थोडं वाचायचे. सांगण्याचं तात्पर्य असं की आलेल्या क्षणी, जेव्हा मिळेल तेव्हा मी अभ्यास करायचे. घरी गेल्यावर लेकीसोबत भरभरून खेळायचे. माझी मुलगी लहान असल्यामुळे ती बाजूला असताना अभ्यास करणे थोडे अवघड होते. मी तिला सांगितलं की अभ्यास नाही केला तर ऑफिस मध्ये ओरडतात. मग ती नित्यनेमाने मी घरी आल्याआल्या "अभ्यास अभ्यास" करत मला FRM ची पुस्तकं आणि पेन देत असे. माझ्या आईनेही कधी मला अभ्यास अभ्यास कर असं रोज सांगितलेलं आठवत नाही आहे. पण लेकीने ते सांगितलं आणि मी खेळत खेळत अभ्यास केला.
परीक्षा देण्यासाठी कुठलाही सरळ फॉर्म्युला नाही आहे. प्रत्येकाच्या अभ्यास पद्धती प्रमाणे आणि हुशारी प्रमाणे तो बदलतो. मला कित्येक लोकांनी सांगितलं होतं ,आम्ही FRM चा अभ्यास चार दिवसात केला. त्यांनी केलाही असेल . पण मला जास्त वेळ लागतो. शेवटच्याक्षणी खूप गोष्टी ठेवल्या तर मला ताण येतो. त्यामुळे मला त्यांच्यासारखं करणं शक्य नाही .आता तर मुलीची जबाबदारी असल्यामुळे ते अशक्य होतं .
आपल्याला कुठल्याही कार्यात किंवा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर काही खालील मुद्दे लक्षात ठेवा
. आपलं ध्येय काय आहे ते मनात पक्कं करा. ते ध्येय लिहून ठेवा आणि रोज सकाळी उठल्यावर ते वाचा. आपल्याला - ध्येय असतात. कुठलं किती आणि कधी महत्त्वाचं आहे ते बघा. उदा. मला ऑफिस, घर, मुलीचे संगोपन आणि परीक्षा या चार मुख्य गोष्टींकडे लक्ष द्यायचं होतं . त्याप्रमाणे मी माझा रोजचा दिवस आखायचे
. कोणीही काहीही म्हणो , आपलं लक्ष विचलित होऊन देऊ नका. कोणी आपल्याला मूर्ख , गरीब, बावळट , घाबरट म्हटल्याने आपण तसे होत नाही. " काय एवढं काय टेन्शन घेतेस, तू IIM ची आहेस ना?" ; " एवढी परीक्षा IIM करून द्यावी लागते का " असं मला कित्येक लोकांनी विचारलं . आता एकदा परीक्षा द्यायची ठरवली की हे सगळे प्रश्न अर्थशून्य आहेत. ते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे . आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. "noise " कडे दुर्लक्ष करा. "एवढं काय घाबरतोस चल पिक्चर बघायला. आयुष्यभर काय नुसत्या परीक्षा देणार का?" असं म्हणणारे खूप असतात. तुम्ही विचार करा, तुम्हाला खरंच पिक्चर बघायचा आहे का? बघायचा असेल तर तो वेळ नंतर कधीतरी अभ्यास करून भरून काढा. आपण एका वेळेला एकाच गोष्ट करू शकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक वेळी काय करायचा याचा विचार करा. आपल्याकडे कॉम्प्युटर मध्ये कशी मर्यादित मेमरी असते , तशी आपल्या डोक्यातही मर्यादित जागा असते. वेळ पण मर्यादित असतो. त्यामुळे वेळेचा आणि बुद्धीचा 
विचारपूर्वकपणे वापर करा
. आपण आपल्या "plan " प्रमाणे चाललो आहोत की नाही याचा नियमितपणे आढावा घ्या
आता माझ्याबाबतीत लहान मुलगी असल्यामुळे कितीही ठरवलं तरी दिवस आखल्याप्रमाणे जायचा नाही . कधी ती उशिरा झोपायची , कधी काही हट्ट करायची , कधी काहीतरी वेगळा खाऊ मागायचीच , हे सगळं आलंच . कधी ऑफिस मध्ये खूप जास्त काम असायचं. त्यामुळे ही सगळी "variables " आहेत हे लक्षात ठेवून आपला पुढचा दिवस त्याप्रमाणे "adjust " करा.
सर्वात मुख्य म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आपला तन- मन- धन त्यात ओतून द्या. यश येईल की नाही हे माहित नाही, पण आपण पूर्ण मेहनत केल्याचं आणि काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान असेलच. आणि हे ही नसे थोडके!

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...