Saturday, July 29, 2017

दिसते तसे नसते

हल्ली जणू काही "Never say no " चा जमाना आहे. काम करायचं नसेल तर नाही म्हणायचं नाही, पण ते करायचंच नाही. कारणं देऊन पुढे ढकलत राहायचं किंवा इतकं खराब करायचं की परत कोणी करायला सांगू नये. खरं आणि सरळ बोलणारी लोकं हल्ली कोणाला आवडत नाहीत. "चिमटा काढलेला दिसत नाही पण ओरडलेलं दिसतं" त्याचप्रमाणे बोलणाऱ्याचे तोंड दिसते, गोड बोलून काम न करणाऱ्याला लोक भलं समजतात. ह्या कलियुगातल्या सत्यावरील ही एक कविता.
"करणे द्या" शाळेत प्रश्न असायचे
काय उत्तर देऊ त्याला खरे, गोडबोले विचार करायचे
गोडबोले कारणे देण्यात तरबेज असायचे
खरे मात्र उगीचच काहीही कारणे देत नसायचे
आयुष्यातही प्रश्न पडले की गोडबोले
काहीही कारणे द्यायचे
खरे मात्र खरं-खरं काय ते सांगायचे
"खाऊ कर" लेक म्हणाला
"उद्या करेन" म्हणत गोडबोलेंनी आजचा प्रश्न उद्यावर ढकलला
खाऊ कधी बनलेच नाही, लेक खाऊबद्दल विसरला ताई
" मला जमणार नाही" असा खरे म्हणाला
एकदाच काय तो मुलाच्या नजरेत वाईट झाला
"काम लवकर कर" बॉस म्हणाले
"काळजी करू नका तुम्ही, लवकर करेन मी" गोडबोले म्हणाले
काम काही झालेच नाही,
गोड बोलून गोडबोलेंनी दिवस काढले काही
"मला इतका वेळ लागेल" खरे रोखठोक म्हणाले
इतके वेळ का बॉस विचारात पडले
सांगितलेल्या वेळेत खरेंनी काम केले
गोडबोले नुसते दिवस ढकलत राहिले
"Never say No" गोडबोले पाळत राहिले
नेहेमी हो म्हणत राहिले, काम पुढे ढकलत राहिले
शक्य आहे तेवढं काम खरे करत राहिले
गुपचूप बसून सगळे काम उरकत राहिले
गोडबोले सर्व लोकांना आवडले
मदतीच्या वेळी मात्र खरेच उगवले
"दिसते तसे नसते " हे आता प्रत्यक्ष कळले
"दिसते तसे नसते " म्हणूनच जग फसते
"दिसते तसे नसते " म्हणूनच जग फसते

Wednesday, July 26, 2017

नको येऊ रे पावसा

२६ जुलै २००५- एक न विसरण्यासारखी तारीख. मुंबई मान्सूनाने जो काय धुमाकूळ घातला त्याने घरी पोचणं ही एक आव्हानात्मक गोष्ट करून टाकली. मी तेव्हा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होते. व्ही. जे . टी. आय ला जाण्यासाठी मालाड ते माटुंगा सेंट्रल हा माझा रोजचा प्रवास. मालाडवरून ८:०८ ला सुटणारी मालाड लोकल मी पकडायचे. लेक्चर कितीही वाजता असू दे, मी तीच ट्रेन पकडायचे. फार तर फार ही चुकली तर ८:३५ ची मालाड लोकल पकडायचे .
२६ जुलैला मी ८:०८ ची मालाड लोकल पकडली . ती ८:४५ ला दादरला पोचली. त्या दिवशी माझं लेक्चर ११ वाजताच होतं . मग मी कॉलेजला जाण्याच्या ऐवजी माझ्या आजीकडे ( आईची आई) हिंदू कॉलनीत गेले. हिंदू कॉलनी पासून व्ही. जे. टी. आय. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.
११ ला लेक्चर साठी निघाले तेव्हा आजी मालवणीत म्हणाली "अगो सोन्या, संध्याकाळी रवाक ये" (संध्याकाळी राहायला ये या अर्थाने) . मी माझ्या वडलांच्या आईकडेच लहानाची मोठी झाले.आईच्या आईकडे सुट्टीत राहायला जायचो, ३-४ दिवस लागून सुट्टी आली की. खूप दिवसांनी आईच्या आईकडे आले होते म्हणून तिने मला राहण्याचा आग्रह केला. त्यादिवशी आमची लेक्चर ३ वाजताच संपली. मग मी नेहमीप्रमाणे माटुंगा स्टेशन ला जायला निघाले. मी आणि माझी मैत्रीण जान्हवी चालत होतो तेवढ्यातच पावसाच्या धारा पडू लागल्या. माटुंगा स्टेशनला आले तर २० मिनिटं झाली तरी ट्रेन येत नव्हत्या. तोवर पावसाचा जोर वाढला होता. मला मग ट्रेनची वाट बघण्याचा कंटाळा आला आणि मी माझ्या आजीकडे हिंदू कॉलनीत जायला निघाले. माटुंग्यापासून हिंदू काॅलनीत जाईपर्यंत पाऊस इतका वाढला होता की छत्री असूनसुद्धा मी पूर्ण भिजून गेले. त्यादिवशी देवाने मला ट्रेनची वाट न बघता हिंदू कॉलनीत जाण्याची बुद्धी दिली याबद्दल मी अगदी मला नशीबवान समजते.
पावसाचा जोर वाढतच होता. ५ वाजल्यानंतर फोनही लागणं बंद झालं होतं.अधून मधून काही फोन लागत होते. माझ्या आई बाबांना तर ऑफिस मधून निघणंच शक्य नव्हतं. दोघेही तिकडे राहिले आणि दुसऱ्या दिवशी मालाडला गेले. मालाडला माझ्या आजीबरोबर आत्या होती , माझा भाऊसुद्धा घरी शाळेतून लवकर आला होता. आजी आणि भावाबरोबर माझ्या दोन आत्या होत्या त्यामुळे काही काळजी नव्हती. राणी मावशी भगिनी समाज मध्ये होती, आजीच्या घरापासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर. पण पाणी इतकं तुंबलं होतं की तिला येई येई पर्यंत खूप उशीर झाला. आमच्या गल्लीतल्या काकांच्या पायात खिळा रुतला. पाणी तुंबलं होतं , पाय ठेवताना त्यांना खिळा दिसला नाही. डॉक्टर बाजूलाचअसूनसुद्धा त्यांच्याकडे जाऊन टी.टी च इंजेकशन घेणं हेसुद्धा एक दिव्य होतं. माझा एक मामा जो पार्ल्याला राहतो त्याने आजीकडे येण्याचा निर्णय घेतला . सी. एस. टी हून पार्ल्याला पोचू की नाही याची त्याला शाश्वती नव्हती. आम्ही टी . व्ही. वर बातम्या बघत होतो, तेव्हा व्हाट्सअँप वगैरे काही नव्हतं. 
त्यावेळी मी कॉलेज मध्ये होते, माझ्यावर कसलीच जबाबदारी नव्हती. पण आता आई झाल्यावर लक्षात येतं आहे, ज्यांची लहान मुलं तेव्हा पाळणाघरात असतील, ज्यांच्या घरी कोणी वृद्ध व्यक्त्ती एकटी असेल ,त्यांचं काय झालं असेल ते. पावसाचं हे रुद्र रूप परत कधीच येऊ नये ही इच्छा. 
-धनश्री

हम तुम एक कमरे में बंद हो

आज सकाळी जरा ७ च्या ऐवजी 8 ला ऑफिस ला निघायचं ठरवलं. अंघोळीहून आले आणि बघते तर काय, बेडरूम चा दरवाजा लॉक झाला होता. उघडताच येत नव्हता. बाहेरून सासू- सासऱ्यांनी किती प्रयत्न केले, त्यांनाही जमलं नाही. अगदी दरवाज्याला लाथा मारण्यापासून ते लॅचचा स्कृ काढण्यापर्यंत बरेच उपाय करून बघितले. तरी काही जमेना. शेवटी चावीवाल्याला बोलावलं आणि त्याची वाट बघत राहिलो. तो आला आणि त्याने दरवाजा उघडल्यावर मी अगदी हुश्श्श !! केलं. ह्या प्रसंगावर मी ही कविता लिहिली. अक्षरशः घाटकोपर स्थानक आल्यावर लिहायला घेतली आणि ठाणं येईपर्यंत संपवली. खूप दिवसांनंतर ट्रेन मध्ये काही लिखाण केलं. त्यामुळे अगदी छान वाटतंय.
हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाये
बिलकुल रोमँटिक नाही हो
एकदा चावी हरवली तर बाहेर कसं येऊ हो
"आई आई" म्हणत लेक ठक ठक करते
"येतेच हा लवकर "आई आतून म्हणते
कसं सांगू तिला चावीवाला आल्याशिवाय येतां येत नसते
लाथ मारणे इथे उपयोगी पडते
कितीही लाथ मारली तरी दरवाज्याला उघडायचेच नसते
"घरी लॉक झाले आहे" असा साहेबांना मेसेज करते
ऑफिसला किती उशीर होईल या विचारात पडते
शेवटी बाई एकदा चावीवाला येतो
त्याच्या हत्याराने कुलूप फोडतो
लेक आईला मिठी मारते
ऑफिसला जाऊ नको सारखी सांगते
"येताना गम्मत आणेन " आई पापा घेऊन सांगते
डोळ्यातील अश्रू पुसून ऑफिसला निघते

Tuesday, July 25, 2017

"ट्विटर/ Twitter "

"ट्विटर/ Twitter " या विषयावर माझी कविता -
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव(follow) करतात:
२००६ ला एक पक्षी जन्माला आला
पक्ष्यांच्या थव्यांना गोळा करू लागला 
"Twitter "
माझं नाव आहे बोलला 
काय बाई लोकं हल्ली कसली नावं ठेवतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
रोज काही काही पक्षी येतात 
आपला खाऊ खाऊन जातात 
"Twitter "
चे पक्षी बातमी घेऊन येतात
फक्त एकदा १४० अक्षरात बोलतात 
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
छोटीशी चूक जगभर फिरते 
"coverage "
का "covfefe " मन विचारात पडते 
मोठे छोटे पक्षी बोलतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात⁠⁠⁠⁠
फ्रिज बिघडला स्वराजांना सांगतात 
जणू काही त्यांना दुसरी कामं नसतात 
मदतीच्या चिवचिविला त्या " " देतात 
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
कधीकधी चिमण्या काव- काव करतात 
कधीकधी कावळे चिव- चिव करतात
"Account Hack "
झाल्याने थरूर थरथरतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
कोण बोललं याला महत्त्व असतं
त्यांचं बोलणं "retweet " होतं जास्त 
पक्षी सारखी चिव- चिव करतात
माहित नाही कधी झोपतात उठतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
मोबाईलवर कसले पक्षी बघता, आजीबाई विचारत राहतात सारख्या 
काय बाई सांगू, कसं सांगू
बातम्यांचे झरे तिथेच दिसतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात
अहो साहेब लोक तुम्हाला फोल्लोव करतात

--धनश्री

Monday, July 24, 2017

जबाबदार कोण?

" काय बाई हिला नोकरी करायला काय झालं, संसाराला जरा हातभार नाही लागणार का?
मुलांच्या शिक्षणाला हल्ली किती खर्च येतो. "
"दिवसभर नुसती ऑफिसमध्ये असते. हिच्या मुलांवर संस्कार कोण करणार? नुसते पैसे मिळवले आणि शाळेची फी दिली म्हणजे झालं का?"
वरील दोन्ही परस्पर विरोधी विधानं आपण कित्येकदा ऐकतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे कोणी सांगायचं? कुठल्याही घरातील संपूर्ण परिस्तिथी माहित असल्याशिवाय आपण काय बरोबर आणि काय चूक हे सांगू शकत नाही. मुळात हे सांगण्याचा बाहेरच्या माणसाला हक्कच नाही.
मनीषा म्हैसकर ह्यांच्या मुलाच्या आत्महत्येवरून पालकत्वाचे धडे whatsapp वरून गिरट्या घालत होते.त्यांचं कुठे चुकलं किंवा मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे मुलाला वेळ देता आल्यामुळे हे सगळं झालं इत्यादी इत्यादी सांगणारे . माझी त्या धड्यांबद्दल जी काही मतं आहेत , ती आपण पुढे बोलूच. फक्त ते धडे देणारे/ फॉरवर्ड करणारे जे कोण आहेत त्यांच्याबद्दल मला भारी मजा वाटतेय. ते धडे त्यांच्या आयुष्यात ते किती पाळतात हे आधी बघावं . आणि मग दुसऱ्यांना शहाणपण शिकवावं.
माझी आजी म्हणायची "दुसऱ्या शिकवेब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण"
कॉलेज मध्ये असताना मनीषा म्हैसकर माझ्यासाठी एक यशस्वी स्रीचं प्रतीक होत्या. माझी मावशी हाफकिन इन्स्टिटयूट मध्ये नोकरी करायची. ती हाफकिन डायरेक्टर सौ. मेधा गाडगीळ यांची सेक्रेटरी होती. मेधा गाडगीळ स्वतः IAS अधिकारी असल्यामुळे मावशीची कामानिमित्त बऱ्याच IAS अधिकाऱ्यांशी भेट- गाठ व्हायची. तसंच ती एकदा मनीषा म्हैसकर यांना भेटली होती. अतिशय प्रभावी आणि हुशार व्यक्तिमत्त्व असं मावशीचं मनीषा म्हैसकर बद्दल मत झालं. त्यामुळे मनीषाताईंबद्दल त्यांची हुशारी, कर्तबगारीता हे चांगले गुण मी लक्षात घेतले. मुख्य म्हणजे लहानपणापासूनच असे संस्कार आहेत की दुसऱ्यात जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं.मनीषाताईंबद्दल ऐकून वाचून त्या माझ्यासाठी एक आदर्श स्री होत्या.
मनीषा ताईंच्या पालकत्वाचे पोस्ट मॉर्टेम करणारे जे messages whatsapp वर फिरता आहेत, त्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. पण हे मुद्दे लगेच त्यांच्या पालकत्वावर ताशेरे नं ओढता, सहज चर्चेचा विषय होऊ शकतात. आणि त्यांची चर्चा लगेच दुसऱ्या दिवशी कशाला?त्यांना जरा श्वास घेऊ द्या. IAS अधिकारी म्हणजे त्यांचं मुलांकडे वेळ नसल्यामुळे लक्ष नसणार हे आपण कसं गृहीत धरू शकतो?घरी असणारे किती पालक आपल्या मुलांना वेळ देता आहेत? मुलांना वेळ देणं आणि नोकरी करणं ह्या "mutually exclusive " events नाही आहेत.
आता हा मी "Co -ordinate geometry " सारखा "graph " बनवला आहे

त्याचे चार भाग आहेत पुढील प्रमाणे:
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे /व्यवस्थित संगोपन करणारे पालक
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे /व्यवस्थित संगोपन करणारे पालक
. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे पालक
बहुतांश लोकांचा असा समज असतो की फक्त दोनच प्रकारचे पालक असतात ते म्हणजे किंवा सारखे. आणि सारखे पालक असू शकतात असं लोकांना वाटतंच नाही.
आता हे खरं आहे की नोकरी करणारे पालक घरी राहणाऱ्या पालकांपेक्षा वेळ कमी देऊ शकतात. पण घरी आल्यावर ते वेळ देत नसतील कशावरून? आणि नोकरी करणारे पालक असणारा वेळ मुलांसोबत सक्रियपणे घालवतात हे कशावरून? कशावरून ते बाहेर फिरायला जात नसतील?
मुळात मूल कसं निपजतं ह्याच्यावरून आपण पालकत्वाची प्रगतिपुस्तके लिहू शकत नाही. आपण फक्त दुरून निष्कर्ष बांधू शकतो. खूप कष्ट घेऊन सुद्धा मुलं चांगली निपजतील असं नाही. आणि काही करून सुद्धा काही मुलं अगदी व्यवस्थित निघतात. कारण मुलांच्या जडणघडणीत जरी आई वडिलांचा वाटा मोठा असला तरी आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी मुलांवर कळत नकळत संस्कार करत असतात. याचा अर्थ आपण मुलांकडे लक्ष देऊ नये असं नाही. आपण आपल्या परीने मुलाचं अगदी व्यवस्थित संगोपन करावं. पुढे काय घडेल हे आपण सांगू शकत नाही.आपण आपल्याला जे जमतं ते अगदी करावं आपल्या मुलासाठी . त्याचं मोजमाप आपल्याला रात्री लागणारी झोप असते. आपण आपली कर्तव्य व्यवस्थित करत असू तर आपण अगदी शांतपणे झोपू शकतो.
मला वाटतं काही लोकांना कुणाचं चांगलं बघवतच नाही. मनीषा आणि मिलिंद म्हैसकर हे करिअरच्या दृष्टीने एक यशस्वी जोडपं होतं. त्यांच्यात चुका काढण्यासारखं अजून काही समाजाला मिळत नव्हतं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली - झालं त्यांच्यावर ताशेरे ओढण्याचं जणू काही कारणंच मिळालं.
आता हेच बघा एक दुसरी बाजू. मनीषा म्हैसकर ह्याऐवजी एक गृहिणी असती. अगदी आपल्या संसारात रमणारी , नवरा मुलं बाळांना बघणारी. तिच्या मुलाच्याबाबतीत असं काही झालं असतं तर लोकांनी म्हटलं असता "काय ही सारखी घरी असायची. मुलांच्या गरजा बाहेर पडल्याशिवाय कशा कळणार? " ठपका ठेवायचा असेल तर तो कसाही ठेवता येतो
शेवटी मला अमर प्रेम मधील हे गाणं आठवतंय:
"
कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों को.."

--धनश्री

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...