Monday, July 10, 2017

गोव्याच्या आठवणी ...

सध्या दोन दिवस गोव्यात आहे, ऑफिसच्या offsite निमित्त. मडगावच्या पुढे असणाऱ्या "झुरी रिसॉर्ट" इथे आमची राहण्याची सोय केली आहे .गोव्याला मी लहानपणापासूनच येतेय. गोव्याच्या असंख्य आठवणी आहेत. मी माहेरची सारस्वत आहे, आणि बहुसंख्य सारस्वतांचे कुलदैवत गोव्यातच असतात. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगते गोव्याला कुलदैवत दर्शनासाठी चालले आहे, तेव्हा त्या जणू काही मला मूर्खातच काढतात. गोवा म्हणजे त्यांच्यासाठी फक्त समुद्र आणि चर्च. जसं सगळे साऊथ इंडियन म्हटलं की आपण मद्रासी म्हणतो, तसं गोवा म्हटलं की बहुसंख्य लोकांना फक्त बीच आठवतात. त्यातून ज्यांना कोणाला गोव्याला देव आहे हे माहित असतं, त्यांना वाटतं मी मंगेशीला चालले आहे. मंगेशी हे गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान. बऱ्याचशा सारस्वतांचं ते कुलदैवत. माझ्या माहेरचं कुलदैवत मात्र मुळगाव मधील रवळनाथ महालक्ष्मी कुलस्वामी. मुळगाव म्हणजे मडगाव नव्हे, मुळगाव म्हापस्यावरून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. थिवीम रेल्वे स्थानक सर्वात जवळ आहे मुळगाव पासून. भारतचे माजी विकेटकीपर कै. माधव मंत्री( सुनील गावस्कर चे मामा ) ह्यांचं हेच कुलदैवत.असं म्हणतात की आमच्या देवळाच्या मागे जे झाड आहे त्याची पूजा नाना काकांनी ( माधव मंत्रींना असं म्हणतात) केली सुनील गावस्कर अगदी मोठा क्रिकेटर व्हावा म्हणून. आता झाडाची पूजा करून जर कुणी मोठं झाला असतं तर सगळ्यांनीच केली असती , पण ती त्यांची श्रद्धा होती अजून काही नाही.
गोव्याला येताना आम्ही पहिल्यांदा वेंगुर्ल्याला येऊन गोव्याला यायचो. वेंगुर्ल्याला आमचं घर आहे, तिथे माझी आत्या राहते. वेंगुर्ल्याहून गोव्याला आम्ही एशियाड बस / गाडी करून यायचो. साधारण दोन तासांचं अंतर आहे. एशियाड बसने आलो आणि म्हापस्याला उतरलो की तिकडे उसळ-पाव खाणं अगदी क्रमप्राप्त असायचं. म्हापसा बस स्टॅन्ड कडे काळ्यावाटण्याची उसळ मस्त मिळते.
मग रिक्षा / बस करून मुळगावला देवाकडे यायचो. देवाकडे आलो कि तिकडे ज्या राहण्याच्या खोल्यांची सोय आहे तिकडे रहायचो. खोल्या अगदी साध्या आहेत. पण सगळ्यांना देवाकडे रहायला आवडतं. मनुष्य कितीही श्रीमंत/मोठा असला तरी तो देवाच्या उत्सवाच्या वेळेला तिकडेच त्या सध्या खोल्यात राहतो. तिकडे वातावरण खूप प्रसन्न असतं.
देवाच्या उत्सवाच्या (जत्रा) वेळेला आलं कि खूप लोकांशी भेट होते. मुंबईला अगदी रेल्वे स्टेशनच्या अंतरावर राहणारी लोकं मुंबईत भेटत नाही पण जत्रेला भेटून त्यांच्या खूप गप्पा रंगतात. त्यात माझे बाबा देवस्थानाचा काम बघत असल्यामुळे त्यांना बरीच लोकं ओळखतात. " तू प्रदीपचा चडू मागो ?" अशी माझी ओळख. जत्रेला आलं तर त्याचं जेवण करणारे आचारी वेगळे असतात. मात्र असं कधी अधेमधे गोव्याला देवाकडे आलो तर आमच्या देवस्थानाचे नंदा भटजी यांच्या घरी आम्ही जेवायचो. त्यांचं घर देवळाच्या परिसरातच आहे आणि त्यांची बायको अगदी उत्कृष्ट स्वयंपाक बनवते. देवस्थानाचं काम झाली की आम्ही साखळी दत्त मंदिर , म्हापसा मार्केट, कधी एखादा बीच असा कार्यक्रम करायचो. मग परत रवानगी वेंगुर्ल्याला.

ह्यावेळी मी पहिल्यांदा गोव्याला एकटी - म्हणजे कुटुंबाबरोबर येतां ऑफिस सहकाऱ्यांबरोबर आले आहे. रिसॉर्ट अगदी सुंदर आहे. मागच्या बाजूला वरका ( Varca) बीच आहे. हाॅटेलचं जेवण चवदार आहे. हवामान थोडं गरम आहे, पण आम्ही दुपारी तर बाहेरच पडत नसल्यामुळे तसा काही फार त्रास नाही आहे. समुद्र छान, जास्त गर्दी नसलेला आहे. तरीसुद्धा आज ही माझी पहिली गोवा सहल आहे जेव्हा मी मंदिरात गेले नाही आहे. "तू प्रदीप चा चडू मागो" असं विचारणारं कोणी नाहीय. हॉटेलच्या बुफे मध्ये काळ्यावाटण्याची उसळ नाहीय. दोन दिवस मी मजा केली, वेगवेगळ्या लोकांना भेटले, पण हे गोवा मला आपलं गोवा वाटलं नाही. लहानपणी आजीकडे गेले की ती नेहेमी कैरीचा गोड लोणचं करून ठेवायची आमच्यासाठी. लोणचं नसेल तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं. तसचं काहीतरी.

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...